Tuesday, June 17, 2025

DIO NEWS AMRAVATI 17.06.2025

 



ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन अपिल सुनावणी

अमरावती, दि. 17 : आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमानुसार दाखल करण्यात आलेल्या अपिलाची सुनावणी ऑनलाईन करण्यात आली. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या वकीलांना आहे त्याच ठिकाणाहून अपिल सुनावणीला उपस्थित राहता आले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अपिल सुनावणीसाठी येण्याचा त्रास वाचला आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमाच्या कलम 16 नुसार उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाविरूद्ध दोन अपिल करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या वकीलांच्या सोयीसाठी सदर अपिल सुनावणी ऑनलाईन घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. याबाबत अर्जदार आणि त्यांच्या वकीलांना कळविण्यात आले. दरम्यान आज महसूल भवनात गुगल मिटच्या सहाय्याने ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघन यांच्यासह वकील आणि अर्जदार ऑनलाईन उपस्थित होते.

आज झालेल्या सुनावणीत हरिदास वर्धे विरूद्ध नाना वर्धे आणि हर्षल यावले विरूद्ध वच्छलाबाई यावले या दोन अपिल सुनावणीमध्ये बक्षीसपत्र करून देण्याबाबत वाद सुनावणीसाठी घेण्यात आले. यात दोन्ही पक्षांना ऑनलाईन म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून पुढील आठवड्यात अंतिम सुनावणी ठेवण्याची सुचना केली. तसेच वकीलांना प्रत्यक्षात कागदपत्रे सदर करण्यासाठी निर्देशित करण्यात आले.

आजच्या सुनावणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून बक्षीसपत्र करून घेण्यात आले. मात्र बक्षीसपत्रात नमूद अटी शर्तीचे पालन होत नसल्याने याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिनियमानुसार अर्ज सादर करण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल अर्ज सादर करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे वय अधिक असल्याने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अपिल सुनावणी ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही पक्ष आणि वकीलांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार आज विनाव्यत्यय अपिल सुनावणी घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या ऑनलाईन सुनावणीच्या निर्णयाचे दोन्ही पक्ष आणि वकीलांना स्वागत केले.

00000

 





 ग्रंथालय योजनांविषयी दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात

अमरावती दि. 17 : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी बदल अहवाल वेळोवळी न्यास नोंदणी कार्यालयास सादर करावे. एकूण 22 प्रकारचे बदल अहवाल सादर करता येतात. बदल अहवाल रितसर वेळीच सादर केल्यास बदल अहवाल तातडीने मंजूर होईल, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांनी केले.  

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या सहाय्याने ग्रंथालयाच्या विविध योजनांविषयी दोन दिवसीय  विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी अधिकृत लेखा परीक्षक नंदकुमार इंगळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, आणि डॉ. सुरज मडावी उपस्थित होते.

अंकेक्षण अहवाल तयार करताना ग्रंथालयांनी घ्यावयाची काळजी याविषयी श्री. इंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेला उपस्थित ग्रंथालय चालकांच्या शंका व अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रानंतर कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रंथालयांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र व प्रतिष्ठानच्या योजनाविषयीच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. गजानन कुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आभार मानले.

00000

  

शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज 20 जुलैपर्यंत दाखल करावेत

*लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आवाहन

अमरावती, दि. 17 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज आणि तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यासाठी 20 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे, अशा विद्यार्थ्यांना गुण क्रमांकानुसार निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन छायाचित्र, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रांसह दि. 20 जुलै 2025 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

00000

जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी 26 जूनपासून विशेष मोहिम

अमरावती, दि. 17 (जिमाका) : राजर्श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम दि. 26 जूनपासून राबविण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समिती स्तरावर त्रृटी पूर्तता करण्यासाठी शिबीराचे आयोजन दि. 23 जून, दि. 25 जून, दि. 2 जुलै, दि. 4 जुलै 2025 यादिवशी करण्यात आले आहे. तसेच वेबीनार. दि. 27 जून आणि दि. 3 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे.

राजश्री शाहू महाराज जयंती पर्वनिमित्त दि. 26 जुन ते दि. 4 जुलै 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी, सीईटीमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे, तसेच डिप्लोमा तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर विशेष मोहिम शिबिराचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी परिपुर्ण ऑनलाईन अर्ज समिती कार्यालयात सादर करावेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी समितीमध्ये अर्ज सादर केला परंतु अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्रे मिळाली नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी त्रृटी पूर्ततेच्या शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.

00000

 

 

परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू

अमरावती दि. 17 (जिमाका) : परिवहनेत्तर दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी सोमवार, दि. 23 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनधारकांनी पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह परिवहन कार्यालयात अर्ज विहित कागदपत्रांसह जमा करावेत. लिलावासाठी उपस्थित राहणाऱ्या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह उपस्थित रहावे. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आल्यास अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल. उर्वरित कमी रकमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...