कृषि निविष्ठांमध्ये लिंकींग झाल्यास सक्त कारवाई करावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 4 (जिमाका) : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची लिंकींगमध्ये पिळवणूक होऊ नये, यासाठी राज्यस्तरावरून निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या स्तरावर कृषि निविष्ठांमध्ये लिंकींगचे प्रकार झाल्यास कृषि विभागाने सक्त कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज कृषि विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, खरीप हंगामात सुरवातीला बियाणे कमी पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकरी विशिष्ट वाणाचा आग्रह करीत असल्यामुळे या बियाणांचा तुटवडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनीस्तरावर प्रयत्न करून बियाणांची उपलब्धता होईल, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. कापूस पिकांसाठी पर्यायी असलेल्या वाणांची पेरणी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती द्यावी. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासूनच विक्रीसाठी ठेवण्यात यावे. कोणत्याही परिस्थिती बोगस आणि प्रतिबंधित बियाणांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासोबतच येत्या काळात खतांच्या उपलब्धतेबाबत प्रयत्नशील राहावे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पिक विमा, आपत्कालीन मदत आदी योजना राबविण्यात येत आहे. या सर्वांचा लाभ मिळविण्यासाठी आता ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणी क्रमांक मिळविणे आवश्यक आहे. यात ग्रामस्तरावर शिबीर घेऊन नोंदणीची गती वाढवावी. यात येणाऱ्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात नोंदणी करण्यावर लक्ष देण्यात यावे. आत्मा, स्मार्ट आणि कृषि संजीवनी प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात यावी.
शेतकऱ्यांना पतपुरवठा हा महत्वाचा घटक आहे. 78 टक्के रक्कमेचे कर्जवाटप झालेले असले तरी सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने अल्प, अत्यल्प शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी कर्जाची रक्कम भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून कर्ज भरून त्यांना नव्याने कर्ज देण्याची कार्यवाही करण्यात यावी. कर्ज देताना सीबिल स्कोअर तपासण्यात येऊ नये, या प्रकारची तक्रार आल्यास कठोर कारवाई करावी. यासोबतच कृषि विभागाने अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त सुशासन, महिला सक्षमीकरण आणि जलसंधारणाची कामांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले.
000000
उच्च रक्तदाबावर नियंत्रण महत्त्वाचे: जागतिक रक्तदाब दिनानिमित्त आवाहन
अमरावती, दि. 4 (जिमाका) : जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त (17 मे) 'रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रण ठेवा आणि दीर्घायुषी राहा' असे आवाहन करण्यात आले. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
जगभरात 1.28 अब्जाहून अधिक प्रौढांना उच्च रक्तदाब आहे, जो जागतिक स्तरावर एक प्रमुख आरोग्य धोका बनला आहे. विशेषतः भारतात, प्रत्येक तिसरा व्यक्ती या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आणि यातील जवळपास निम्म्या लोकांना याची जाणीवही नाही.
जास्त मीठ, तळलेले पदार्थ, साखर, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि अनुवांशिक इतिहास हे उच्च रक्तदाबाचे प्रमुख जोखीम घटक आहेत. अनेकदा कोणतेही लक्षण न दिसल्याने हा आजार ओळखणे कठीण होते.
प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी च आरोग्यदायी आहार, मर्यादित व्यसने, नियमित व्यायाम, योगासने, ध्यान, आणि रक्तदाबाची नियमित तपासणी आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणेही महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय रुग्णालयात उच्च रक्तदाबाची तपासणी आणि औषधोपचार निःशुल्क केले जातात. 30 वर्षांवरील प्रत्येकाने आपला रक्तदाब नियमित तपासण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे .
