सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 'एक खिडकी' प्रणाली
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*मंडळांना परवानग्या घेणे होणार सोपे
अमरावती, दि. 23 : येत्या काळातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळण्यासाठी एक खिडकी प्रणाली राबविण्यात येणार आहे. तसेच पोलिसांच्या परवानगीसाठी संबंधित पोलीस निरीक्षक निर्णय घेणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि इतर अनुषंगिक बाबीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार प्रशांत पडघन, निलेश खटके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी लागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, पोलीस, सार्वजनिक न्यास नोंदणी, नगरपालिका आदींच्या परवानग्या विनासायास मिळण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या सर्व परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र हे तातडीने मिळावेत, यासाठी एक खिडकी पद्धत राबविण्यात येणार आहे. मंडळांना एकाच ठिकाणी अर्ज देऊन संबंधित सर्व परवानगी त्याच ठिकाणावरून मिळणार आहे. तसेच पोलिसांकडून मिळणाऱ्या परवानग्या त्या भागातील पोलीस निरीक्षक यांच्याकडून दिल्या जाणार आहे. विविध परवानग्यांसाठी विविध कार्यालयांत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सोयीचे होणार आहे.
'एक खिडकी' प्रणालीमुळे यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या मिळवणे अधिक सोपे होणार आहे. तसेच गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करून गणेशोत्सव मंडळांनी शासनाने दिलेल्या नियमांनुसार सर्व परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment