Tuesday, June 24, 2025

DIO NEWS AMRAVATI 24.06.2025

 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज अमरावती दौरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे उद्या बुधवार, दि. 25 जून रोजी दिल्ली येथून अमरावतीला आगमन होईल. सायंकाळी 6 वाजता कठोरा रोडवरील पी.आर. पोटे इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्वामी विवेकानंद सभागृहात अमरावती जिल्हा वकील संघामार्फत आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. रात्री राखीव. गुरूवार, दि. 26 जून रोजी सोयीनुसार अमरावतीहून छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण.

000000

आणीबाणीवर आधारित जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आज उद्घाटन

अमरावती, दि. 24 (जिमाका) : देशात 1975 ते 1977 दरम्यान आणिबाणी होती. या काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आल्या आणि प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादली गेली. याबाबत आवाज उठवणाऱ्या अनेक व्यक्तींना तुरुंगवास झाला. त्याचे स्मरण म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, बुधवार, दि. 25 जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे  या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त श्वेता सिंघल तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

            आणीबाणी संदर्भातील प्रदर्शनासोबतच यावेळी  ज्या व्यक्तींना बंदिवास भोगला अशा आणीबाणीतील कार्यकर्ते तसेच नागरिकांचा प्रशासनामार्फत महसूल भवन येथे सन्मानित केले जाणार आहे. या समारोहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र बहाल केले जाणार आहे.

            या समारोहास जिल्ह्यातील सर्व मिसा व डीआयआर अंतर्गत आणिबाणी सन्मानधारक यांना समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर  यांनी केले आहे.

00000

पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप येत्या 27 जूनला

अमरावती, दि. 24 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 19 भूमिहीन लाभार्थ्यांच्या शेतजमिनीला जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्यता दिली आहे. शुक्रवार, दि. 27 जून 2025 रोजी पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना शेतजमिनीच्या पट्ट्यांचे वितरण केले जाणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश 18 ते 60 वयोगटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील पिढ्यानपिढ्या भूमिहीन असलेल्या शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, त्यांचे राहणीमान उंचावणे आणि मजुरीवरील त्यांचे अवलंबित्व कमी करून त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळवून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत अशा भूमिहीन शेतमजूरांना त्यांची शेतमालक होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन कसण्याकरिता उपलब्ध करून दिली जाईल.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2025-26 या वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवशाली अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. याच अभियानाअंतर्गत समाजातील वंचित, दुर्बल घटकांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असलेल्या तब्बल 19 लाभार्थ्यांना शेतजमीन वाटपासाठी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे.

या योजनेअंतर्गत शेतमालक म्हणून निवड झालेल्या भूमिहीन लाभार्थ्यांना, तसेच विधवा व परित्यक्ता महिलांना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्याहस्ते शेतजमिनीचे मूळ आदेश तसेच शेतजमिनीचा मूळ पट्टा  यावेळी वितरीत करण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवशाली अभियानाअंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर, तसेच विधवा व परित्यक्ता महिला, आणि नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत पीडित महिलांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील 100 लाभार्थ्यांना शेतजमीन वाटप करण्याचा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा मानस आहे. याबाबत उचित कार्यवाही सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत केली जात आहे. जिल्हाधिकारी श्री.  येरेकर यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...