जिल्हाधिकाऱ्यांकडून कारागृहाची पाहणी
*कारागृह अभिविक्षक मंडळाची बैठक संपन्न
अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारागृहाचे आतील परिसर व बरॅकची पाहणी केली. तसेच सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या सूचना केल्या.
सदर सभेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, कार्यकारी अभियंता श्री. गिरी, तसेच कारागृहाच्या अधीक्षक किर्ती चिंतामणी, उपअधीक्षक प्रदिप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, अंतर्गत सुरक्षा अधिकारी, मंडल तुरुंगाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी कारागृहातील पाकगृह, कारखाना, मुर्तीकाम, शिवणकाम, सुतारकाम, लॉन्ड्री, पॅथोलॉजी, ई-सेल, मुलाखत कक्ष, धान्य गोदाम, उपहारगृह, ग्रंथालय, रेडिओ कक्ष, ई-लायब्ररी, मुक्त विद्यापीठाचे कारागृहातील अभ्यास केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सींग कक्ष, दवाखाना, महिला विभाग, अति सुरक्षा विभागास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा नियोजनच्या निधी अंतर्गत सुरु असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला. कारागृहाच्या सुरक्षा कारणास्तव कार्यालयास ई-बाईक, जनरेटर खरेदी, सोलर यंत्रणा, प्रस्ताव सादर केल्यास जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल असे सांगितले आहे.
भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी कारागृहाचे पाकगृह आधुनिकीकरण आणि नवीन गॅस पाईप लाईनसाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून निधी देण्याचे येणार असल्याचे सांगितले. तसेच जनरेटर दुरुस्ती करण्याबाबत व सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षेच्या कारणास्तव जनरेटरशी जोडणी करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागास आदेश दिले. सांस्कृतिक हॉलसाठी प्रोजेक्टरसारख्या अत्याधुनिक सुविधेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यासोबतच पोलिस विभागास पुरेसा पोलिस पथक पुरविण्याबाबत आदेश दिले.
00000
सिंधी समाजातर्फे जिल्हाधिकारी आशिष येरेकर,
उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांचा सत्कार
अमरावती, दि. 7 (जिमाका) : भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात सिंधी समाजाला दिलेल्या जमिनींच्या मालकी हक्कासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष अभय योजना २०२५ लागू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सर्वप्रथम केल्याबद्दल सिंधी पंचायतांच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांचा सत्कार केला.
या योजनेंतर्गत सिंधी समाजास वाटप झालेल्या जमिनींचे मुक्तधारण रूपांतर करता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यशस्वीरित्या करण्यात आली, ही बाब संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरली आहे.
यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष आत्माराम पुरसवानी, उपाध्यक्ष हेमंनदास आसवानी, सदस्य दीपक दादलानी, अमर गेही, राजेश तरडेजा, नरेश धमाई, शैलेन्द्र मेघवानी, सुरेश हेमनानी, नंदलाल धमाई, अजय मेघवानी, टेकचंद केशवानी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, राज्य शासनाने ही एक अत्यंत उपयुक्त आणि दूरगामी परिणाम करणारी योजना सुरु केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय या योजनेच्या अंमलबजावणीचा भाग बनू शकल्याबद्दल अभिमान वाटतो. या योजनेचा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. समन्वय समितीने सिंधी समाजामध्ये या योजनेची माहिती पोहोचवण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
आत्माराम पुरसवानी आणि टेकचंद केशवानी यांनी, फ्री होल्ड रूपांतरणाचा प्रश्न प्रलंबित होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने जलद गतीने कार्यवाही केल्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी सिंधी समाजातर्फे प्रेम आणि कृतज्ञतेच्या प्रतिक म्हणून जिल्हाधिकारी यांना मिठाई अर्पण करण्यात आली. दीपक दादलानी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
00000
विभागांनी नागरिकांच्या तक्रारी निकाली काढाव्यात
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*पालकमंत्र्यांकडील 22 तक्रारींवर ऑनलाईन सुनावणी
अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्हाभरातील नागरिक त्यांच्या मागण्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करीत असतात. या तक्रारींचा विभागाच्या स्तरावर निपटारा होणे शक्य आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागांना पाठविण्यात आलेल्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेल्या निवेदनांवर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सुनावणी घेतली. यावेळी तक्रारदारांना ऑनलाईन उपस्थित राहण्याची सोय करण्यात आली. तक्रारदारांनी ऑनलाईन उपस्थित राहून तक्रारीबद्दल त्यांचे मत सांगितले. जिल्हाधिकारी यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागांना सुचना केल्या.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांना व्यक्तिश: आणि त्यांच्या पालकमंत्री कार्यालयात नागरिक भेटी देऊन समस्यांबाबत निवदने सादर केली असतात. यातील निवडक तक्रारींवर संबंधित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने ऑनलाईन उपस्थित असलेल्या संबंधित विभागाप्रमुखांना निर्देश देऊन तक्रारीच्या अनुषंगाने समाधान करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, तहसिलदार प्रशांत पडघन, निलेश खटके आदी उपस्थित होते.
तक्रारींमध्ये अमरावती शहरातील दसरा मैदानावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत महापालिका आणि उपविभागीय अधिकारी यांच्या समन्वयाने ही अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच सध्यास्थितीमध्ये नोटीस बजावणे आणि अनुषंगिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चांदस वाठोडा प्रकल्पातून होणाऱ्या पाझरामुळे फळपिकांचे नुकसान होत असल्याने नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने तातडीने कालव्यांची दुरूस्ती करावी, असे निर्देश देण्यात आले.
अंजनगाव बारी येथील वन विभागाच्या हद्दीमधील रस्त्याचे काम करण्याचे निर्देश वन विभागास देण्यात आले. यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले. परतवाडा येथील लाकुड बाजाराला देण्यात आलेली जमिन नियमानुकूल आणि स्थायी भाडेपट्ट्यावर देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल. तिर्थक्षेत्रचा क दर्जा असलेल्या हिम्मतपूर येथील नियमानुसार निधी देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
00000
रविवारी कुस्ती, तिरंदाजांना साहित्याचे वितरण
अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे कुस्ती मॅट्स आणि तिरंदाजी साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत साहित्याचे वितरण रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विभागीय क्रीडा संकुलात करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवि राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश यावलकर आणि गजानन लवटे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, माजी खासदार नवनित राणा, राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ
अमरावती, दि. 7 (जिमाका): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता 4 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया पुर्ण न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या अ संकेतस्थळावरुन अर्ज डाउनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष अथवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च पथ, पुणे-01 येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment