सहकारी संस्थांना पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ
अमरावती, दि. 6 (जिमाका) : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकारी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना 2023-24 वर्षासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव दि. 18 ऑगस्टपर्यंत सादर करावे लागणार आहे.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पुरस्कार वितरणासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव आपल्या संस्थेच्या मुख्यालयाच्या संबंधित तालुक्यातील उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत. या संदर्भात अडचणी असल्यास संबंधित तालुक्याचे उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.
00000
जिल्हा परिषदेत पाणी पुरवठ्यासाठी नवीन चार दुरुस्ती पथकांची खरेदी
अमरावती, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सध्या कार्यरत असलेल्या 6 हजार 25 हातपंपांच्या नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी आता चार नवीन दुरुस्ती वाहने खरेदी करण्यात आली आहेत. यामुळे, हातपंपांची देखभाल व दुरुस्ती अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सन 2023-24 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पथकांच्या खरेदीसाठी रुपये 49.96 लाख इतका निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून सन 2025-26 या वर्षात ही चार नवीन दुरुस्ती पथके खरेदी करण्यात आली आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल जाधव आणि उप अभियंता प्रमोद कराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
00000
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
अमरावती, दि. 6 (जिमाका) : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यालयाचे अधिकारी दीपक खोचे, धर्मादाय सह आयुक्त, रा. ना इंगोले, सहायक धर्मादाय आयुक्त तसेच पी. बी. तौर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी कार्यालयाचे अधीक्षक अरविंद ठाकरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली वाहिली.
00000
‘हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन
अमरावती, दि. 6 (जिमाका): स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यात तीन टप्प्यात विविध उपक्रमांचे आयोजन कारण्यात आले आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पहिल्या टप्यात 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रेरित सजावट. हर घर तिरंगा 2025 या हॅशटॅगसह सोशल मीडीयावर फोटो शेअर करणे, तिरंगा रांगोळी स्पर्धा-कार्यशाळा, तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धा, अंगणवाडी, शाळा, वृध्दाश्रम, मॉल्स यामध्ये तिरंगा विषयक प्रश्नमंजूषा, शाळांमध्ये जवानांसाठी पत्रलेखन उपक्रम, ‘हर घर तिरंगा - हर घर स्वच्छता’ अभियान हे 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवून स्वच्छता व पाणी संजीवनीवर विशेष भर देण्यात येणार आहे. स्वयंसेवक कार्यक्रमात प्रचारकांनी घरोघरी तिरंगा पोचवणे व जनजागृती करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय तिरंगा महोत्सव, तिरंगा मेला व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा बाईक व सायकल रॅली, तिरंगा यात्रा व मानवी साखळ्या, तिरंगा विक्री स्थानिक उत्पादक व स्वयं सहायता गटांचा सहभाग, मिडीया व सोशल मिडीयात हॅशटॅगसह प्रसिद्धी-प्रचार, प्रत्येक घरात तिरंगा विकत घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घर, कार्यालय, वाहनावर तिंरगा फडकावणे, सेल्फी व फोटो harghartiranga.com वर अपलोड करणे, ध्वजारोहण समारंभ, कार्यक्रामाचे प्रसारण व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
कुख्यात हातभट्टीचालक एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध
अमरावती, दि. 6 (जिमाका): अमरावती ग्रामीण पोलिसांनी पाळा, ता. मोर्शी येथील कुख्यात हातभट्टीचालक शेरु शहा करीम शहा याला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार एमपीडीए कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
शेरु शहा करीम शहा हा अनेक वर्षांपासून पाळा आणि परिसरात गावठी हातभट्टीची दारू विकण्याचे अवैध धंदे चालवत होता. त्याच्या या व्यवसायामुळे परिसरातील तरुण मुले व्यसनाधीन झाली होती, ज्यामुळे भांडण-तंटे आणि महिलांची छेडछाड यांसारखे प्रकार वाढले होते. त्याच्यावर अनेकदा कारवाई करूनही त्याने अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केला. जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर शेरु शहा करीम शहा याला एक वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश 30 जुलै 2025 रोजी दिला. या आदेशानुसार त्याला त्याच दिवशी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, सहायक पोलिस निरीक्षक सारंग बोंम्पीलवार, पोलिस उपनिरीक्षक विष्णुपंत राठोड, पोहेकॉ अमोल देशमुख आणि पोलिस स्टेशन मोर्शीचे ठाणेदार पोलिस निरीक्षक सुरज बोंडे, नितीन देशमुख, पोहेकॉ योगेश सांभारे यांनी पार पाडली.
अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गंभीर गुन्हे करणाऱ्या गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
00000

No comments:
Post a Comment