Friday, August 1, 2025

DIO NEWS AMRAVATI 01.08.2025

                                          















प्रत्येकाने पर्यावरणाचा दूत म्हणून कार्य करावे

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 1 (जिमाका): संतांची भूमी असलेल्या जिल्ह्यात गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पर्यावरण विकासाचा संदेश दिला आहे. महापुरूषांनी दिलेला मोलाची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणून पर्यावरणाचा दूत म्हणून कार्य करावे, यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

नांदगाव पेठ औद्योगिक परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार राजेश वानखडे, माहुलीच्या सरपंच प्रिती बुंदिले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राम लंके, विभागीय वन अधिकारी दर्शना पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, सहायक वनसंरक्षक पुष्पलता बोंडे, गटविकास अधिकारी श्री. सुपे, वाईल्डलाईफ अवेअरनेस रिसर्च ॲण्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कांचनपुरे, सचिव डॉ. वडतकर, राघवेंद्र नांदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल हा आता प्रत्येक नागरिकाला भेडसावणारा प्रश्न झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून हरीत महाराष्ट्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण करून नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशपातळीवर एक पेड माँ के नाम उपक्रम राबविण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या आवाहनानुसार पुढाकार घेऊन एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.

आमदार श्री. वानखेडे यांनी आईच्या स्मरणार्थ झाड लावण्याचा उपक्रमात नागरिकांनी झाडे लावावीत. वृक्षारोपणामुळे पर्यावरण संतुलीत राहण्यास मदत होणार आहे. केवळ झाडे लावल्याने निसर्गातील सर्व बाबींचे आपोआप संतुलन होते. त्यासाठी जिल्ह्यात एक लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करावे. तसेच प्रशासनातर्फे होणाऱ्या वृक्षारोपणात सहभागी होऊन नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि सहभागी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. या उपक्रमात भारतीय महाविद्यालय, स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, तक्षशिला महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले. महसूल विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, अमरावती महापालिका, रास्तभाव दुकानदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. अनिल भटकर यांनी आभार मानले.

00000













स्वस्थ जीवनशैली अनुसरून नागरिकांचे आयुष्य बदलावे

-जिल्हाधिकारी यांचे महसूल कर्मचाऱ्यांना आवाहन

*महसूल दिनी डॉ. अविनाश सावजी यांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. 1 (जिमाका) : जिल्हा प्रशासनात महसूल विभागाकडून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी असंख्य योजना राबविण्यात येतात. त्यामुळे यंत्रणांकडे येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन बदलण्याची क्षमता या विभागात आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वस्थ जीवनशैली अनुसरून नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात महसूल दिनानिमित्त डॉ. अविनाश सावजी यांच्या मार्गदर्शनासह विविध लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, श्रद्धा उदावंत, तिवसा उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, जिल्हा सूचना अधिकारी मनिषकूमार, विधी अधिकारी ॲड. नरेंद्र बोहरा, तहसिलदार निलेश खटके प्रशांत पडघन आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी महसूल विभागात कार्य करीत असताना निश्चयाने कामे करावीत. नागरिकांच्या समस्यांसाठी महसूल विभागच त्यांना सहकार्य करू शकतो. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कार्यालयीन कामकाज करताना शरीरश्रम होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी गावभेटी वाढवाव्यात. यामुळे गावातील नागरिकांशी संवाद वाढण्यास मदत होईल. नोकरीतील तणाव कमी करण्यासाठी कामांचा निपटारा रोज करावा. आपल्यावर नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारी असल्यामुळे महसूल यंत्रणेने कणखर भूमिका ठेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

महसूल दिनानिमित्त स्वस्थ जीवनशैलीसाठी डॉ. अविनाश सावजी यांच्या ‘मानसिक ताणाव व्यवस्थापन’ यावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक आणि कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांसाठी डॉ. सावजी यांनी, विनाऔषधी आणि घरच्या चीज वस्तूंनी निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे. यासाठी ताजा आणि स्वच्छ आहार घ्यावा. प्रक्रिया केलेले अन्न, रिफाइंड तेलाचा वापर टाळावा. तसेच शरीरश्रमासाठी एका जागेवर न बसता क्रियाशील असावे. यासोबतच सामाजिक वातावरणात वेळ घालविल्यास ताण कमी होतो, तसेच निवृत्तीनंतर ध्येय ठेवून त्यानुसार कार्य करावे.

गेल्या दहा वर्षात सरासरी वजन दहा किलोने वाढले आहे. विविध आजारांचे कारण हे अनियंत्रित वजन असल्याने वजनावर नियंत्रण असावे. झोप हे सर्वात महत्वाची असून याकडे दुर्लक्ष करू नये. निरोगी आयुष्यासाठी पुरेसी झोप आवश्यक आहे. तसेच पांढरी साखर, तेल, मीठ, मैदा, बेकरी यापासून दूर राहावे. रंगीत फळे प्रतिकारशक्ती वाढवित असल्याने उपलब्ध फळांना महत्व देणे गरजेचे आहे. तेल आदी स्निग्ध पदार्थांचा उपयोग कमी करावा. यासोबतच कार्डीओ, स्ट्रेचिंग आणि मसल मजबूत करण्यासाठी व्यायाम करावा. संतुलित आहारासोबत ध्यान महत्वाचे आहे. स्वस्थ जीवनशैलीसाठी छंद जोपासणे, वेळेचा सदुपयोग करणे यासाठी प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पारधी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र, मुख्यमंत्री सहायता निधी लाभाचे वाटप, फ्री होल्ड जमीनीचे प्रमाणपत्र वाटप, पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र, सातबारावर पत्नीचे नाव असणारे लक्ष्मी मुक्ती योजना, जिवंत सातबारा, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, ई-शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. अनिल भटकर यांनी आभार मानले.

00000



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

अमरावती, दि.01 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...