Wednesday, August 20, 2025

DIO NEWS AMRAVATI 20.08.2025





























अनुसूचित जमाती कल्याण समितीची विविध ठिकाणी भेट

अमरावती, दि. 20 (जिमाका): अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात त्यांनी विकासकामांची पाहणी केली. तसेच दौऱ्यात कुलंगणा खुर्द येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबियांना दहा लाखाचा धनादेश सुपूर्द केला. तसेच महावितरणच्या जरीदा उपकेंद्राला भेट दिली.

या पाहणी दौऱ्यात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले सहभागी झाले आहेत.

आजच्या पाहणी दौऱ्यात समिती सदस्यांनी सकाळी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांशी आरोग्य सुविधांबाबत चर्चा केली. त्यानंतर परतवाडा येथील मुलांचे वसतीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील सुविधांची पाहणी केली. कारंजा बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेला भेट देऊन शाळेतील पायाभूत सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वन विभागाची परवानगी आवश्यक असलेल्या जरीदा येथील 33 केव्ही उपकेंद्राला भेट देऊन या ठिकाणी वृक्षारोपण केले. या उपकेंद्रामुळे परिसरातील 50 गावांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. यानंतर समितीने डोमा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुलंगणा खुर्द येथील प्रविण सुखराम बेलसरे यांच्या कुटुंबीयांना समितीच्या सदस्यांनी भेट दिली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात प्रतिमुखी पडलेल्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप यावेळी करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या प्रविण बेलसरे यांच्या कुटुंबीयांना दहा लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

00000 

वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 27 ऑगस्ट अंतिम मुदत

       अमरावती, दि.20 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्यासाठी 27 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.

       बीए, बी. कॉम, बीएससी, तसेच एमए, एमएससी अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करावयाची कालावधी 17 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत राहील. अर्जांची छाननी 28 ऑगस्ट ते 2  सप्टेंबर दरम्यान होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 12 सप्टेंबर आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून यादी 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2025 ठेवण्यात आली आहे.

     योजनेच्या अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज 2025-26 साठी पोर्टल सुरु ;

विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 20 (जिमाका) : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित झाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यास पासून सुरुवात झाली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे नवीन/नूतनीकरण अर्ज तसेच 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनांमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाचे आणि नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर भरणे सुरु आहे. सर्व अर्ज शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत.

जिल्ह्यातील सर्व पात्र विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावे असे आवाहन, इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...