Thursday, June 12, 2025

DIO NEWS AMRAVATI 12.06.2025

 शासकीय योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

*अभिनव ॲग्रीस्टॅक प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

अमरावती, दि. 12 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात सुलभता आणण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून या अभिनव योजनेत शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नोंदणीनंतर प्राप्त होणारा शेतकरी ओळख क्रमांक अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक योजनेमध्ये सहभाग अथवा लाभ मिळविण्याकरीता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने नागरी सुविधा केंद्रमध्ये जावून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासात कृषि क्षेत्र महत्त्वाचे आहे. अन्नधान्य उपलब्धता, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय जोपासणे, तसेच कृषी मालाची साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ, भाव यासोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. राज्यातील कृषी क्षेत्राशी 55 टक्के लोकसंख्या निगडीत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण योजना योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून कृषी क्षेत्राचा अधिक विकास होण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.

ॲग्रीस्टॅक ही कृषी क्षेत्रात डाटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकतेसह पोहोचवण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याकरिता ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्याची सुविधा नागरी सुविधा केंद्रामार्फत केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रांमध्ये सातबारा, आठ अ आणि आधार कार्ड ही कागदपत्रे घेऊन भेट द्यावी. तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नोंदणी करीत असताना आधारशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त होणार आहे. सदर प्राप्त होणारा शेतकरी ओळख क्रमांक हा अत्यंत महत्त्वाचा असून तो प्रत्येक शेतकऱ्यांनी जपून ठेवावा. शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक योजनेमध्ये सहभागी अथवा लाभ मिळण्याकरिता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा. ॲग्रीस्टॅक नोंदणीमुळे खातेदारास शासनांच्या सुविधेचा लाभ सुलभपणे मिळणार आहे. शासन स्तरावरही खातेदारांसाठी प्राधान्याने नोंदणी करण्याचे सूचना सर्व तलाठी व कृषि सहायक यांना देण्यात आल्या आहे.

नोंदणीमुळे शेतकऱ्यांना पीएम किसानसह इतर योजनेचा लाभ घेण्यास सुलभता होणार आहे. शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी किंवा कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा आणि शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

00000






आरोग्य योजनेत राज्यातील सर्व नागरिकांचा समावेश

डॉ. ओमप्रकाश शेटे यांची माहिती

अमरावती, दि. 12 (जिमाका) : राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य योजनेत सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच सक्षम असलेल्या सर्व रूग्णालयांनी अर्ज केल्यास त्यांचे देखील संलग्नीकरण करण्यात येतील, अशी माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रताप अडसड, प्रविण तायडे, राजेश वानखडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शल्य चिकित्सच डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी उपस्थित होते.

डॉ. शेटे म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्व रेशनकार्डधारक पात्र असतील. एका कुटुंबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. त्यासोबतच बहुतांश यात आजार समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांवर उपचार होतील. येत्या काळात नवसंजीवनी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात राज्यभरातील 200 अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. यासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायीत्व निधीचा उपयोग केला जाणार आहे.

जिल्ह्यात 36 रूग्णालये अंगीकृत करण्यात आली असून राज्यात 2 हजार 31 रूग्णालये संलग्नित आहेत. येत्या काळात चार हजाराहून अधिक रूग्णालये यात जोडण्यात येतील. रूग्णांना सेवा देणाऱ्या रूग्णालयांनी अर्ज केल्यानंतर सक्षम असल्याची खात्री करण्यात येतील. या सर्वांना या योजनेत जोडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगीकृत रूग्णालयांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गावपातळीवरील शासकीय कार्यालयांमध्ये याची यादी प्रसिद्ध करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

000000

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. 12 (जिमाका) : अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, दि. 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यासाठी असलेले फायदे याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, तसेच योग प्रचारासाठी दिवस साजरा केला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 6.30 वाजता विभागीय क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ योग प्रसारक उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, अमरावती महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, आरोग्य भारती, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, महिला पतंजली योग समिती, श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग, क्रीडा भारती, शारीरिक शिक्षक संघटना, नेहरू युवा केंद्र, बृहन्महाराष्ट्र योग परिषद, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत व किसान पंचायत, श्री शिवाजी शिक्षण संस्था, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ, आणि जिल्ह्यातील विविध योग संघटना, खेळ संघटना संस्था, क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणीही योग दिन साजरा करावा, तसेच योगदिनाला नागरिकांनी पाण्याची बॉटल आणि चटई, मॅटसह विभागीय क्रीडा संकुलात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

रविवारपासून दोन दिवशीय ग्रंथालय विभागीय कार्यशाळा

अमरावती, दि. 12 (जिमाका) : शासकीय विभागीय ग्रंथालय आणि राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सहाय्याने दोन दिवशीय ग्रंथालयाच्या विभागीय कार्यशाळेचे आयोजन दि. 15 आणि 16 जून रोजी शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे.

दि. 15 जून रोजी सकाळी 11 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे हस्ते होणार आहे. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी आयएलए अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे, प्राचार्य प्रा. डॉ. देवेंद्र भोंगाडे, क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, सदस्य प्रा. चंद्रकांत जोशी सनपुरकर उपस्थित राहतील.

