Monday, August 11, 2025

DIO NEWS AMRAVATI 11.08.2025

 कल्याण समितीच्या दौऱ्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे

- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 11 (जिमाका) : अनुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्ह्यातील तीन दिवसांचा दौरा निश्चित झाला आहे. प्रशासकीय स्तरावर कोणतीही उणीव राहू नये, तसेच समितीमधील सदस्यांच्या संभाव्य माहितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दि. 19 ते 21 ऑगस्टच्या दरम्यान असलेल्या दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, तहसिलदार निलेश खटके, विजय लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे आदी उपस्थित होते.

समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सूचना केल्या. यात मागासवर्गीय कक्ष कार्यरत आणि याठिकाणी माहिती अद्यावत असल्याची खात्री करावी. समितीचे सदस्य हे विस्तृत आढावा घेत असल्याने त्यांचे समाधान होईल, अशी माहिती तयार करण्यात यावी. प्रामुख्याने दौऱ्यामध्ये आश्रमशाळा आणि वसतिगृहांना भेटी देण्यात येत असल्यामुळे याठिकाणच्या समस्या जाणून त्या पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. यासोबतच ॲक्ट्रॉसिटी अंतर्गत प्रकरणे असल्यास त्याची सद्यस्थिती तयार ठेवावी. तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे जात प्रमाणपत्र प्रलंबित असल्यास त्याचा पाठपुरावा करून प्राप्त करून घ्यावे.

पेसा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून कार्यवाही झाली असल्याची खातरजमा करावी. पोलिस, महावितरण मधील अधिसंख्य पदावरील माहिती तयार ठेवावी. एसटी महामंडळ, विद्यापीठ, शिक्षकांची भरती झाली असल्यास जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.

00000

एचएसआरपीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 11 (जिमाका): केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये राज्यातील सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी-एचएसआरपी बसविण्याची तरतूद केली आहे. दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याची मुदतवाढ संपुष्टात येत असल्यामुळे वाहनधारकांनी नंबर प्लेट अद्यापपर्यंत बसविलेली नाही किंवा अद्यापपर्यंत बसविण्यास पूर्वनियोजित दिनांक घेतलेली नाही, अशा वाहनांवर नियमानुसार वायुवेग पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परिवहन कार्यालातील वाहनाचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्र बदल करणे, वित्तदाता याचा बोझा चढविणे, उतरविणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, दृय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे आदी कामे करण्यास अडचण येईल. परंतु उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बुक केल्याची पावती कार्यालयात सादर केल्यानंतरच सदर काम करण्यात येणार आहे.

वाहनधारकांनी नंबर प्लेट बसविण्यासाठी पूर्वनियोजीत दिनांक घेतलेली आहे, त्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

000000

एडव्हेचेअर ट्रेनिंग केलेल्या माजी सैनिकांची माहिती पाठविण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील एडव्हेचेअर ट्रेनिंग केलेल्या माजी सैनिकांची माहिती या जिल्हा सैनिक कार्यालयाला दि. 20 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

माजी सैनिकांनी बेसीक माऊंटेनिअरींग कोर्स, ॲडव्हान्स माऊंटेनिअरींग कोर्स, पॅरा ग्लायडिंग, पॅरा जंम्पिग, रिव्हर राफ्टींग, एक्सपर्ट ईन स्वीमिंग या प्रशिक्षण कोर्स केला असल्यास माहिती कळवावी लागणार आहे.

00000

13 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

अमरावती, दि. 11 (जिमाका) : अमरावतीसह राज्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दाखल व दाखलपूर्व प्रकरणे तडजोड व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाहीत.

तडजोडपात्र प्रलंबित खटले राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत नजिकच्या जिल्हा किंवा तालुका न्यायालयाकडे संपर्क साधावा. सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे सामंजस्य आणि तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, तसेच सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.

0000






सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षेसाठी विशेष मोहीम

*आठ दुकानातील नमुन्यांचे संकलन

अमरावती, दि. 11(जिमाका): राज्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये अन्नसुरक्षेची खात्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या निर्देशानुसार राबवली जात आहे. यात आठ दुकांनामधील अन्न नमुने घेण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त, आणि जिल्हा दूध समिती अमरावतीच्या सदस्यांसमवेत शहरातील रघुवीर मिठाईया, सातूर्णा, अमरावती, तसेच वैष्णवी फुड प्रॉडक्ट्स, राजापेठ, बडनेरा रोड येथील मिठाई उत्पादक आस्थापनांच्या अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत तपासणी करण्यात आली. तसेच मिठाई आणि इतर अन्नपदार्थांचे एकूण आठ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन, जिल्हा दुग्ध विकास विभाग, जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही कारवाई सह आयुक्त स. द. केदारे आणि सहायक आयुक्त भा. कि. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, घ. प. दंदे, दुग्ध विकास विभागाचे विनोद पाठक, उपायुक्त डॉ. संजय कावरे आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. तुषार गावंडे यांचा सहभाग होता.

ही विशेष मोहीम ऑगस्ट ते डिसेंबर 2025 दरम्यान सातत्याने राबवली जाणार आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ तयार करताना योग्य स्वच्छता आणि शुद्धतेची काळजी घ्यावी. तसेच, ग्राहकांनी दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक फ्रिजमध्ये करावी आणि 24 तासांच्या आत त्यांचे सेवन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त भा. कि. चव्हाण यांनी केले आहे.

00000

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका): गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य स्तरावर पुरस्कार देण्याचे पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केले आहे. या गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी गणेशोत्सव मंडळानी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्काराकरीता सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य, नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, माहितीपट, चित्रपट स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन, पोशाख संस्कृती, खाद्यसंस्कृती, वाद्यसंस्कृती, संस्कृती संवर्धनासाठी अभिनव उपक्रम, पारंपारिक नाणी, शस्त्र, भांडी संग्रहाचे प्रदर्शन, साहित्यविषयक उपक्रम, लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन, तसेच राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय, राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती. जतन व संवर्धन आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहे.

सामाजिक उपक्रमात महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, ज्येष्ठ नागरीक, शैक्षणिक, आरोग्य, शैक्षणिक, कृषिविषयक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती, वंचित घटकांसाठी उपक्रम, तसेच कायमस्वरुपी सामाजिक उपक्रमात आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृद्धाश्रम, गाव दत्तक घेणे, वंचित घटकांसाठी सामाजिक सेवा, तसेच पर्यावरणपुरक मूर्ती, थर्माकोल, प्लास्टीक विरहीत पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदूषणरहित वातावरण, पारंपारिक देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधेत पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाहीत असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता आदी बाबी पाहण्यात येणार आहे.

उपक्रमांची पूर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. 26 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...