डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न
अमरावती, दि. 25 (जिमाका): श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
खासदार बळवंत वानखडे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय आचलिया, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यावेळी उपस्थित होते.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, मी 'डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ'चा विद्यार्थी आहे. न्यायिक शिक्षणाबाबत मला महाविद्यालयाकडून बाळकडू मिळाले. मी या महाविद्यालयाच्या ऋणी आहे. येत्या काळातही माझ्या हातून संविधानाच्या चौकटीत राहून न्यायदानाचे कार्य सुरू राहील व यातून देशाची सेवा करीत राहील.
न्यायदानाचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाने सदसद विवेक बुद्धीने न्यायदानाचे कार्य करावे. येथील विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात वंचितांना न्याय मिळवून देण्याची आपल्या पदाचा उपयोग करावा. हा सत्कार सोहळा माझ्या महाविद्यालयात होत असल्यामुळे मला हा कौटुंबिक सोहळा वाटत असल्याचे ते यावेळी म्हणाले
उच्च न्यायालयाचे न्या. श्री. आचलिया,तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या वतीने सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य वर्षा देशमुख यांनी तर आभार प्राची कडू यांनी मानले.
000000
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनअमरावती, दि.26 (जिमाका) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000
आणीबाणीच्या काळातील घटनांवर आधारित प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 26 (जिमाका) : देशात 25 जून 1975 रोजी लागू झालेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या काळातील आव्हानात्मक परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा देण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनीच या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला त्या काळातील घटनांचा इतिहास आणि लोकशाहीच्या संरक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे. आणीबाणीच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आणीबाणीशी संबंधित विविध घटना, घडामोडी, त्या काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या मान्यवरांची छायाचित्रे, तसेच संक्षिप्त माहितीपूर्ण मजकूर आणि माहिती फलकांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
00000
चिखलदारा पर्यटन स्थळी ये जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 26 (जिमाका) : चिखलदरा हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. प्रामुख्याने शनिवार व रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक वाहनांनी चिखलदरा येथे येत असतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने पर्यटकांनी चिखलदार पर्यटन स्थळी जाण्यायेण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम व मोटार वाहन कायदा अन्वये 28 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीतील दर आठवडयाचे शनिवार व रविवार या दिवशी चिखलदरा येथे येण्यासाठी परतवाडा ते चिखलदरा या मार्गावरील वाहतुक ही परतवाडा वरून धामणगाव मार्गे चिखलदरा या मार्गाने तर चिखलदरा येथून जाण्यासाठी चिखलदरा ते परतवाडा या मार्गावरील वाहतुक घटांग, परतवाडा या प्रकारे एक मार्गी (वन-वे) वळविण्याचे आदेश श्री. येरेकर यांनी निर्गमित केलेले आहे.
चिखलदार पर्यटन स्थळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्यातील तीन महिन्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक चारचाकी, दुचाकी, ऑटो, ट्रॅव्हर्ल्स, बस अशा वाहनांनी चिखलदरा येथे येत असतात. प्रामुख्याने पर्यटक हे चिखलदरा ते परतवाडा या मार्गाचा वापर करतात. हा रस्ता अरूंद असून नागमोडी वळणाचा आहे. चिखलदरा हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत असून जंगलातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात संचार करीत असल्याने रस्त्यावर येतात. त्यामुळे वन्यप्राण्यांसोबतही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील येणारी व जाणारी वाहतुक एक मार्गी (वन-वे) वळविण्यात आली आहे. चिखलदारा पर्यटनस्थळी जाताना पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अमरावतीत स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा
अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम व प्रभावी व्हावे, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अमरावती शहरातून आयएएस (IAS) झालेले तसेच एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी उपस्थित राहणार असून, या वेळी त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर तसेच यशस्वी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उमेदवारांना त्यांच्या यशाचे रहस्य, अभ्यासाचे तंत्र आणि प्रशासकीय सेवेतील संधींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा प्रशासन अमरावतीच्या वतीने आयोजित हा उपक्रम, प्रशासकीय सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे. इच्छुकांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
No comments:
Post a Comment