दुपारी 1 वाजत पहिल्या सत्रामध्ये राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजना या विषयावर क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन राहतील. वाशिमचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे उपस्थित राहणार आहे. दुपारी 3.30 वाजता ग्रंथालय संचालनालयाच्या विविध योजनांबाबत छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांचे व्याख्यान होणार आहे. अमरावतीचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहूरवाघ उपस्थित राहतील.

सोमवार, दि. 16 जुन रोजी दुपारी 11 वाजता राजा एलजीएमएस प्रणाली आणि ई-ग्रंथालय आज्ञावली याबाबत सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. विजयकुमार जगताप मार्गदर्शन करतील. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. महेंद्र मेटे, यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. राजेश चव्हाण प्रमुख राहतील. दुपारी 12.30 वाजत वाचन संस्कृती, साहित्य व विकसित सार्वजनिक ग्रंथालये या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रा. डॉ. रविंद्र सरोदे, शेंदुरजनाघाट येथील श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. राजेश बोबडे यांचे व्याख्यान होणार आहे. वाशिमचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे अध्यक्षस्थानी राहतील. अमरावती जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, अंकेषण अहवाल, कार्यकारीणी बदल अहवाल बाबत मार्गदर्शन, शंका निरसन या विषयावर अमरावतीचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांचे व्याख्यान होणार आहे. अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे अध्यक्षस्थानी राहतील. चांदुर बाजार येथील गो. सी. टोम्पे महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल राम देशपांडे उपस्थित राहतील. सायंकाळी 4 वाजता समारोपीय कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल अध्यक्षस्थानी राहतील. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार उपस्थित राहतील.

कार्यशाळेला अमरावती विभागातील शासकीय ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक तथा शासकीय विभागीय ग्रंथालयाचे प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. राजेश पाटील यांनी केले आहे.

00000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 12 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत यावर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावर्षीच्या सन 2025-26 अंतर्गत क्षेत्र विस्तार घटकातंर्गत स्ट्रॉबेरी लागवड, ड्रगन फ्रूट, पुष्पोत्पादन, मिरची लागवड, लहान मशरूम उत्पादन प्रकल्प, सुगंधी व औषधी वनस्पती अंतर्गत गुलाब, रोझमेरी, ट्यूबरोज, जीरॅनियम, कॅमोमाइल दावना, जस्मिन, लॅव्हेडर, पालमारोसा, लेमनग्राम, तुळशी, वेटीव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळस औषधी वनस्पती अंतर्गत पिंपळी, सफेद मुसळी, शतावरी, संत्रा पुनरूज्जीवन, सामूहिक शेततळे, नियंत्रित शेती घटकांतर्गत शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, फ्रुट बंच कव्हर, मधुमक्षिका वसाहत आणि फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत टॅक्टर 20 एचपीपर्यंत, पॉवर टिलर, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर 16 लि., काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत फार्मगेट पॅक हाऊस कांदाचाळ या बाबींचा समावेश असलेला कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास तालुका कृषि अधिकारी किंवा उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाडीबी पोर्टल  mahadbt.maharashtra.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात आज 'एक दिवस बळीराजासाठी' अभियान

अमरावती, दि. 12 : जिल्ह्यात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळाव्यात आणि त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून शुक्रवार, दि. 13 जून रोजी 'एक दिवस बळीराजासाठी' अभियान राबविण्यात येणार आहे.

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी हा एकदिवसीय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांची प्रत्येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी, कर्मचारी दिवसभर बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री केंद्रांवर उपस्थित राहतील.

या दिवशी कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारीमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री, बियाणे, रासायनिक खतांसोबत इतर निविष्ठांची सक्तीची विक्री, बियाणे, रासायनिक खते उपलब्ध असूनही देणे टाळणे, अनधिकृत बियाण्यांची विक्री, बोगस कीटकनाशकांची विक्री, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण आदी तक्रारी शेतकरी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांच्याकडे करू शकतील.

तसेच तालुकास्तरीय 14 भरारी पथकातील सर्व सदस्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यांच्याकडे थेट तक्रार नोंदवता येईल. यासोबतच शेतकऱ्यांसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्याचे क्यूआर कोड सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर लावण्यात आले आहेत. शेतकरी हे क्यूआर स्कॅन करून तक्रार नोंदवू शकतील.

व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी ८०८०५३६६०२ क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय पथकात कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती हे पथकप्रमुख असतील आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अमरावती हे सदस्य सचिव असतील. तालुकास्तरीय पथकात संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी हे पथकप्रमुख आणि कृषी अधिकारी (पंचायत समिती) हे सदस्य सचिव असतील.

बियाणे, खते आणि कीटकनाशके अधिकृत परवानाधारक कृषी निविष्ठा विक्री केंद्रातूनच रितसर पावती घेऊन खरेदी करावीत. कोणत्याही अनधिकृतपणे विकल्या जाणाऱ्या निविष्ठांना बळी पडू नये आणि कृषी निविष्ठा विक्री केंद्रातून बियाणे खरेदी करताना विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...