Friday, August 8, 2025

DIO NEWS AMRAVATI 08.08.2025











                                                  शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत

– आमदार संजय खोडके

संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा

अमरावती, दि. 8 (जिमाका) : मेळघाटमध्ये काम करणे आजही आव्हानात्मक आहे. निती आयोगाच्या सहकार्याने आकांक्षित भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार संजय खोडके यांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात संपूर्णत: अभियान सन्मान सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रविण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, विभागीय महिला व बालविकास अधिकारी विलास मसराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.

आमदार श्री. खोडके यांनी, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत योजना पोहोचविण्यात यावी. सर्व नागरिकांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. या केलेल्या कामाचे मुल्यमापन झाल्याने अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येत आहे. शासकीय योजनांची मदत केल्याने नागरिकांचे दारिद्र्य कमी करण्यास मदत होणार आहे. मागासलेल्या भागांमध्ये शाळा सुटल्याने बालविवाह होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या क्षेत्रावर लक्ष ठेवून वेळीच कार्यवाही करावी. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने नवीन योजना हाती घ्याव्यात. शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एकाच ठिकाणी विक्रीची व्यवस्था उभारल्यास फायदा होऊ शकेल, असे सांगितले.

आमदार श्री. तायडे यांनी, समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करावे. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे समाधान झाल्यास लोकप्रतिनिधींकडे येणाऱ्या तक्रारी होईल. सक्रीयपणे समस्यांवर काम केल्यास नागरिकांचे समाधान होण्यास मदत होईल, असे सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आकांक्षित तालुक्यात आरोग्य, माती परिक्षण, दळणवळण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य झाले आहे. केवळ उद्दीष्ट गाठण्यापेक्षा परिणाम होईल, असे कार्य होणे आवश्यक आहे. मेळघाटातील बालमृत्यू नियंत्रणात असला तरी मातामृत्यू रोखण्यासाठी अल्पवयात होणारे विवाह रोखणे गरजेचे आहे. कमी वयात गर्भधारणा राहू नये, तसेच दोन मुलांमध्ये अंतर राखण्याबाबत जनजागृती करावी. येत्या काळात या सर्व क्षेत्रात कार्य करून जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यात येईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी, मेळघाटात कर्मचारी विपरीत परिस्थितीत कार्य करीत असल्याची जाणीव आहे. प्रशासन ही जनतेची सेवा असल्याने प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य करावे. गरजू नागरिकांपर्यंत पोहोचून केवळ आपला परिसर बदलण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

यावेळी धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील आरोग्य विभाग, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन विभाग, तालुका कृषी कार्यालय, बाल विकास कार्यालय, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, गटशिक्षणाधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. चिखलदऱ्याचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी आभार मानले.

000000




अवैध गौणखनिजाच्या उत्खनन, वाहतुकीवर प्रशासनाची कारवाई

*एक कोटी 43 लक्ष दंडाची वसूली

अमरावती, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात एकूण 169 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 125 प्रकरणे वाळूशी संबंधित आहेत. या कारवाईमध्ये, जिल्हा प्रशासनाने एकूण एक कोटी 43 लक्ष दंड वसूल केला आहे.

अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा, उपविभाग आणि तालुकास्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत. ही पथके गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करत आहेत. रॉयल्टी पासेस किंवा दुय्यम वाहतूक पासेस नसलेल्या वाहनांवर शासन नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे.

या कारवाईव्यतिरिक्त, प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांमधून घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिली जात आहे. ही प्रक्रिया संबंधित तहसीलदारांमार्फत सुरू आहे.

नागरिकांना परिसरात कुठेही अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे आढळल्यास, त्यांनी संबंधित तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 तालुकानिहाय कारवाईचा तपशील (1 एप्रिल, 2025 ते 7 ऑगस्ट, 2025):

 * अमरावती: 19 प्रकरणे, 11 वाहने जप्त, रु. 13.90 लाख दंड वसूल.

 * तिवसा: 16 प्रकरणे, 16 वाहने जप्त, रु. 17.42 लाख दंड वसूल.

 * भातकुली: 11 प्रकरणे, 8 वाहने जप्त, रु. 6.87 लाख दंड वसूल.

 * चांदूर रेल्वे: 5 प्रकरणे, 5 वाहने जप्त, रु. 4.11 लाख दंड वसूल.

 * धामणगाव रेल्वे: 19 प्रकरणे, 15 वाहने जप्त, रु. 14.95 लाख दंड वसूल.

 * नांदगाव खंडेश्वर: 2 प्रकरणे, 1 वाहन जप्त, रु. 1.26 लाख दंड वसूल.

 * मोर्शी: 21 प्रकरणे, 6 वाहने जप्त, रु. 28.01 लाख दंड वसूल.

 * वरुड: 12 प्रकरणे, 6 वाहने जप्त, रु. 16.55 लाख दंड वसूल.

 * दर्यापूर: 8 प्रकरणे, 7 वाहने जप्त, रु. 4.92 लाख दंड वसूल.

 * अंजनगाव सुर्जी: 10 प्रकरणे, 8 वाहने जप्त, रु. 7.12 लाख दंड वसूल.

 * अचलपूर: 29 प्रकरणे, 28 वाहने जप्त, रु. 16.33 लाख दंड वसूल.

 * चांदूर बाजार: 8 प्रकरणे, 1 वाहन जप्त, रु. 5.96 लाख दंड वसूल.

 * धारणी: 8 प्रकरणे, 6 वाहने जप्त, रु. 6.03 लाख दंड वसूल.

 * चिखलदरा: 1 प्रकरण, 1 वाहन जप्त, रु. 0 दंड वसूल.

 * एकूण: 169 प्रकरणे, 119 वाहने जप्त, रु. 143.43 लाख दंड वसूल.

00000

 

 

 

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

अमरावती, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात काही कृषि निविष्ठा विक्री केंद्र युरिया खताची साठेबाजी आणि जादा दराने खत विक्री करणे, तसेच इतर निविष्ठांची लिंकिंग करीत आहे. अशा कृषी केंद्राची तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

कृषी केंद्राविरूद्ध कृषि विभागास प्राप्त तक्रारीबाबत खत निरीक्षकांमार्फत चौकशी करून कृषि निविष्ठा विक्रेत्‍यांनी खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्ग विविध तरतुदींचे उल्लंघन केले आहे, अशा कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे 2 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच 6 कृषी निविष्ठा विक्री केंद्रांच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा, रासायनिक खते योग्य दराने उपलब्ध होण्यासाठी तसेच कृषि निविष्ठेच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी कृषी निविष्ठा रासायनिक खते एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणे, रासायनिक खतासोबत इतर निविष्ठांचे लिंकिंग करणे, रासायनिक खते उपलब्ध असून उपलब्ध करून न देणे, शेतकऱ्यांना बोगस खत विक्री करणे, अशा प्रकारच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करणेसाठी जिल्हास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

तालुकास्तरावर 14 कृषी अधिकारी गुण नियंत्रण यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना तक्रार करता यावी यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आल आहे. सदर गुगल फॉर्मचे क्युआर सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्रावर लावण्यात आले आहेत. सदर क्युआर स्कॅन करून शेतकरी तक्रार नोंदवू शकतात. तसेच व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवयाची असल्यास 8080536602 या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

कृषी केंद्रांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉस बसवावे

*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

अमरावती, दि. 8 (जिमाका) : अनुदानित खत विक्री करण्यासाठी कृषि विभागाकडून विक्रेत्यांना आधुनिक ई-पॉसच्या 29 हजार यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही एक हजार विक्रेत्यांनी ही यंत्रे घेतलेली नाहीत. त्यांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉस मशिन बसवावे, अन्यथा दंडात्मक, परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस यंत्राच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे. खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूक पद्धतीने समाविष्ट करण्यासाठी ई-पॉसमधील साठा आणि प्रत्यक्ष साठा समान असणे गरजेचे आहे. यासाठी विक्रीची नोंद आयएफएमएस प्रणालीमध्ये घेणे बंधनकारक आहे. नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रियस्तरावरील तालुका खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. खत विक्रेत्यांकडे ई-पॉसवरील खतसाठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक असल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये ई-पॉस मधील रासायनिक खतामध्ये तफावत आढळुन आलेल्या 6 कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर निलंबन आणि 2 कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर रद्दची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये विक्रेत्यांनी एल 1 सिक्युरिटी हे नवीन यंत्र अद्यापही घेतलेले नाहीत, अशांनी जिल्ह्यातील कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क करून 10 ऑगस्टपूर्वी यंत्र सुरू करावेत, असे आवाहन कृषि उपसंचालक यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...