Saturday, June 14, 2025

लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे

 








लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे

अमरावती, दि. १४ : शासनाच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागण्यांबाबत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आज उपोषण आज मागे घेतले. शेतकरी, दिव्यांग आणि इतर घटकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.

 

यावेळी आमदार अमोल मिटकरी, कमलताई गवई आदी उपोषण स्थळी उपस्थित होते. गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी याआधी उपोषणाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे मांडल्या होत्या.

 

दरम्यान आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. उपोषणकर्त्याच्या मागण्यांबाबत शासनाने गंभीरपणे दखल घेतली आहे. काही मागण्यांबाबत निर्णय झाला आहे. बच्चू कडू यांचे आंदोलने जवळून पाहिलेली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने काळजीपोटी भेट दिली आहे. शासनाच्या वतीने मागण्यांबाबत पत्र दिले आहे. त्यांनी विनंतीचा मान ठेवल्याबद्दल आभार मानतो. बच्चू कडू यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. शेतकरी दिव्यांग यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उपोषणकर्त्यांनी पूर्ण विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे श्री. सामंत यांनी आभार मानले.

 

बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आणि मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता करण्यात येत आहे असे सांगितले.

०००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...