Thursday, July 3, 2025

DIO NEWS AMRAVATI 03.07.2025

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
शेतकऱ्यांना आवाहन

अमरावती, दि. 3 (जिमाका) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 साठी जिल्ह्यातील शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय विमा कंपनीची निवड करण्यात आली असून, या योजनेमुळे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्यास मदत होईल. विमा काढण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. कृषी विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जुलैपर्यंत पिकाचा विमा काढून घ्यावा. योजनेबद्दल सविस्तर माहितीसाठी गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका स्तरावर तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

योजनेमुळे शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, अन्नसुरक्षा, पिकांचे विविधिकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकता वाढवणे हे या योजनेचे महत्त्वाचे हेतू आहेत. इतर व्यक्तींच्या नावाने, तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल. योजनेत सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्र. (AGRISTACK Farmer ID) असणे अनिवार्य असेल आणि पीक विमा नुकसान भरपाईसाठी, ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, 7/12, 8-अ, आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयं घोषणापत्र यांचा समावेश आहे.

विविध पिकांसाठी संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता (प्रति हेक्टर) खालीलप्रमाणे:

भात (तांदूळ)- विमा संरक्षित रक्क्म  61 हजार, विमा हप्ता 152.50 रुपये, ख. ज्वारी-विमा संरक्षित रक्कम  32 हजार 900, विमा हप्ता 82.25 रुपये, सोयाबिन- विमा संरक्षित रक्कम 55 हजार 900, विमा हप्ता 559 रुपये, मूग- विमा संरक्षित 26 हजार 600 विमा हप्ता 532 रुपये, उडीद- विमा संरक्षित 25 हजार, विमा हप्ता 62.50 रुपये, तूर विमा संरक्षित 45 हजार 700, विमा हप्ता 457 रुपये, कापूस- विमा संरक्षित 60 हजार, विमा हप्ता -750 रुपये, मका -विमा संरक्षित 36 हजार, विमा हप्ता 90 रुपये.

 सी. एस .सी केंद्रामार्फत अर्ज करण्यासाठी शेतकरी हिस्सा रक्कम प्रति हेक्क्टर या पेक्षा अतिरिक्त  पैसे घेतल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभाग, तहसिल कार्यालयास तक्रार करावी. जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा व तशी तक्रार नोंदवावी. असे आवाहन केले आहे.

*****                                                                                              

फळपीक विमा योजनेसाठी 6 जुलैपर्यंत नोंदणीची संधी

       अमरावती, दि. 3 (जिमाका): जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार 2025-26  अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत 6  जुलै 2025 पर्यंत आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे फळपिकांचे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. जिल्ह्यासाठी भारतीय विमा कंपनीची निवड झाली असून, राज्य शासनाने या योजनेस दोन वर्षांसाठी (2024-25 आणि 2025-26) मान्यता दिली आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील आणि त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, डाळिंब आणि सीताफळ या अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी अनिवार्य आहे.

पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबीसाठी आधार संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे 3 ते 6 जुलै 2025 अशी 4 दिवसांची विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन विहित मुदतीत विमा हप्ता भरून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा.

****
 

उर्ध्व वर्धातून खरीप सिंचनासाठी 3 पाणी पाळ्या प्रस्तावित शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 3 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणी साठा उपलब्ध असुन 3 पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दि. 31 जुलै 2025 पर्यंत संबंधित शाखा कार्यालयास अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

             उजवा मुख्य कालवा 0 ते 95.50 कि.मी. पर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 0 ते 42.40 कि.मी. पर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरीका, जलाशयावरील अधिसूचित नदी- नाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तेथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार पुच्छ भागाकडून ते मुखाकडे (टेल टू हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे. कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजुर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्रमांक 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. ते भरून दि. 31 जुलै पर्यंत तेथे सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

00000

महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज 2025-26 साठी पोर्टल सुरु ;
विद्यार्थ्यांना मुदतवाढ

अमरावती, दि. 3 (जिमाका) : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित झाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यास पासून सुरुवात झाली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे नवीन/नूतनीकरण अर्ज तसेच 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे 'रि-अप्लाय' अर्ज भरण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनांमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाचे आणि नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर भरणे सुरु आहे. सर्व अर्ज शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत.

जिल्ह्यातील सर्व पात्र अनुसूचित जाती आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन करण्यात येत आहे की, महाविद्यालयांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नोंदणीकृत अर्जांची संख्या वाढवावी आणि समानसंधी केंद्रांच्या समन्वयकांमार्फत विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावे असे आवाहन, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

00000

कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
 अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै

          अमरावती, दि. 3 (जिमाका) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने सन 2024 साठी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी आणि संस्थांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यासाठी पात्र शेतकरी आणि संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

          पुरस्कार आणि त्याचे स्वरूप:

 यामध्ये 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- 3 लक्ष रुपये, 'वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार', 'जिजामाता कृषिभूषण पुरस्कार', 'कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार' प्रत्येकी 2 लक्ष रुपये, 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' 1 लक्ष 20 हजार रुपये, 'उद्यान पंडित पुरस्कार' 1 लक्ष रुपये, 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार' (सर्वसाधारण व आदिवासी गट) 44 हजार रुपये तसेच 'युवा शेतकरी पुरस्कार' (वयोमर्यादा कमाल 40 वर्षे) 1 लक्ष 20 हजार रुपये असे पुरस्कारही प्रदान केले जातील. प्रत्येक पुरस्कारात रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार करण्यात येईल.

          अटी व शर्ती:

अर्जदारांकडे स्वतःच्या नावावर शेती असणे, शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असणे, कृषी क्षेत्रात अति-उल्लेखनीय कार्य करून अधिक नफा मिळवलेला असणे या मुख्य अटी आहेत. सेंद्रिय शेतीसाठी पीजीएस प्रमाणीकरण आवश्यक आहे. तसेच, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सन 2024 चा चारित्र्य पडताळणीचा दाखला आणि 7/12, 8-अ सादर करणे बंधनकारक आहे.

          अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै 2025 पर्यंत आहे. इच्छुकांनी याची नोंद घेऊन संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तीन प्रतींमध्ये अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

 

--

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18.07.2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर *एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार अमरावती, ...