शहरातील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करणार
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
नवीन पूल बांधण्याच्या शक्यता पडताळणार
पूल बांधणी संदर्भात रेल्वेशीही चर्चा सुरू
अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती बडनेरा रेल्वे मार्गावरील वाहतुकीसाठी असलेला पूल क्षतीग्रस्त झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून याबाबत सर्व शक्यता पडताळून पाहण्यास जात आहे. लवकरच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉक्टर मेघा वासनकर आदी उपस्थित होते.
आमदार संजय खोडके यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत गुगल मॅपद्वारे सूचना करण्यात येत आहे. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. तसेच गर्दी टाळण्याकरिता नेहरू मैदान येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. नेहरू मैदान या पर्यायी रस्त्यामुळे बरीचशी वाहतूक नियंत्रित करण्यास मदत होईल, असे सांगितले.
आमदार सुलभा खोडके यांनी रेल्वेने सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक होते. सण उत्सवाच्या काळात अचानक रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यासह मुख्य बाजारपेठेतील चौकात असलेल्या पारधी समाजामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याने याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
रेल्वे मार्गावरील उडाणपूल क्षतीग्रस्त झाल्यामुळे वाहतूक नियंत्रणाची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक शाखा कार्य करीत आहे. उडाणपुलाच्या कामाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार उडाणपूल बांधावयाचे झाल्यास यासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करावे लागेल. तसेच पर्यायी रस्त्याची जागा कुणाला दिली असल्यास याचीही पाहणी करावी लागणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेने खातरजमा करावी. पर्यायी रस्त्याची जागा डीपी रस्त्यावर असल्याबाबत बघण्याचे महापालिकेला सूचना केल्या. सध्या शहरात गणेशोत्सव असल्यामुळे वाहतुकीची सद्यःस्थिती जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली.
000000
शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
अमरावती, दि. 28(जिमाका) : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात विविध भागात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
जिल्ह्यात जून, जुलै महिन्यासह ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतपिके बाधित झालेली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात 44 हजार 588 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात 272 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस, तूर, सोयाबीन, धान, मका आदींचे नुकसान झाले आहे.
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित 53 कुटुंबातील 216 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 896 घरांची अंशतः पडझड झाली आहे, तर 14 घरांची पूर्णता पडझड झाली आहे. आठ झोपड्या, गोठ्यांची पडझड झाली असून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच 24 लहान, तर 19 मोठे जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
शेतपिकांच्या नुकसानीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते आहे. यासाठी शासन स्तरावर पंचनामे सादर होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करावेत, तसेच या पंचनाम्यापोटी आवश्यक असणाऱ्या मदतीच्या रकमेची मागणी शासनाकडे नोंदवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
00000
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. 28 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार, दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समिती सभेला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता महानगरपालिका सभागृह येथे शासकीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी 5 वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे शासकीय बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजल्यापासून श्री गणेश उत्सवानिमित्त बुधवारा येथील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ आणि निलकंठ चौकातील निलकंठ गणेशोत्सव मंडळ, सायन्सकोर मैदान येथील रूख्मिणी गणेशोत्सव मंडळांना भेटी देतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
0000
ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 28 (जिमाका): राज्य शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण विभागातील चारही वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रूपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये, तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
सन 2024-25 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक ग्रंथमित्र यांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
00000
ओबीसी महामंडळाच्या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 28 (जिमाका): ओबीसी महामंडळातर्फे एक रक्कमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ थकीत कर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एक रक्कमी परतावा ओटीएस योजना दि. 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
आधारभूत दराने खरेदीसाठी ई पिक पाहणी आवश्यक
अमरावती, दि. 28 (जिमाका): येत्या हंगामापासून आधारभूत दराने खरेदीसाठी ई पिक पाहणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत ई पिक पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबिया, मुग, उडिद, सोयाबिन व तूर खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला सातबाराचा उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पाडली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment