Saturday, June 21, 2025

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025





आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' संकल्पना 

अमरावती, २१ (जिमाका): आयुष मंत्रालय, नवी दिल्ली आणि जिल्हा प्रशासन, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात आज ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ' या यंदाच्या जागतिक संकल्पनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विभागीय क्रीडा संकुलाच्या इनडोअर सभागृह येथे आमदार संजय खडके, विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते. 

आमदार श्री. संजय खडके यांनी आज संपूर्ण जगाने योग स्वीकारले आहे. ताणमुक्त, भयमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी नियमित योगाभ्यास आणि व्यायाम करण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलातील सुविधा अत्याधुनिक करण्याबाबत त्यांनी कटिबद्धता व्यक्त केली.

विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांनी योगाची प्राचीन काळापासूनची परंपरा आणि आजही मोठ्या प्रमाणात, पारंपरिक पद्धतीने तो कसा केला जातो, याचे महत्त्व सांगितले. योग दिनानिमित्त मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी योगपटूंना नियमित योग करण्याचा आग्रह धरला. प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी म्हणजे योग. योगामुळे माणसाला आंतरिक आणि बाह्य स्वरूपात निरोगी राहून दीर्घायुष्य लाभते, असेही ते म्हणाले. 

   योग दिनाची सुरुवात २०१४ मध्ये प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात केलेल्या संबोधनानंतर झाली, तेव्हापासून योग दिनाचे महत्त्व जगभरात पोहोचले. गेल्या ११ वर्षांपासून जागतिक योग दिन साजरा होत असून, संपूर्ण जगात योगाचा प्रचार आणि प्रसार होत आहे.
   जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग, शारीरिक शिक्षक संघटना, नेहरू युवा केंद्र, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत आणि किसान पंचायत, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ, जिल्ह्यातील विविध योग संघटना, विविध क्रीडा संघटना आणि क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग दिन यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.
योग दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेट्टीये यांनी सादर केली. याप्रसंगी ईश्वरी गांजरे या चिमुकलीने योगाची रांगोळी काढल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते कौतुक व सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते योग पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिक्षण अधिकारी प्रिया देशमुख, नेहरू युवा केंद्राच्या स्नेहल बासुतकर, श्रीमती मोटवानी तसेच योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
******



डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या मखरातील माणसं या व्यक्तीचित्रणाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन
डाॅ. प्रतिमा इंगोले यांनी आजपर्यंत समाजातील लोकसंग्राहक माणसांविषयी लिहिलेल्या 'मखरातील माणसं' या व्यक्तीचित्रणात्मक ग्रंथाचे नुकतेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विमोचन झाले. यावेळी मखरातील माणसं या व्यक्तीचित्रणाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन होते आहे, याचा मला अतिशय आनंद झाला आहे. या संग्रहात महाराष्ट्रावर छाप असणाऱ्या लोकप्रिय माणसांची चित्रणे आहेत. मुख्य म्हणजे लोकसंत गाडगेबाबांवर एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणारा लेख आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या संग्रहाचे प्रकाशन करणे महत्वपूर्ण आहे, असे म्हणाल्या. जिल्हाधिकारी यांनी हा संग्रह मी नक्की संपूर्ण वाचतो. मला त्यात आनंद आहे, असे म्हणाले. प्रतिमा इंगोले यांचे सदर पुस्तक सत्यानऊवे असून, चरित्रात्मक दुसरा ग्रंथ आहे. यापूर्वी एका स्वातंत्र्य सैनिकावर 'एक पणती उजेडासाठी' हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्यानंतरचा हा दुसरा मौलिक ग्रंथ आहे.
00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...