Wednesday, July 9, 2025

DIO NEWS AMRAVATI 09.07.2025











 बालगृह 'वझ्झर मॉडेल' म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न

- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*जिल्हाधिकाऱ्यांची वझ्झर बालगृहाला भेट

अमरावती, दि. 9 : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज वझ्झर फाटा, ता. अचलपूर येथील स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद व मूकबधिर बालगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत एक तास चर्चा केली. यावेळी त्यांनी बालगृहाला वझ्झर मॉडेल म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा केली.

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण बालगृहाची पाहणी केली. त्यानंतर मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचीही पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेदरम्यान बालगृहाशी संबंधित महत्त्वाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत विनंती करण्यात आली. यामध्ये बालगृहाला 'वझ्झर मॉडेल' म्हणून घोषित करणे, विद्यार्थ्यांचे मानधन पाच हजार रूपयांपर्यंत वाढवणे, विद्यार्थ्यांना आजीवन बालगृहात ठेवण्याची परवानगी देणे आणि वझ्झर मॉडेल विभागीय स्तरावर सुरू करणे, याबाबींचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सोंदळे आदी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी येरेकर यांनी आज चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे महसूलविषयक बाबीचा आढावा घेतला. महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या. यासोबतच त्यांनी टोंगलापूर येथील रोपवाटिकेला भेट दिली.

यावेळी तालुका पालक महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, अचलपूर उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, प्रभारी तहसीलदार श्री. तिवारी, नायब तहसीलदार श्री. सोनारकर, तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर, गटविकास अधिकारी निलेश वानखडे उपस्थित होते.

बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप, नैसर्गिक आपत्ती, आपले सरकार आणि पीजी पोर्टलवरील प्राप्त तक्रारी, शेतकरी आत्महत्या, संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेसाठी आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी टोंगलापूर येथील मनरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सामाजिक वनीकरण रोपवाटिकेला भेट दिली. याठिकाणी असलेल्या कलमांची चौकशी करून माहिती घेतली. रोपे वितरीत करताना झाडावर त्यांचे नाव आणि त्यांचा उपयोगाबाबत फलक लावण्याच्या सूचना सामाजिक वनीकरण विभागास दिल्या.

अचलपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाज्या आणि इतर शेतमालाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या शीतगृहाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केली. यावेळी तहसीलदार संजय गरकल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाचे कार्यकारी अभियंता रोहन पाटील उपस्थित होते.

सदर शीतगृहाची साठवणूक क्षमता 10 मेट्रिक टन आहे. यात फळे आणि भाज्या दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. यासाठी आवश्यक असलेली सापेक्ष आर्द्रता देखील राखली जाते. शीतगृहाच्या आत बाष्पीभवन युनिट आणि बाहेर कंडेन्सर युनिट असलेल्या 'स्प्लिट' प्रकारच्या प्रणाली बसविण्यात आली आहेत. सदर शीतगृह 10 किलोवॅट क्षमतेचे असून सौर ऊर्जेवर चालते. यामध्ये बायफेशियल सोलर पॅनेल वापरले आहेत, जे कमी प्रकाशातही वीज निर्माण करतात. शीतगृह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज आहे. हे सेन्सर्स फळे आणि भाज्यांमधून निर्माण होणारे अनावश्यक व हानिकारक वायू शोधून त्यांना शीतगृहातून बाहेर काढतात, ज्यामुळे फळे आणि भाज्या अधिक कालावधीसाठी साठवता येतात. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक सोय निर्माण झाली आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...