तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग
अमरावती, दि. 5 : तपोवनात राहणाऱ्या कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेसॲपद्वारे आधार सिडींग करण्यात आले. तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सहायाने खाते उघडण्यात आले.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथील लाभार्थ्यांचे आधार बँक सिडींग करण्यासाठी समस्या निर्माण झाली. यातील कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडींग खाते उघडण्यासाठी शिबिर पार पडले. शिबिरामध्ये 60 लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडिंग करण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. मात्र कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या डोळ्यातील बुबुळाचा फोटो घेऊन बँक खाते उघडण्यात आले. तसेच आधार सिडींग करण्यात आले.
तसेच वयोमानाने लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात अडचणी येत असल्यास फेसॲपद्वारे त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
0000
वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १७ ऑगस्ट अंतिम मुदत
अमरावती, दि.5 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्यासाठी 17 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.
बीए, बी. कॉम, बीएससी, तसेच एमए, एमएससी अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जांची छाननी १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत ४ सप्टेंबर आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून यादी ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ ठेवण्यात आली आहे.
योजनेच्या अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव
अमरावती, दि. 5 : खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त बसस्थानकासमोरील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ६ ते १५ ऑगस्ट या कालावधीत होईल.
या महोत्सवाचे उद्घाटन ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित राहतील.
या महोत्सवात, विकेंद्रित सोलर चरखा समूहाच्या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी महिलांनी तयार केलेली दर्जेदार खादी आणि सौर खादी उत्पादने उपलब्ध असतील. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी तयार केलेली विविध उत्पादने सवलतीच्या दरात नागरिकांना मिळणार आहेत. खादी महोत्सव दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाने केले आहे.
000000
No comments:
Post a Comment