Monday, June 23, 2025

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025







                                             

                          शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

*जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमरावती, दि. 23 ( जिमाका ) : आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. विकसित भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.

वलगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेला जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज सकाळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरपंच सुधीर उगले, उपसरपंच दशरथ मानकर, तहसिलदार विजय लोखंडे, पोलीस निरीक्षक वैभव पानसरे, मुख्याध्यापक जावेद अहमद, विस्तार अधिकारी अजित पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना ठाकरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांना खुली केली. त्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्या तुलनेत जास्त आहे. आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, याचा आनंद आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. शासकीय शाळा खाजगी शाळांपेक्षा कुठेही कमी नाहीत. मी ही शासकीय शाळेचा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व जाणून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. बलस्थानावर लक्ष देऊन यश मिळवावे, असे सांगितले.

पालकांनीही मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे. शैक्षणिक कार्यासाठीच मोबाईलचा उपयोग व्हावा. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे वय आहे. विद्यार्थ्यांची प्रगतीची जबाबदारी ही शिक्षकांसह पालकांचीही आहे. भविष्यातील सुज्ञ नागरिक तयार करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालक या दोघांची असल्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे वाटप करुन त्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी देखील आम्ही चांगला अभ्यास करून प्रगती करू, असा मनोनिर्धार यावेळी व्यक्त केला. विद्यार्थी, शिक्षक गण, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

0000

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते

*प्रतिसाद न देण्याचे आवाहन

अमरावती, दि. 23 : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे. यावरून विविध प्रकारच्या विनंत्या पाठविण्यात येत आहे. यास कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या नावे बनावट खाते करून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे. तसेच सैन्य दलातील मित्राचे फर्निचर विकायचे असल्याची पोस्ट करण्यात आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार असल्याने त्यास प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकारची कोणतीही पोस्ट किंवा खाते तयार करण्यात आले नसून नागरिकांनी बनावट खात्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये किंवा संपर्क साधू नये. यात नागरिकांची फसवूणक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे फसवणूकीचे संदेश आल्यास स्विकारू नये किंवा ब्लॉक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

000000

अमरावतीकर उद्योजकांसाठी संधी: 26 जून रोजी उद्योजक मेळावा

            अमरावती, दि. 23 (जिमाका): व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ‍‘दे आसरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ए. वि. थिएटर (सभागृह), मराठी विभागात होणार आहे.

               या मेळाव्यात पुणे येथील मॅनेजमेंट थियाट्रिक्स, स्टिम्युलेटर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि कन्सल्टंट डॉ. रवींद्र आहेर मार्गदर्शन करणार आहेत. अमरावतीचे युवा उद्योजक आणि ईसीई इंडिया एनर्जीज प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक अमित आरोकर यांची विशेष मुलाखत घेण्यात येणार आहे, ज्यातून त्यांच्या यशस्वी उद्योजकतेचा प्रवास उलगडेल.

या उद्योजक मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला मोफत उद्यम प्रमाणपत्र काढून मिळणार आहे, जो त्यांच्या व्यवसायासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.

अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. उपस्थिती नोंदवण्यासाठी https://forms.gle/vnbzshL8h7varWqU6 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. कोणत्याही अडचणीसाठी 9730862870 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...