Friday, August 22, 2025

DIO NEWS AMRAVATI 22.08.2025


                                             राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा सोमवारी दौरा

अमरावती, दि. 22 (जिमाका) : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर  सोमवार, दि. 25 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. भोयर यांचे सोमवारी दुपारी 1 वाजता वरखेड, ता. तिवसा येथे आगमन होईल. त्यानंतर खासगी कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता चांदूररेल्वे येथे प्रदिप वाघ यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता चांदूररेल्वे येथून वर्धाकडे प्रयाण करतील.

00000

लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे आज अमरावतीत आगमन

अमरावती, 22 (जिमाका) : द हार्टफुलनेस ट्राय-नेशन ट्राय-सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अमरावती येथे आगमन होणार आहे. या मोहिमेचे स्वागत पंचवटी चौक येथे करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही मोहिम नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांमधून प्रवास करणार आहे.

या मोहिमेत सहभागी झालेल्यांचे दुपारी 3 वाजता पंचवटी चौक आगमनानंतर स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सहभागींच्या हस्ते इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि राजकमल चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्वांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच मोहिमत सहभागींची गुळतुला आणि धान्यतुला कार्यक्रम होतील. यावेळी उपस्थित संत मंडळी ऑपरेशन सिंदूर आणि कारगिल युद्धातील सैनिकांना आशीर्वाद देतील, त्यानंतर मोहिम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे जातील व मुक्काम करतील.

मोहिमेतील सदस्यांचे रविवार, दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी बडनेरा येथे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते यवतमाळकडे पुढील प्रवासासाठी रवाना होतील.

00000

नांदगाव पेठ येथील आर्थिक समावेशनात बँकांच्या योजनांची माहिती

*लाभार्थ्यांना धनादेश वाटप

अमरावती, 22 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने नांदगाव पेठ येथील संत काशीनाथ महाराज सभागृहात ग्रामपंचायतस्तर आर्थिक समावेशन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामुळे आर्थिक साक्षरता आणि समावेशन विकासाला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले. कार्यक्रमात बँकांच्या योजनांची माहिती देण्यात आली, तसेच लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

नांदगाव पेठच्या सरपंच कविता डांगे अध्यक्षस्थानी होत्या. आरबीआय नागपूरचे क्षेत्रीय निर्देशक सचिन शेंडे प्रमुख पाहुणे होते. तसेच आरबीआयच्या उप महाव्यवस्थापक अंजना शामनाथ, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे, युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय प्रमुख प्रमोद परहाटे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ उपस्थित होते.

श्री. शेंडे यांनी आर्थिक समावेशनाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेसह आरबीआयच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. या योजनांनी नागरिकांना सामाजिक सुरक्षा, जीवन विमा आणि अपघात विमा प्रदान केला असल्याचे सांगितले.

अंजना शामनाथ यांनी, डिजिटल बँकिंगमधील सायबर सुरक्षा आणि सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ बँकिंग सेवांसाठी केवायसीचे महत्त्व सांगितले. श्री. पांडे यांनी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया जनधन योजनेसह इतर योजना राबविण्यात आघाडीवर आहे. यामुळे जिल्ह्यात आर्थिक समावेशनात अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या योजनांबाबत जागरूकता आणि नोंदणी करण्यात बँकेच्या भूमिकेवर भर दिला. श्री. परहाटे यांनी आर्थिक विकासात आर्थिक समावेशनाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली, बँकिंगची उपलब्धता व्यक्तींना सक्षम बनवते आणि ग्रामीण विकासाला चालना देते असल्याचे सांगितले. श्री. हेडाऊ यांनी, बँकांच्या संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांपर्यंत शासनाचे लाभ पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामीण भागात आर्थिक सक्षमीकरणाची पोहोच दर्शविणारे विविध शासकीय योजनांचे धनादेश लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

00000

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि.22  (जिमाका) : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून दि. 29 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विभागीय आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन ‘सर्व समावेशक आणि तंदुरूस्त समाजासाठी सक्षम’ संकल्पनेवर साजरा करण्यात येणार आहे.

क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा, उपक्रम दि. 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी कॅरम, म्युझीकल चेअर, हॉकी प्रदर्शनीय सामने क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी दौड, स्क्वॅश, टेबल टेनिस, लाठी काठी, रोपस्किपींग, कराटे, किक बॉक्सींग, तर दि. 31 ऑगस्ट रोजी सायकलींग, मल्लखांब प्रात्याक्षिक, आष्टे डु आखाडा, ऑनलाईन प्रश्नमंजुशा दि. 29 ते 31 ऑगस्टपर्यंत ऑनलॉईन सुरु राहणार आहे.

स्पर्धा, उपक्रमासाठी शाळेतील खेळाडू, विद्यार्थ्यांना सहभागी करुन प्रवेश अर्ज दि. 26 ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावे लागणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सवात चालण्याची शर्यंत, मिनी फुटबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ, बास्केटबॉल, झुंम्बा, टॅग ऑफ वॉर, लगोरी, लंगडी, दोरी, उडी मारणे, लिंबू शर्यंत, सेक रेस खेळाचे आयोजन करुन amravatidso@gmail.com मेलवर अहवाल सादर करावा, तसेच fitindia@gov.in या ई-मेल वर नॅशनल स्पोर्ट डे या नावाने फिट इंडिया पोर्टलवर कार्यक्रमाचे फोटो, व्हीडीओ, अपलोड करावेत.

सदर उपक्रमात सहभाग घेण्यासाठी क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते, संपर्क क्रमांक 9975590232 यांच्याशी संपर्क साधावा. क्रीडा दिनानिमित्य शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळांनी विविध उपक्रमाचे आयोजन करावे, त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 22 (जिमाका) : जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्यात येते. या स्पर्धेत जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांना कौशल्य सादर करण्याची संधी असते. या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सन 2026ची जागतिक कौशल्य स्पर्धा शांघाई येथे होणार आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील, विविध औद्यागिक आस्थापनांच्या सहकार्याने स्किल कॉम्पीटीशन आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2004 किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, अॅडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग, इंडस्ट्रीअल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मॅकॅट्रोनिक्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वॉटर टेक्नॉलॉजी, डेंटल प्रोस्टेथिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2001 किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धेकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...