मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा
अमरावती, 14 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. श्री. भुसे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन आणि मनपा शाळेच्या कवायत संचलनाला उपस्थित राहतील.
दौऱ्यानुसार, मालेगाव येथून शासकीय वाहनाने गुरूवार, दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचे अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. त्यांनतर राखीव राहणार आहे.
मंत्री श्री. भुसे शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 9.05 वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.45 वाजता ते जेवडनगर येथील मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कवायत संचलन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार मालेगावकडे प्रयाण करतील.
00000
भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार
*शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन
अमरावती, दि. 14 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाखात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी कोणतीही बॅग सोबत आणू नये, तसेच समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.
00000
शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 14 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 15 ऑगस्ट ते दि. 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.
000000
नोंदणी विभागाच्या सेवा 17 ऑगस्टपर्यंत बंद राहणार
अमरावती, दि. 14 (जिमाका) : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल आणि दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दि. 17 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत कार्यालयाच्या सेवा बंद राहणार आहेत.
नोंदणी विभागाच्या सेवा दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दि. 17 ऑगस्ट पर्यत रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणी या सेवांसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील. तरी संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणारे व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अमरावती शहर क्रमांक 3 चे सह दुय्यम निबंधक जी. एम. बांते यांनी केले आहे.
00000
स्वातंत्र्यदिनी राज्यातील शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन*जेवडनगर येथील कार्यक्रमाला दादाजी भुसे उपस्थित राहणार
अमरावती, दि. 14 (जिमाका) : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये भारतीय स्वातंत्र दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत संचलन करण्यात येणार आहे. यावर्षी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. जेवडनगर येथील मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कवायत संचलन कार्यक्रमास स्वत: मंत्री श्री. भुसे उपस्थित राहतील.
राज्यभरातील शाळांमध्ये सकाळी 9 ते 9.30 दरम्यान या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना योग्य सूचना देण्यात आल्या आहे. यात महाराष्ट्र गितासह विविध देशभक्तीपर गितांवर विद्यार्थी कवायत करणार आहेत.
शालेय शिक्षण विभागातर्फे आतापर्यंत महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकवला जाणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्देश दिले आहेत. यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गायन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमध्ये संबधित राज्याची मातृभाषा म्हणजेच महाराष्ट्रात मराठी अनिवार्य केली आहे.
जुलै महिन्यात ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमात राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी यांनी 2 कोटी वृक्षांची लागवड केली आहे. राज्यातील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.
00000
स्वातंत्र्यदिनी वाहतूक व्यवस्थेत बदल
अमरावती, दि. 14 (जिमाका) : शहरात शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये, तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988चे कलम 115 अन्वये शुक्रवार, दि. 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिले आहे. तसेच शहरातील गाडगेनगर समाधीपासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलिस स्टेशन, तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलिस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ यांनी कळविले आहे.
00000
सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन
अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment