Tuesday, June 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 08.06.2025

 जिल्हाधिकाऱ्यांचा पहिला दोन दिवसांचा दौरा मेळघाटात  

*विविध विकास योजनांचा घेतला आढावा

अमरावती, दि. ८ : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आपला जिल्ह्यातील पहिलाच दोन दिवसांचा दौरा दुर्गम मेळघाटातील धारणी तालुक्यात केला. या दौऱ्यात त्यांनी आदिवासी विकास, आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक प्रशासनाला विकासाची दिशा मिळाली आहे.

दौऱ्यात आदिवासी विकास विभागांतर्गत प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. या सभेत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित आश्रमशाळेतील प्रवेश तसेच इतर विविध योजनांवरील कामकाजाची माहिती घेण्यात आली. सर्व शासकीय योजनांचे लाभ तळागाळातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सूचना दिल्या.

धारणी प्रकल्प कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तिथीनिमित्ताने प्रतिमा पूजन करून मानवंदना अर्पण केली. त्यांनी शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

त्यानंतर त्यांनी धारणी तहसील कार्यालय येथे भेट देऊन पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीमधील बाधित शेतकऱ्यांच्या ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीविषयी संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अत्याधुनिक रक्तपेढीचे निरीक्षण केले आणि नवीन इमारतीची पाहणी केली. आरोग्य सेवांच्या दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल असलेल्या कुपोषित बालकांच्या कुटुंबासोबत संवाद साधला.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित 'सुसंवाद' कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी आशा सेविकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार केला. त्यांनी आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक करत, विविध अडचणींबाबत सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर धारणी येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वृक्षारोपण केले.

दौऱ्यामध्ये उपवनसंरक्षक अग्रीम सैनी, विभागीय वनाधिकारी यशवंत बाहाळे, तहसीलदार प्रदीप शेवाळे, गट विकास अधिकारी विजय गायकवाड, प्रकल्प अधिकारी राहुल ठोंबरे, मुख्याधिकारी राजेश माळी आदी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...