मानवी जाणिवा कायम ठेवून प्रशासकीय कामकाज करा
- ॲड. धर्मपाल मेश्राम
पारधी समाज बांधवांची विविध विषयावर निवेदने, मागण्या सादर
अमरावती, दि. 17 (जिमाका) : .अनुसूचित जाती जमातीमध्ये येणारा पारधी समाज मुख्य समाजाच्या प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी शासन विविध धोरणे राबवित आहेत. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानवी जाणीव जोपासून प्रशासकीय कामकाज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी आज येथे केले.
दस्तूर नगर येथील प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती - उद्योजकता विकास प्रकल्प, विवेकानंद छात्रावास येथे पारधी विकास परिषदेला (विदर्भ प्रांत) मार्गदर्शन करताना आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम यावेळी बोलत होते.
प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती - उद्योजकता विकास प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, प्रदीप वडनेरकर, आशिष कावरे, अमरसिंग भोसले, आदिवासी विभागाच्या उपायुक्त जागृती कुंभरे आदी यावेळी उपस्थित होत्या.
आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम म्हणाले की, अन्य समाजाच्या तुलनेत पारधी समाज काहीसा मागे राहिला आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्व समाज बांधवांपर्यंत विकास गंगा पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल. अधिकाऱ्यांनी मानवी जाणिवा जोपासून कामकाज करावे. या समाजाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी मी
राज्यभर पारधी समाजाच्या बेड्यांवर फिरलो. त्यांच्या गाऱ्हाणी, तक्रारी समजावून घेतल्या. कायद्याने ज्या तरतुदी आहेत, त्याचा योग्य उपयोग करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आदिवासी विभागाच्या उपायुक्त श्रीमती कुंभरे यांनी यावेळी पारधी समाज बांधवांसाठी आदिवासी विभागामार्फत राबण्यात येणाऱ्या विविध तरतुदींविषयी माहिती दिली. पारधी समाज बांधवांसाठी न्युक्लिअस बजेटमधून आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यक्ती अथवा गटांना आर्थिक सहाकार्य करण्यात येते. घरकुलासाठीही सहकार्य करण्यात येते. स्वाभिमान सबळीकरण योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष योजनेअंतर्गत देखील मदत पुरविली जाते. पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पारधी समाज बांधवांनी विविध विषयावर निवेदने, मागण्या यावेळी सादर केल्या. त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. मेश्राम यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पवार यांनी तर रुपेश पवार यांनी आभार मानले.
00000
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत
विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
अमरावती, दि. 17 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक पाल्य, माजी सैनिक, माजी सैनिक वीर पत्नी यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी़ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथून अर्ज प्राप्त करुन 1 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व कागद पत्रासहित प्रस्ताव जमा करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना, वीर पत्नी यांना कळविण्यात येत की, ज्या माजी सैनिक, वीर पत्नी यांच्या पाल्यांना इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के व बारावीमध्ये 85 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत व ज्या पाल्यांचा चालू वर्षात आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळाला असल्यास तसेच कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पात्र उमेदवार अर्ज करु शकतात.
00000
सैनिकी मुला, मुलींचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
अमरावती, दि. 17 (जिमाका): माजी सैनिक, वीर पत्नी यांना सूचित करण्यात येते की, अमरावतीमध्ये माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी जवाहर नवोदय विद्यालयाच्या मागे असून या वसतिगृहामध्ये एकुण 48 मुलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतीगृह, नंदनवन कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे असून या वसतिगृहामध्ये एकुण 48 मुलींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक, वीर पत्नी अमरावती शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य अमरावती येथे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्या पाल्यांना या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रॅन्कप्रमाणे भाडे आकारले जाते व वीर पत्नी यांच्या पाल्यांना या वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो.
प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश पुस्तिका वसतिगृह अधीक्षक तसेच वसतिगृहात उपलब्ध आहे. वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधीक्षक, अधीक्षका यांचेकडून प्रवेश पुस्तिका खरेदी करून अर्ज त्यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. माजी सैनिक पाल्यास दरमहा 2 हजार 500 रूपये तर सिव्हिल पाल्यास दरमहा 3 हजार 500 रूपये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील नमुद दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती (0721-2530366), 8329968301, 8668964662 तर सैनिकी मुलींचे वसतिगृह, नंदनवन कॉलनी, अमरावती (0721-2550429), 8830865337 आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती (0721-2661126) यावर संपर्क साधावा.
0000
जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान 1 जुलै पासून सुरू
अमरावती, दि. 17 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान दि. 1 जुलै 2025 ते 31 मे 2026 पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागामार्फत दरमहा प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये महिलांच्या आरोग्याबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाअंतर्गत आरोग्य संस्थानिहाय दरमहिन्यात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान , महिला सक्षमीकरण यामध्ये महिलांसाठी एकूण 488 आरोग्य संस्था उपक्रम राबविणार आहेत. त्यामध्ये 5 लाख 86 हजार 238 महिलांना लाभ मिळणार आहे. या अभियान अंतर्गत खालीलप्रकारे शिबिर आयोजित करण्यात येत आहेत.
असंसर्गजन्य आजार तपासणी व समुपदेशन अंतर्गत उच्चरक्तदाब, मधुमेह, मुखकर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, आवश्यक रक्त तपासण्या लिपिड प्रोफाइल CBC, ECG राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम (RKSK), राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम (RBSK) अंतर्गत किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेविषयी माहिती देणे, मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणे, पोषण आहार, WIFS, जंतनाशक मोहिम, योगा, वात्सल्य कार्यक्रम पात्र लाभार्थ्यांची गर्भधारणापूर्व समूपदेशन तपासणी, उपचार याप्रमाणे तपासण्या करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
0000
सहकार क्षेत्रातील योगदानाबाबत पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत
अमरावती, दि. 17 (जिमाका): सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदानाबाबत पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या संस्थेचे मुख्यालय असलेल्या संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयांशी संपर्क साधून आपल्या संस्थांचे प्रस्ताव दि. 31 जुलै 2025 पर्यंत सादर करावेत. अडचण असल्यास उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहायक निबंधक ग. म. डावरे यांनी केले आहे.
00000
शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन
इच्छुक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्यातील शेतक-यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणा-या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. यासाठी कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पनात झालेली वाढ याबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्था भेटी यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार सन 2025-26 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरीया देशांची निवड करण्यात आली आहे.
यासाठी लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःचे नावे चालु कालावधीचा (मागील सहा महिन्यातील) 7/12 व 8-अ उतारा असावा. उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल. शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्ष पूर्ण असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment