Friday, June 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27.06.2025

 



























श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार

 -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

वर्दीनी नदीचे पूजन करून 211  मीटरची अखंड साडी अर्पण

        अमरावती, दि. 27 (जिमाका) :शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपर्यंत जाणार आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रीक्षेत्र कौंडण्यपुरला जाण्याची सुविधा निर्माण व्हावी, या श्रीक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे शक्तिपीठ पुढील काळात महामार्गाला जोडण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.

            श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वर्दीनी नदीचे (वर्धा नदी) पूजन करून 211 मीटरची अखंड साडी नदीला अर्पण केली. ही साडी सूरत येथे तयार करण्यात आली. नदीला आपल्या भारतीय संस्कृतीत माता मानतात. मातेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून हा सोहळा साजरा करण्यात आला.

            आमदार राजेश वानखडे, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, सुमीत वानखडे, दादाराव केचे, प्रवीण पोटे-पाटील, शेखर भोयर, रविराज देशमुख, किरण पातुरकर, राज राजेश्वर माऊली सरकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे  श्रीक्षेत्र विदर्भाची पंढरी, भगवान श्रीकृष्णाचे सासर तसेच माता रुख्मिणीचे व पंच सतीचे माहेरघर म्हणून सर्वश्रृत आहे.  ही भूमी अत्यंत पवित्र आहे. या भूमीला पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. विठू रुख्मिणी मातेचे पूजन करून मला अधिक सकारात्मकतेने कार्य करण्याचे ऊर्जा मिळाली आहे. या आशीर्वादाने माझे जनसेवेचे कार्य अव्याहतपणे सुरू राहील.

            ते पुढे म्हणाले, हे शासन लाडक्या बहिणी व शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर राहील. अमरावती जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. श्री क्षेत्र कौंढण्यपूरचा विकास करण्यासाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून येथील विकासकामे सुरु करण्यात येईल,असेही ते यावेळी म्हणाले.

            अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव व विठ्ठल रुख्मिणी संस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल रुख्मिणी रथयात्रा, नगर प्रदक्षिणा, एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिला भजनी मंडळाच्या शंभरहून अधिक दिंड्या सामील झाल्या होत्या. भक्तिमय वातावरणात विठु रखमाईचा जयघोष करीत, टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक भक्तगण, वारकरी, ग्रामस्थ यात सामील झाले होते.

****






वीज बळकटीकरणाचा व्यापक आराखडा तयार करा

    -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

            अमरावती, २७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०३४ पर्यंतच्या जिल्हा विकास व्हिजनच्या अनुषंगाने महापारेषणने अमरावती जिल्ह्यासाठी वीज बळकटीकरणाचा व्यापक विकास आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील वाढत्या ऊर्जा गरजांमुळे आणि सौर ऊर्जेचा झपाट्याने वाढणारा प्रवाह लक्षात घेऊन हा आराखडा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

       महापारेषण कार्यालय प्रकाशसरीत येथे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी महापारेषण आणि महावितरणची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  आमदार प्रताप अडसड, राजेश वानखडे, प्रविण तायडे, चंदू उर्फ उमेश यावलकर, प्रविण पोटे-पाटील यांच्यासह महापारेषण मुख्य अभियंता जयंत विके, महावितरण मुख्य अभियंता अशोक साळुंके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, प्रणोती देशमुख, प्रमोद पखाले, सागर जारे तसेच सर्व विभागीय कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते.

     पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यात वीज क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी २०३४ च्या अनुषंगाने तयार करण्यात येत असलेल्या आराखड्यात प्रामुख्याने नवीन २२० केव्हीचे उपकेंद्र, ४०० केव्ही व २२० केव्ही वीज वाहिन्यांचे जाळे, तसेच ‘रिंग मेन’ संरचना उभारण्याचा समावेश करण्यात यावा. यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह होईल. विशेषतः मेळघाटातील दुर्गम भागांचाही या विकास आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश यावेळी दिले.

       तसेच महापारेषण कंपनीने जिल्ह्यात सुरु असलेल्या ४३१ कोटी  रुपयांच्या प्रगतीपथावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.अचूकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी वीज वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्ती आणि सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

       पालकमंत्री श्री.बावनकुळे पुढे म्हणाले, महावितरणने लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घ्यावे. ‘लोकाभिमुख सरकार’ निर्माण करण्यासाठी महावितरणचा पुढाकार असावा. या पार्श्वभूमीवर, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांनी महिन्यातून किमान चार वेळा एखाद्या गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या.

        याशिवाय, वारंवार वीज खंडित होणाऱ्या समस्यांवर मूळ कारणांचा शोध घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी प्रत्येक महिन्याला स्थानिक आमदारांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेवून त्यांचे निराकरण करावे. तसेच लोकप्रतिनिधींशी  चर्चा करून कामाचे नियोजन करावे, असेही सांगितले. अधीक्षक अभियंता यांनी  तक्रारींवर तातडीने कारवाई करून त्यांचे निवारण करावे. आस्थापनांमध्ये नियुक्त कर्मचार्‍यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास राहून ग्राहकांना समाधानकारक सेवा द्यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

         ऊर्जा क्षेत्रातील या सर्वसमावेशक पायाभूत विकास आराखड्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या "सक्षम महाराष्ट्र" या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार येणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

***









पालकमंत्र्यांच्या हस्ते 12 भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप
अमरावती, दि. 27 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 12 भूमिहीन लाभार्थ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शेतजमिनीच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले.
शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी स्वतः शेतजमीन पट्टे व आदेशाचे वितरण केले. आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, प्रवीण पोटे-पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यावेळी उपस्थित होते.
मोर्शी तालुक्यातील मौजा शिरलस येथील श्रीमती शिला वानखडे, अशोक वानखडे, बाळु खडसे व मौजा नेरपिंगळाई भाग 2 येथील अमोल डाखोडे यांची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी निवड करण्यात आली. तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा माहुली चोर येथील माला इंगोले, रेखा कांबळे, मौजा येवती येथील जितेंद्र घोडेस्वार, शिवानंद मेश्राम, संजय चिमणकर, रमेश मुनेश्वर, मंगेश लोखंडे व अमर बनसोड यांचीही कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी निवड करण्यात आली.
लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश 18 ते 60 वयोगटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील पिढ्यानपिढ्या भूमिहीन असलेल्या शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, त्यांचे राहणीमान उंचावणे आणि मजुरीवरील त्यांचे अवलंबित्व कमी करून त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळवून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत अशा भूमिहीन शेतमजूरांना त्यांची शेतमालक होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन कसण्याकरिता उपलब्ध करून दिल्या जाते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2025-26 या वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवशाली अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. याच अभियानाअंतर्गत समाजातील वंचित, दुर्बल घटकांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असलेल्या लाभार्थ्यांना शेतजमीन पट्टे व आदेशाचे वितरण यावेळी करण्यात आले.
या योजनेअंतर्गत शेतमालक म्हणून निवड झालेल्या भूमिहीन लाभार्थी, तसेच विधवा व परित्यक्ता महिलांशी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी संवाद साधला.
00000







जनसंवाद कार्यक्रमात विविध विषयांवर निवेदने प्राप्त

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद

 

अमरावती, दि. 27 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्याबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले.

             पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, प्रवीण पोटे-पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यावेळी उपस्थित होते. जनसंवाद  कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

             पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

            वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा या विविध विषयांवरील निवेदनांवर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. पालकमंत्री  यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले होते. श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.  यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

00000



जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत

परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा येत्या मंगळवारी

 

        अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम व प्रभावी व्हावे, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.  यूपीएससी  आणि एमपीएससी  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.  यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल,

अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र,  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची प्रमुख उपस्थिती राहील.

यापुढे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

     या कार्यक्रमात अमरावती शहरातून आयएएस (IAS) झालेले तसेच एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी उपस्थित राहणार असून, या वेळी त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये युपीएसी परीक्षा उत्तीर्ण झालेले आनंद खंडेलवाल, शिवांक तिवारी, रजत पत्रे, नम्रता ठाकरे यांचा सत्कार करण्यात येईल.  स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्यांच्या यशाचे रहस्य, अभ्यासाचे तंत्र आणि प्रशासकीय सेवेतील संधींविषयी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

    जिल्हा प्रशासन अमरावतीच्या वतीने आयोजित हा उपक्रम, प्रशासकीय सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे. इच्छुकांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...