0000
अमरावती जिल्ह्यासाठी 1 कोटींचा ‘सौर ऊर्जा’ विकास निधी: गावांना विकासाची संधी
अमरावती, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाची पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत 'मॉडेल सोलर व्हिलेज' या योजनेसाठी पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांकडून करून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पात्र असलेल्या गावांकडून 16 जूनपर्यंत प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. स्पर्धेतील विजेत्या गावाला 1 कोटी रुपयांचा विशेष विकास निधी मिळणार असून, यातून गावात विविध सौर ऊर्जा आणि समुदाय-आधारित प्रकल्प राबवता येतील.
या निधीमुळे गावांना विविध कामे हाती घेता येणार आहेत. गावासाठी मोठे सौर ऊर्जा प्रकल्प (उदा. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम्स) उभारता येतील, ज्यामुळे संपूर्ण गावाला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा मिळेल.
महिला बचतगटांना विविध सौर-आधारित उपक्रमांसाठी 90 टक्के पर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन प्राप्त होईल.
गावातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि इतर शासकीय इमारती सौर ऊर्जेवर चालतील, ज्यामुळे विजेचा खर्च वाचेल आणि पर्यावरणीय फायदा होईल.
यामुळे गावातील रस्ते सौर दिव्यांनी प्रकाशित होतील, ज्यामुळे सुरक्षितता वाढेल. याव्यतिरिक्त, इतर सौर-आधारित तंत्रज्ञानावर आधारित अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पही राबवता येतील.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध होतील, ज्यामुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी होईल.
प्राथमिक स्तरावरील सहकारी संस्था, डेअरी आणि मत्स्योद्योग प्रकल्पांसारख्या उपक्रमांना 90 टक्के पर्यंत आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र गावांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा ) , विभागीय कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा. कार्यालयाच्या domedaamravati@mahaurja.com या ईमेल आयडीवर अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2661610/ 8669911011 वर संपर्क साधता येईल, किंवा प्रत्यक्ष भेट देऊनही माहिती मिळवता येईल. हा निधी गावांना आत्मनिर्भर आणि ऊर्जा-कार्यक्षम बनवण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे , अशी माहिती विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी दिली आहे .
0000
अमरावतीत कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 55,925 शेतकऱ्यांची निवड!
महाडीबीटी पोर्टलवर यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांना 10 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 4 (जिमाका ): कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर अमरावती जिल्ह्यातील 55,925 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या शेतकरी आणि घटकांची सुमारे 20 कोटी रुपयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील निवड झालेल्या 55,925 शेतकऱ्यांना कृषी आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत लवकरच लघुसंदेश (SMS) पाठवले जात आहेत. ही यादी महाडीबीटी (DBT) पोर्टल, कृषी विभागाचे संकेतस्थळ तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या लॉगिनवरही उपलब्ध आहे.
ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तात्काळ पूर्वसंमती मिळेल. पात्र लाभार्थ्यांकडून 10 दिवसांत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास, त्यांचा अर्ज आपोआप रद्द होईल. प्रोफाईल 100 टक्के पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी AGRISTACK फार्मर आयडीच्या आधारे https://mahadbt.maharashtra.
या योजनेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे), प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन), एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषी यांत्रिकीकरण उप - अभियान आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यांचा समावेश आहे. एकूण 55,925 शेतकऱ्यांसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे अनुदान निश्चित करण्यात आले आहे , अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे .
000000
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन
अमरावती, दि. 04 (जिमाका):बँक ऑफ महाराष्ट्र व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण
संस्था, अमरावती संस्थेद्वारे ३५ दिवसीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे. ह्यामध्ये ६० महिला सहभागी आहेत. प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला अंचल प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र व सह-अध्यक्ष महेश डांगे, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था संचालक निखील भस्मे उपस्थित होते.
श्री. डांगे यांनी प्रशिक्षणार्थी यांना व्यवसायाचे महत्त्व सांगितले. व्यवसाय करत असताना त्यामध्ये सातत्य असणे खूप आवश्यक आहे. सकारात्मक विचार केल्यास यशाचा रस्ता मोकळा होतो सांगून उपस्थिताना मार्गदर्शन केले. श्री. भस्मे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दीपक माहुरे यांनी मानले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment