प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
*वितरीत निधी अखर्चित राहिल्यास कारवाई
*नगरपालिका सीसीटीव्ही निगराणीखाली आणणार
अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून प्रामुख्याने स्थानिकस्तरावरील कामे करण्यात येतात. यावर्षी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षा ही प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा नियोजन व विकास निधीबाबत बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार धीरज लिंगाडे, संजय खोडके, उमेश यावलकर, प्रविण तायडे, राजेश वानखेडे, केवलराम काळे, प्रताप अडसड, सुलभा खोडके, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, जिल्हा अधीक्षक पोलिस अधिकारी विशाल आनंद, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, विकसित भारताचे ध्येय ठरविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय आणि त्यानुसार जिल्ह्यात कामे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दौरा करून त्यांचे विकासाचे व्हीजन जाणून घेण्यात येणार आहे. यातून जिल्हा नियोजनमधून करणाऱ्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. या निधीतून करण्यात येणारी कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत, यात हयगय केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त गौरव अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा नियोजनचा 1 टक्के निधी वृक्षलागवडीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मेळघाटातील आरोग्याचा प्रश्न हाताळण्यासाठी मेळघाट आरोग्य परिक्रमा राबविण्यात येणार आहे. यातून जिल्हाभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबीर आयोजित करून उपचार करण्यात येतील. सुपर स्पेशालिटीमध्ये आयसीयू, रक्तपेढी, रेडीयेशन सेंटर उभारण्याबाबत लक्ष देण्यात येणार आहे.
मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधी उपलब्ध करण्यात येतील. त्यासोबतच शाळांमध्ये वर्गखोल्या स्मार्ट होण्यासाठीही मदत करण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. यासाठी गृह विभागाच्या मार्वल कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे उपलब्ध करण्यात येणार आहे. आवास योजनेतून 1 लाख घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांना पट्टेवाटप, गुंठेवारी कायद्यातून अनधिकृत ले आऊट नियमानुकूल करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच सर्वांना मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. प्रामुख्याने एमडी ड्रग्जची विक्री तसेच त्यामुळे शहरात वाढलेली गुन्हेगारी यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याच्या सुचना करण्यात आल्या. हॉटेलांना देण्यात आलेल्या परवान्यानुसार वेळ पाळण्यात यावी. परवान्याचे उल्लंघन होत असल्यास 24 तासाच्या आत परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरातील रेल्वे पुलासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत नवीन उपाययोजना करण्यासंदर्भातही माहिती घेण्यात आली. पुलाची दुरूस्ती करून हलकी वाहने आणि पादचारी यांच्यासाठी हा मार्ग खुला करण्याची शक्यता पाहण्याच्याही सूचना करण्यात आल्या. चिखलदऱ्यातील आकर्षण ठरणारा स्कायवॉक येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच चिखलदरा महोत्सवासह चार इको टुरिझम स्पॉट निवडण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून चिखलदऱ्यातील पर्यटकांचा ओढा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना त्यांच्या मागणीनुसार निधी देण्यात येणार आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत जिल्हा नियोजनचा संपूर्ण खर्च करावा लागणार आहे. निधी खर्च झाला नसल्यास संबंधित यंत्रणा प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दिलेला निधी परत घेऊन पुनर्विनियोजनाद्वारे इतर यंत्रणांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी दक्ष राहून हा निधी प्राधान्याने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.
00000
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात साजरा
अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.
खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांच्या हस्ते क्रिडा दिनाचे उद्घाटन झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. नितीन चव्हाळ आणि जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय आळशी उपस्थित होते. डॉ. अनिल बोंडे आणि आमदार संजय खोडके यांनी मेजन ध्यानचंद यांच्या जीवनपैलू वर प्रकाश टाकला. तसेच 'फिट इंडिया’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त क्रीडा आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथम उजेर खान, द्वितीय प्रतिक गेडाम आणि तृतीय गौरव इंगळे यांनी रोख बक्षीस पटकाविले. महिलांमध्ये प्रथम वैष्णवी वानखडे, द्वितीय पायल मगरदे आणि तृतीय गायत्री बेहरे क्रमांक पटकाविला. त्यांना रोख बक्षीस, पदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ‘एक घंटा खेल के मैदान मे’, ‘खेलेगा छात्र तो खेलेगा राष्ट्र’, आणि ‘खेले भी खिले भी’ असे नारे देण्यात आले. सहभागी खेळाडू, नागरिक आणि प्रशिक्षकांनी क्रीडा दिनानिमित्त शपथ घेतली. पोलीस विभागाने वाहतूक आणि पोलीस बंदोबस्त पुरवून सहकार्य केले. संदीप इंगोले आणि अतुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. त्रिवेणी बांते यांनी आभार मानले.
खेलो इंडिया सेंटरच्या वतीने धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त दि. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष विघ्ने, वैशाली इंगळे, स्वप्नील चांदेकर, राहुल निवडंगे, प्रफुल्ल डांगे, रितेश अनंतवार, धनंजय भारसाकडे, अकिल शेख, राजपाल इंगळे, अमोल लांडे यांनी पुढाकार घेतला.
000000
शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 29 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 30 ऑगस्ट ते दि. 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.
000000
मंगळवारी जिल्हास्तरीय लोकशाही
अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. परंतु दि. 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठागौरी पूजन निमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन, मंगळवार, दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
00000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यवसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जातील त्रुटी पुर्तता केलेली नाही, त्यांनी त्रुटीची पुर्तता बातमी प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसाच्या आत करण्यात यावी. याबाबत विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यांनी त्रुटीची पुर्तता करून आवश्यक कागदपत्र कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.
अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती चांदुर रेल्वे रोड, सी. पी. ऑफीसच्या मागे अमरावती तसेच speldswo_amtrediffmail.
000000
वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 18 सप्टेंबर अंतिम मुदत
अमरावती, दि.29 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्यासाठी 18 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.
वरिल दिलेल्या दिनांकापर्यंत मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर जाफरीन प्लॉट आदर्श होटेल जवळ कॉटन मार्केट रोड अमरावती. तसेच मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक A राम लक्ष्मण संकुल तिसरा मजला रामपूरी कॅम्प जवळ, विलास नगर चौक, अमरावती या वसतिगृहामध्ये सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण अमरावती. सामाजिक न्याय भवन पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती तसेच ई-मेल आयडी dobbwoamravati@gmail.com यावर कार्यालयाशी संपर्क साधावा.
12 वी नंतरच्या व्यावसायीक अभ्यासकमास प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करावयाची कालावधी 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत राहील. अर्जांची छाननी 19 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून यादी 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 17 ऑक्टोबर 2025 ठेवण्यात आली आहे.
योजनेच्या अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी
प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. परंतु 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.
सन 2025-26 साठी स्वाधार योजनेचा लाभ घेणेसाठी अनूसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश मिळण्यासाठी रितसर अर्ज केलेला आहे. परंतु वसतिगृहातील मर्यादित प्रवेश क्षमतेअभावी ज्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा स्थानिक रहिवासी नसलेल्या व शासन निर्णयातील इतर सर्व अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. करिता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यवसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रितसर अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती चांदुर रेल्वे रोड, सी. पी. ऑफीसच्या मागे अमरावती तसेच speldswo_amtrediffmail.
000000
No comments:
Post a Comment