Tuesday, July 1, 2025

DIO NEWS AMRAVATI ०१-०७-२०२५

जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

अमरावती, दि. 01 : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहीली.

0000

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 
उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण
                                       -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती , दि. 1 (जिमाका) : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना, अनेक आव्हानांना आणि अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु स्वयं-प्रेरणा तुम्हाला या परिस्थितीत हार न मानता, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा आणि आत्मविश्वास कायम ठेवा. यामुळे तुम्हाला यश निश्चित  मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज व्यक्त केला.

यूपीएससी  आणि एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड येथे करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर बोलत होते. महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी तसेच युपीएसी परीक्षा उत्तीर्ण झालेले शिवांक तिवारी, रजत पत्रे, नम्रता ठाकरे यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्वयं-प्रेरणा तुम्हाला अपयशातून शिकायला आणि पुन्हा प्रयत्न करायला शिकविते. तुमचे ध्येय स्पष्टपणे निश्चित करा. ते साध्य करण्यासाठी एक योजना तयार करा आणि त्या तयारीमध्ये सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षेची तयारी ही केवळ तुमच्या ध्यानाची परीक्षा नसून ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाची आणि निर्णयक्षमतेची परीक्षा असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेक विद्यार्थी कठोर परिश्रम करतात, पण यश सगळ्यांनाच मिळते असे नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी फक्त एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता, इतर पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात जाल, त्या क्षेत्रात अव्वल स्थानी जाण्याचा विचार ठेवा. मोठे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवा. शालेय दिवसापासूनच आपले विविध विषय सखोलपणे अभ्यासण्याची सवय रुजवा. ही सवय स्पर्धा परीक्षेची तयारी करताना उपयुक्त ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. 

महापालिका आयुक्त श्रीमती शर्मा-चांडक यांनी यावेळी स्पर्धा परीक्षेबाबत त्यांचे अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेला कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्हाला देशसेवा तसेच नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळते. राज्य शासनात राहून विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचीही संधी मिळते. तसेच विविध पदांवर काम केल्यामुळे विविध क्षेत्रात काम करता येते. यामुळे तुमचे ध्येय निश्चित करून अभ्यासाला सुरुवात करा. परिस्थितीचा बागुलबुवा न करता ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आज इंटरनेटमुळे सर्व माहितीचे स्त्रोत सर्वांना समान मिळत आहेत, याचा लाभ घ्या, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महोपात्र म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेचे यश केवळ स्वप्न बघून पूर्ण होत नाही. यासाठी प्रयत्न करा. नियोजनपूर्व आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास हे यश कोणालाही शक्य आहे. ग्रामीण भागातून आल्यामुळे हे यश मिळण्याला काहीही अडचण नाही, हे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहून कळते, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 
जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबत अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षा देताना झालेल्या चुकांमधून न घाबरता पुढे चला. त्या चुका दुरुस्त करून पुढे चालत राहा. घाबरून आपला मार्ग सोडू नका, असा संदेश दिला.
युपीएसी परीक्षा उत्तीर्ण झालेले आनंद खंडेलवाल, शिवांक तिवारी, रजत पत्रे, नम्रता ठाकरे यांचा यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यांनी स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्यांच्या यशाचे रहस्य, अभ्यासाचे तंत्र आणि प्रशासकीय सेवेतील संधींविषयी यावेळी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम व प्रभावी व्हावे, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून  हा महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी मानले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित हा उपक्रम, प्रशासकीय सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरले.
0000


वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई
महसूलमंत्र्यांचे परिषदेत  आश्वासन

मुंबई, १ जुलै : वर्धा नदीच्या किनाऱ्यावर होत असलेल्या अवैध रेती उत्खनन प्रकरणात कठोर कारवाई होईल. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना ते बोलत होते. 
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन वाळू धोरण लागू केले आहे. या धोरणांतर्गत १ एप्रिल २०२५ रोजी डेपो धोरण रद्द करून नवीन वाळू धोरण जाहीर करण्यात आले. यामुळे चंद्रपूर येथील पहिल्या रेतीघाटाच्या लिलावातून शासनाला १०० कोटी रुपये महसूल मिळाला. तसेच, छोट्या-छोट्या रेतीघाटांचे लिलाव करून महसूल वाढवण्याचा आणि अवैध उत्खननावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा मानस आहे.

श्री.बावनकुळे यांनी सांगितले की, ३० एप्रिल २०२५ रोजी जाहीर केलेल्या धोरणानुसार, घरकुल योजनेसाठी ५ ब्रास रेती तहसीलदारांमार्फत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन पोर्टलवर पास जनरेट केले जाणार असून, स्थानिक ग्रामपंचायत आणि नगरपंचायतींना बांधकामासाठी रॉयल्टीच्या आधारावर रेती उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, खाजगी बांधकामांसाठीही तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

आ. दादाराव केचे यांनी स्थानिक तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे कारवाई होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर मंत्र्यांनी सबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय, ड्रोनद्वारे रेतीघाटांचे सर्वेक्षण आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

आ. शशिकांत शिंदे यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती. यावर मंत्र्यांनी, मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार, महसूल आणि पोलीस खात्याने संयुक्त कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. 

महसूलमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत याठिकाणी संबंधित अधिकाऱ्याना  निलंबित करण्याचे आश्वासन दिले आहे.

यामुळे अवैध रेती उत्खननाला आळा बसणार असून, स्थानिक बांधकामांना रेती उपलब्ध करून देण्याचे धोरण प्रभावीपणे राबवले जाणार आहे, असे त्यांनी विधानसभेत सांगितले.
महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू चोरली असा आरोप आ. अनिल परब यांनी केला, त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री म्हणाले, आ. परब यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन करेन.

*अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी एम सँण्ड धोरण*

अवैध रेती उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने क्रशर धोरण आणले असून, प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर युनिट्सना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नैसर्गिक रेतीवरील अवलंबित्व ९० टक्क्यांनी कमी होईल, असे मंत्र्यांनी सांगितले. तसेच, अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी परिवहन खात्यामार्फत वाहन निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी १५ दिवस, दुसऱ्या गुन्ह्यासाठी एक महिना आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी कायमस्वरूपी वाहन निलंबनाचा प्रस्ताव आहे.
*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...