केंद्राच्या योजना राबविताना गुणवत्ता राखावी
खासदार बळवंत वानखेडे
अमरावती, दि. 13 (जिमाका) : केंद्र शासनाच्या निधीमधून जिल्हास्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. यातून नागरिकांना आवश्यक असणारी विकास कामे करण्यात येतात. ही विकास कामे करताना यंत्रणांनी गुणवत्ता राखावी, असे आवाहन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार बळवंत वानखेडे यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी समितीचे सहअध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, उपवनसंरक्षक अर्जुना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, समितीचे सदस्य मोरेश्वर वानखडे, प्रतिभा गौरखेडे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात विविध योजनांमधून रस्त्यांची कामे करण्यात येतात मातोश्री पांदण योजनेमध्ये घेण्यात येणारी कामे तहसीलदारांनी भेट देऊन पाहणी करावी. या रस्त्यांची गुणवत्ता राखली जाईल, यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांसाठी काम करणाऱ्याला पाच वर्ष जबाबदार धरल्या जात असले तरी चांगल्या प्रतीचे काम व्हावे, यासाठी आग्रही असावे.
जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग आहे. या क्षेत्रातील कामावर यंत्रणांनी लक्ष ठेवावे. पुरामुळे रस्ते वाहून जात असल्याने या सुविधांची वेळोवेळी पाहणी करण्यात यावी. तसेच वनक्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी वेळेत परवानगी घ्यावी. परवानगीबाबत काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
मेळघाटमध्ये दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा महत्त्वाचे आहे. नेटवर्क नसल्याने कामे होण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. याबाबत बीएसएनएलने तातडीची पावले उचलून इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा उपलब्ध करून द्यावी. डिजीटल इंडिया आणि आपले सरकार सेवा केंद्राचे काम सर्व नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. सेतू केंद्रांचे डिजीटल मॉनिटरिंग करण्यात यावे. तसेच नागरिकांना सर्व सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
युवकांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. याचाही लाभ शेवटच्या घटकाला होण्यासाठी कार्य करावे. प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना बँकांनी कर्ज उपलब्ध करून दिल्यास ते स्वत:चा व्यवसाय उभारू शकतील. प्रशिक्षणामध्ये दिनदयाल उपाध्याय ग्रामीण प्रशिक्षणाचाही समावेश करण्यात यावा. शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार हा दर्जेदार असावा. यात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करण्यात येऊ नये. पाणी पुरवठ्याचा योजना या तातडीने पुर्ण करण्यात याव्यात. तसेच घनकचरा आणि सांडपाणी यांचे नियोजन करण्यात यावेत. राष्ट्रीय कुटुंब सहाय योजनेतून विविध योजना राबविण्यात येत आहे. याचाही लाभ देण्यासाठी यंत्रणांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश खासदार वानखेडे यांनी दिले.
0000000
उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट
अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील यंत्रसामुग्री आणि प्रशिक्षण व्यवस्थेची पाहणी केली.
स्थानिक उद्योजकांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी नांदगाव पेठे येथील एमआयडीसी परिसरातील उद्योगांच्या अनुषंगाने युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. अत्याधुनिक लॅब असल्याने प्रशिक्षणार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यास मदत होत आहे. प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येत आहे. याठिकाणी स्थानिक उद्योजकांनी 440 प्रशिक्षित कामगारांची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती देण्यात आली.
मंत्री श्री. सामंत यांनी, इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट झाले आहे. याठिकाणी अत्याधुनिक मशिनही देण्यात आले आहे. त्यामुळे या कौशल्य विकास केंद्राचे मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. येत्या 15 दिवसांच्या कालावधीत उद्घाटनाची तयारी करावी. या कार्यक्रमासाठी आयटीआय, तंत्रनिकेतन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बोलाविण्यात यावे. उद्घाटन कार्यक्रमात ‘माझी मराठी, अभिजात मराठी’ हा एक तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने मुंबई, सुरत, अहमदाबाद येथील टेक्सटाईल क्षेत्रातील उद्योजकांशीही चर्चा ठेवण्यात यावी, अशी सूचना केली.
मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केंद्रामधील सर्व यंत्रसामुग्री, प्रशिक्षण कक्षाची पाहणी केली. इमारतीमध्ये स्वच्छता राखण्यासोबतच इमारतीच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
00000
कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे बुधवार, दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये गार्डियन सिक्युरिटी सर्विसेस प्रा. लि. हैद्राबाद यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येत आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.
0000000
कृषी विभागातर्फे शाश्वत दिन साजरा
अमरावती, दि. 13 (जिमाका) : कृषी विभागातर्फे भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत दिन म्हणून साजरा करण्यात आला. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर लांडे, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, प्रा. जितेंद्र दुर्गे, विषय तज्ज्ञ अमर तायडे, घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे निखील टेटू, कृषी उपसंचालक वरूण देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात अनिरुद्ध पाटील यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. तसेच हवामान बदल, अन्नसुरक्षा आणि कृषी क्षेत्रातील उपक्रमासाठी जनजागृती करणे, तरुणांमध्ये कृषी क्षेत्राबद्दल उत्सुकता आणि सहभाग वाढविणे, शेतकरी संशोधक विद्यार्थी व कृषी उद्योजक यांच्यात समन्वय साधण्याबाबत मार्गदर्शन केले.
प्रयोगशील शेतकरी निखिल तेटु यांनी, नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीमधील रानभाज्या, तरुणांमध्ये शाश्वत शेतीविषयी जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी पवनकुमार ढोमने यांनी सूत्रसंचालन केले. आत्मा कृषी उपसंचालक विवेक टेकाडे यांनी आभार मानले.
000000
No comments:
Post a Comment