Tuesday, June 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 09.06.2025

 संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १५ जूनपर्यंत विशेष अभियान


अमरावती , दि. ९ (जिमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना अद्यापही या योजनांचे अनुदान मिळालेले नाही, त्यांच्यासाठी जिल्ह्यात विशेष अभियान राबविले जात आहे. दि. ९  ते १५ जून २०२५ या कालावधीत तालुकास्तरावर हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.

 जिल्ह्यात २०१८ पासून डी.बी.टी. (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण सुरु झाले आहे. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्णय घेतला आहे की, ५ मार्च २०२५ पासून डी.बी.टी. पोर्टलवर नोंदणीकृत आणि आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदान दिले जाईल. पारंपारिक बीम्स पद्धतीने अर्थसहाय्य वितरण सध्या थांबविण्यात आले आहे.

आतापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत डी.बी.टी. द्वारे २ लाख १४ हजार ९१३ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

 डी.बी.टी. पोर्टलवर नोंदणीमध्ये अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर असून अनुदान वितरणातही जिल्हा अग्रेसर आहे. लाभार्थ्यांचे आधार लिंक खाते अधिक असल्याने त्यांना अनुदान लवकर मिळत आहे.

तरी ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक झालेले खाते अद्यापही नाहीत, किंवा ज्यांचे ९५-इनऍक्टिव्ह आधार (आधार कार्ड बँक खाते क्रमांक किंवा NPCI बँक लिंक नसल्यामुळे) आणि ९६-आधार मॅपिंग डझ नॉट एक्झिस्ट (आधार नंबर IIN ला लिंक नाही) अशा लाभार्थ्यांनी तातडीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे.

ज्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही आणि ज्यांचे आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांनी या विशेष अभियानात आपले अपडेटेड आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत घेऊन संजय गांधी योजना विभाग, तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

**

मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू


अमरावती , दि. ९ (जिमाका): मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र. ४, जेल रोड, अमरावती , मागासवर्गीय गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कॅम्प, अमरावती तसेच १२५ जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, विलास नगर, अमरावती येथील वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक, अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी व वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी नोंदणी समाज कल्याण वसतिगृह येथे सुरू आहे.

सन २०२५-२६ मधील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. यासाठी विद्यार्थिनींनी वसतिगृहात नोंदणी करणे आवश्यक असल्याचे

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख यांनी कळविले आहे .

***

जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


अमरावती, दि . ९ (जिमाका) : 

 राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी 'जिल्हा युवा पुरस्कार '२०२४-२५  अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


 जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना १० हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


युवक युवतींसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय १ एप्रिल रोजी पंधरा वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी २९ वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे .केलेल्या  कार्याचे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेत विभागून दिला जाणार नाही .

 केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्थांसाठी पात्रता निकष व अटी पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कार संस्थेत विभागून दिला जाणार नाही . संस्थांनी केलेल्या कार्याची पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था पंजीबद्ध असावी. अर्जदार संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रामाणिक केलेला चारित्र दाखला देणे आवश्यक राहील. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीचा यावेळी  विचार करण्यात येईल .


   इच्छुक व पात्र युवक-युवती तसेच संस्थांना करावयाचे नमुना अर्ज अर्जदारांनी १६ जून २०२५ पूर्वी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती मार्डी रोड, तपोवन गेट जवळ, अमरावती येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

**

दादासाहेब गवई स्मारक उभारण्यासाठी गती द्यावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 9 : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान येणारे रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे स्मारक ही जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्याला समर्पित अशा स्मारकाच्या कामाला विविध यंत्रणांनी गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज रा. सू. गवई स्मारकाबाबत विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली. यावेळी कमलताई गवई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

श्री. येरेकर म्हणाले, दादासाहेबांचे स्मारक प्रामुख्याने तीन भागात विभागाले आहे. यात दादासाहेबांचा पुतळा, चित्रप्रदर्शनी आणि श्रोतृगृह असणार आहे. पुतळा उभारण्यासाठी जे. जे. स्कूलशी पाठपुरावा करून पुतळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया जलद गतीने करण्यात याव्यात. यात आवश्यक असलेला कालावधी कमी करणे शक्य असल्यास तपासून पहावे. यासोबतच गरजेनुसार असलेल्या परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे.

चित्र प्रदर्शनीमध्ये लावण्यात येणाऱ्या छायाचित्रांची संख्या आणि त्यानुसार छायाचित्रांची निवड करण्यात यावी. याठिकाणी येणाऱ्या नागरिकाला सुस्पष्ट दिसतील, अशा पद्धतीने छायाचित्रे लावण्यात यावी. तसेच याठिकाणी दादासाहेबांचा जीवनपट दाखवणारी भिंत तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक प्रसंगांची निवड समितीच्या मान्यतेने घ्यावी. किऑस्क, व्हीडीओ, दादासाहेबांचे कृत्रिम बुद्धीमत्तेने केलेली भाषणे याबाबत कार्य करताना समितीचा सल्ला घ्यावा. 

स्मारकामध्ये श्रोतृगृह बांधण्यात येणार आहे. सदर श्रोतृगृह विद्यापीठाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने अनुषंगीक कार्यवाही करावी. प्रामुख्याने वीज जोडणी, कर यासारख्या बाबींवर प्रक्रिया सुरू करावी. न्यास नोंदणी झाल्यानंतर विद्यापीठाशी हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. स्मारकासाठी न्यास नोंदणी करण्याचे शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी. स्मारक पूर्णत्वास जाण्यासाठी प्रत्येक आठवड्यात याबाबत बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने वेळापत्रक तयार करावे, यातून अप्रतिम स्मारक उभे राहावे, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

000000

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2026 च्या पूर्व प्रशिक्षणाकरीता प्रवेश परीक्षा


* सविस्तर माहिती  www.siac.org.in  या संकेतस्थळावर उपलब्ध


* 27 जुलै रोजी प्रवेश परीक्षा 


          अमरावती, दि. 9 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2026 च्या विनामूल्य पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता www.siac.org.in  या संकेतस्थळावरील जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.


          प्रवेश परीक्षेकरीता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी दि. ३ ते २७ जून २०२५ असून अर्ज भरण्याचा अंतिम तारीख २७ जून २०२५ पर्यंत आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. ३० जून २०२५ पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. २७ जुलै २०२५ (रविवार) ऑफलाईन पद्धतीने होणार असून परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील.


          सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावतीच्या संचालक डॉ. संगीता व्ही. पकडे (यावले) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...