Monday, July 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28.07.2025








                                                  निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविणार

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात महत्वाचा असणारा निम्न पेढी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पामुळे बाधीत झालेल्यांचे चांगले पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हा नियोजन सभागृहात आज निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी आमदार रवी राणा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधिक्षक अभियंता योगेश दाभाडे, श्री. कथले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रद्धा उदावंत, उपजिल्हाधिकारी प्रसेनजित चव्हाण, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय औतकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, प्रकल्पामुळे पाच गावे बाधीत होणार आहे. बाधित कुटुंबांना शासनाचे सर्व लाभ मिळतील. जुन्या पद्धतीने भूसंपादन झालेल्यांसाठी 100 कोटींचा सानुग्रह निधी प्राप्त झाला आहे. यात हेक्टरी पाच लाख रूपयांची मदत मिळणार आहे. पुनर्वसित गावात सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येतील. तसेच कॅम्प घेऊन प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील. नागरिकांची सहमती असल्यास निवासी संकुलाचा प्रकल्प राबवून नागरिकांना किमान 500 चौरस फूटाची जागा देण्यात येतील.

आमदार रवी राणा यांनी राज्य शासनाच्या पुढाकाराने कृषी विभागाची जमीन घेऊन बाधीत गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान, सरळ खरेदीचे लाभ देण्यात येत आहे. तसेच पुनर्वसित गावात नागरिकांना जागा देऊन घरकुल योजनेत घर बांधून देण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीने पुनर्वसन होणाऱ्या जागेवर जाऊन जमिनीचा ताबा घेणे आवश्यक आहे. या गावात जिल्‍हा नियोजनमधून निधी देऊन मूलभूत सुविधा देण्यात येतील. यामधून पाणी, रस्ते, विजेची सोय होऊ शकेल. चांगल्या दर्जाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी प्रत्येक पुनर्वसित गावांना मूलभुत सोयींसाठी निधी देण्यात येणार आहे.

सुरवातीला निम्न पेढी प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले. यात बाधितांना देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली. तसेच नागरिकांचे पुनर्वसनाबाबत मत जाणून घेण्यात आले. यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

00000

 उच्च शिक्षणातील अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

अमरावती, दि. 28 (जिमाका) : देशातील नामांकीत शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून सन 2024-25 वर्षासाठी अर्ज करण्यास 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 जुलैपासून सुरू झाली आहे. आता दि. 1 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल. किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे.

याबाबत maharashtra.gov.in संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह आयुक्त, समाज कल्याण, 3, चर्च रोड, पुणे -411 001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000

पोस्ट ऑफिसमध्ये आयटी अल्पिकेशनची सुरूवात

*4 ऑगस्टला व्यवहार बंद

अमरावती, दि. 28 (जिमाका) : भारतीय डाक विभागाने सेवांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी ‘आयटी 2.0’ महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘एपीटी ॲप्लिकेशन’ डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.

या नव्या प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिसमधून सुरू होणार आहे. दि. 5 ऑगस्ट 2025 पासून अमरावती प्रधान डाकघराच्या अखत्यारितील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चिखलदरा, दर्यापूर आणि धारणी तालुक्यातील सर्व टपाल शाखा डाकघर कार्यालये आणि उपडाकघर कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल.

या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेल्या डेटा स्थलांतरणाची प्रक्रिया दि. 4 ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आली आहे. या तांत्रिक कामामुळे सोमवार, 4 ऑगस्ट 2025 रोजी सर्व तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, अशी माहिती प्रवर अधिक्षक डाकघर यांनी दिली.

नागरिकांना अधिक चांगल्या, जलद आणि डिजिटली सक्षम सेवा देण्यासाठीच ही पावले उचलली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची पोस्टातील कामे दि. 4 जुलै 2025 पूर्वी पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...