पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाहनाला जिल्हा प्रशासनाचा उस्फूर्त प्रतिसाद
एक पेड माँ के नाम उपक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण
* जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते आईच्या नावे वृक्षारोपण
* 5 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या निर्देशाने जिल्ह्यात राबविणार अनेक उपक्रम
अमरावती , दि. 5 (जिमाका) : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येकाने आपल्या घरासमोर आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या पार्श्वभूमीवर आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत त्यांच्या आईच्या नावे पिंपळाचे रोप लावून वृक्षारोपण केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले. यावेळेला अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी श्री विवेक जाधव, पालकमंत्री यांचे स्वीय सहा. विपीन पिसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'एक पेड माँ के नाम' उपक्रमात जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वयंसेवी संस्था , विद्यार्थी, सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पर्यावरण दिना निमित्त 'एक पेड माँ के नाम' हे अभियान राबविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होत असताना पर्यावरणाचे संतुलन ढळू नये यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या घराच्या आवारात एक रोप लावावे. प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने वृक्षारोपण कार्यक्रम राबवावा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 15 ऑगस्टपर्यंत उद्दिष्ट ठेवून वृक्षारोपण ड्राईव्ह कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. येणाऱ्या पिढीला आपल्याला संतुलित पृथ्वीचा वारसा सोपवायचा आहे, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यावेळी म्हणाले.
यावेळी तहसिलदार, उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नोंदणी करावी
अमरावती, दि. 5 (जिमाका): शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांची नावे मागविण्यात येत आहेत. जे माजी सैनिक दर शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे त्वरित नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सेना मेडल (निवृत्त) मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे. माजी सैनिक विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. जसे कवायत, सैन्य सेवेतील वैयक्तिक अनुभव, युद्धवीरांच्या शौर्यकथा, देशभक्तीपर चित्रपट आणि माहितीपटांमधील लघु क्लिप्सचे प्रदर्शन, स्वयंशिस्त, योग्य केस कापणे, स्वच्छ आणि लहान नखे ठेवणे, योग्य गणवेश परिधान करणे, पॉलिश केलेले बूट इत्यादी. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी आपली नावे 0721-2661126 या दूरध्वनी क्रमांकावर कळवावीत. किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी आर्मी नंबर, रँक, नाव, तालुका, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आवश्यक आहे.
00000
डाक अदालत 9 जून रोजी
अमरावती, दि. 05 (जिमाका) : भारतीय डाक विभागामार्फत डाक अदालतीचे आयोजन 9 जून 2025 रोजी प्रवर अधीक्षक, डाक घर अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
विभागातील पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर याबाबत तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग, अमरावती 444602 यांच्याकडे सादर करावा. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीसह उल्लेख करुन दि. 9 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवावे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.
00000
डीबीटीमुळे अमरावती जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना थेट अनुदान
अमरावती, दि. 05 (जिमाका): अमरावती जिल्ह्याने शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी) योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
डिसेंबर 2024 पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेअंतर्गत, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या हजारो लाभार्थ्यांना थेट त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. मे 2025 पर्यंतचे अनुदान वितरीत झाले असून, अमरावती जिल्हा डीबीटी पोर्टलवर सर्वाधिक लाभार्थी नोंदणी आणि अनुदान वितरणात राज्यात आघाडीवर आहे.
शासन निर्णयानुसार, जानेवारी 2025 पासून केवळ आधार प्रमाणित लाभार्थ्यांनाच डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य दिले जात आहे.
सद्यस्थितीत 2 जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संजय गांधी निराधार योजनेचे 87 हजार 073 लाभार्थी डीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत असून, त्यापैकी 75 हजार 977 आधार प्रमाणित आहेत आणि 62 हजार 400 लाभार्थ्यांना मे महिन्याचे अनुदान प्राप्त झाले आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत 1 लाख 61 हजार 651 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून, 1 लाख 35 हजार 162 आधार प्रमाणित आहेत आणि 1 लाख 13 हजार 069 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 लाख 48 हजार 724 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 11 हजार 139 जणांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, 1 लाख 75 हजार 469 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे. अनेक लाभार्थ्यांना एकापेक्षा जास्त बँक खाती असल्याने, अनुदान आधार लिंक केलेल्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले योजनेचे बँक खाते आधारशी लिंक करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यांनी त्वरित आपल्या बँकेच्या शाखेत आधारकार्डची प्रत जमा करून खाते आधारशी संलग्न करून घ्यावे. तसेच, ज्या लाभार्थ्यांची अद्याप डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली नाही किंवा आधार प्रमाणित नाही, त्यांनी अद्ययावत आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात सादर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुदत 20 जूनपर्यंत
अमरावती, दि. 05 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभाग विशेष मागास प्रवर्गातील ‘गोवारी’ समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी इंग्रजी माध्यम निवासी शाळा चालविणाऱ्या व इच्छुक असलेल्या नामांकित संस्था, शाळांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने शाळा निवडीचे निकष, पात्रता, अटी व शर्ती या विभागाच्या 14 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहितीसह www.maharashtra.gov.in या संकेतस्तळावर उपलब्ध आहेत. इच्छुक शैक्षणिक संस्था, शाळांनी दि.20 जनू 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत माहितीसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती या कार्यालयात शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरुन परिपुर्ण अर्ज सादर करावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक गजेंद्र मालठणे यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment