Monday, August 18, 2025

DIO NEWS AMRAVATI 18.08.2025

 आजपासून चार दिवस अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा

अमरावती, दि. 18 (जिमाका): अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा मंगळवार, दि. 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पुढील चार दिवस हा दौरा चालणार आहे. या दरम्यान समिती चिखलदरा आणि धारणी तालुक्यात दोन दिवस पाहणी दौरा करणार आहे.

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा मंगळवार, दि. 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. शासकीय विश्रामगृहात सकाळी 9 वाजता समितीचे सदस्य एकत्र येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेतील.

सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, नगर परिषद, पोलिस विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, राज्य उत्पादन शुल्क, राज्य परिवहन महामंडळचा आढावा घेतील. त्यानंतर संत गाडगेबाबा विद्यापीठाचा विद्यापीठ येथे आढावा घेतील.  जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा आढावा घेण्यात येईल. महापालिकेत महापालिका आस्थापना व शिक्षण विभाग यांचा आढावा घेतील.

बुधवार, दि. 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा, वसतिगृह तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात विविध यंत्रणांनी राबविलेल्या कामांना भेटी देतील. गुरूवार, दि. 21 ऑगस्ट रोजी प्रकल्प कार्यालयांतर्गत धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील कामांना भेटी देतील. शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील.

0000

नांदगावपेठ येथे ग्रामपंचायतस्तरावरील आर्थिक समावेशन कार्यक्रम

अमरावती, दि. 18(जिमाका) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने नांदगावपेठ येथे मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतस्तरावरील आर्थिक समावेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नांदगाव पेठ येथील संत काशीनाथ महाराज सभागृहात मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय निदेशक सचिन शेंडे, नांदगाव पेठचे सरपंच विनोद डांगे, जिल्हाधिकारी आशीष येरेकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख प्रमोद परहाते उपस्थित राहतील.

यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेंद्र हेडाऊ यांनी केले आहे.

00000

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड,  जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये कोलब्रो गृप प्रा. ली. अमरावती, जना मॉल फायनान्स बँक ली. अमरावती, भारत फायनान्स प्रा. ली. अमरावती, स्विगी अमरावती, प्लास्टी सर्ज प्रा. ली. अमरावती यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. या मेळाव्यात आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000



वखार महामंडळाचा वर्धापन दिन साजरा

अमरावती, दि. 18 (जिमाका): महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा 68 वा वर्धापन दिन येथे शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट  रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

राजापेठ येथे झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी अजित मासाळ होते, तर प्रमुख उपस्थिती मध्ये सहाय्यक प्रोग्रामर  रविकुमार बोडखे, पणन महामंडळाचे उप-सरव्यवस्थापक दिनेश डामा, आरसीएफचे व्यवस्थापक श्री. बाविस्कर, जिल्हा कार्यालयाचे अधिकारी श्री. तिखीले व श्री. वाघमारे, प्रकल्प अभियंता श्री. भाले, श्री. अडकमोल, अंतर्गत लेखापरीक्षक  के. व्ही. जोशी, बैंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अरविंद पतंगराव उपस्थित होते.

महामंडळाच्या सेवाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन विभाग प्रमुख अजित मासाळ यांनी केले. विभागाची कामगिरी अतिशय उत्तम असून शेतकरी वर्गाचा महामंडळाच्या गोदामात धान्यसाठवणु‌कीचा प्रतिसाद वाढत आहे. स्थानिक शेतकऱ्यांना वखार पावतीवर महाराष्ट्र राज्य बँकेकडून कमी व्याज दराने तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा कल महामंडळाच्या गोदामाकडे वाढत चालल्याचे अजित मासाळ यांनी सांगितले.

नाफेड खात्यावरील सन 2024-25 हंगामातील सोयाबीन साठ्याची मोठ्या प्रमाणात गोदामात साठ‌वणूक करून महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढविल्यामुळे अमरावती विभागाचे विभाग प्रमुख  अजित मासाळ यांनी केंद्रप्रमुख यांचा  गौरव केला.

यावेळी मोर्शी वखार केंद्रावरील ठेवीदार शेतकरी राहुल निमकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामिगिरीबद्दल वाशिम वखार केंद्राला उत्कृष्ट वखार केंद्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी वाशिम वखार केंद्राचे केंद्रप्रमुख  प्रवीण बांगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच दहावीमध्ये यश प्राप्त केल्यामुळे अर्णव डूमरे यांचा सत्कार करण्यात आला.

सुनील शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख अमोल जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पंकज मार्कंडे,  स्वप्नील देऊळकर, अमोल चौधरी, चेतन मांडे, सुखदेव धर्माळे, विलास डूमरे यांनी पुढाकार घेतला.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...