Tuesday, October 14, 2025

DIO NEWS AMRAVATI 14-10-2025

 ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 14 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 15 ऑक्टोबर  रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 15 ऑक्टोबर  रोजी सकाळी 9.30 वाजता  काटोलवरून अमरातवी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता मिशन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इमारत, अमरावती येथे कार्यालयीन कामकाज करतील. दुपारी 12 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, अमरावती येथे महाराष्ट राज्य किसान सभा व्दारा आयोजित अखिल भारतीय संत्रा उत्पादक परिषद-2025 या कार्याक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 5 वाजता मिशन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इमारत, अमरावती येथे आगमन व कार्यालयीन कामकाज त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

0000000

शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

* नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर अंतिम मुदत

              अमरावती, दि. 14 (जिमाका) :  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यासाठी  1 नोव्हेंबर 2025 ही यासाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी हा कार्यक्रम राहणार आहे.

            मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दि. 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत नमुना 19 मध्ये आपला अर्ज सादर करावा. यासाठी मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31 (4) नुसार प्रसिद्ध केलेल्या नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येत आहे. सदर नोटीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व पंचायत समिती, सर्व नगर परिषद कार्यालयांच्या नोटीस बोर्ड आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

             यासंबंधीचा सर्व तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या amravatidivision.gov.in  या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

00000

नेहरु मैदानावरील कचरा तात्काळ हटवा; जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांचे आदेश

अमरावती, दि. 14 ( जिमाका): अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील नेहरु मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या गंभीर समस्येवर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशीष येरेकर यांनी आज तातडीचे आदेश जारी करून, या परिसरातील संपूर्ण कचरा फक्त 48 तासांच्या आत उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार, शहरातील शिट नंबर 55 ए, प्लॉट नंबर 1/1 (नेहरु मैदान) या 13 हजार 627.81 चौ. मी. क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची भीती नाकारता येत नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही (MPCB) या कचऱ्यामुळे प्रदूषण होत असल्याचे कळविल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या कलम 30 नुसार नेहरु मैदानावरील सर्व कचरा (केरकचरा) त्वरित उचलण्याचे निर्देश दिले आहे. कचरा उचलल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी योग्य निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहीम राबवावी. कचरा उचलण्याची संपूर्ण प्रक्रिया पुढील ४८ तासांत पूर्ण करावी. यापुढे या परिसरात पुन्हा कचरा साठणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

0000000






महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे

- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र

            मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत

अमरावती, दि. 14 (जिमाका) :महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या वतीने दिवाळी महोत्सवानिमित्त ‘मेळघाट हाट’, सायन्सस्कोर मैदान येथे भरविण्यात आलेल्या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन आज मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महोपात्र यांच्या हस्ते झाले. महिला बचत गटांनी  तयार केलेला दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्रीमती संजीता महोपात्र यांनी केले.

 महा एफ.पी.सी.संचालक सुधीर इंगळे, माविमचे विभागीय सल्लागार केशव पवार, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यात जिल्ह्यातील विविध महिला बचत गट यांच्याकडून हस्तनिर्मित उत्पादने, स्थानिक खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ, सजावटीच्या वस्तू, कापड, सुगंधी अगरबत्ती, तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकृती यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. महिलांच्या कष्टातून आणि कौशल्यातून घडविलेल्या या वस्तूंना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपल्या घरासाठी व दिवाळी भेटवस्तूसाठी महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची खरेदी करून ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला हातभार लावला आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 19 ऑक्टोबरपर्यंत मेळघाट हाट येथे भरविण्यात आलेल्या या दिवाळी विशेष विक्री व प्रदर्शनास भेट देवून महिला उद्योजकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे. या माध्यमातून ‘आत्मनिर्भर महिला - सशक्त समाज’ हा संदेश दिला जाईल, असे आवाहन डॉ. रंजन वानखेडे यांनी केले आहे.

00000

ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी: जिल्ह्यात 5 कौशल्य विकास केंद्र

प्रशिक्षण संस्थांकडून 17 ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव आमंत्रित

            अमरावती, दि. 14 ( जिमाका) - ग्रामीण भागातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने शासनामार्फत 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात येत आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण पाच गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती यांच्यामार्फत यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अचलपूर (कांडली), अंजनगाव सुर्जी (कापूसतळणी, सातेगाव), चांदुर रेल्वे (आमला विश्वेश्वर), आणि दर्यापूर (येवदा) या गावांमध्ये किंवा संबंधित तालुक्यांमधील इतर गावांमध्ये प्रशिक्षण राबविण्यासाठी संस्था अर्ज करू शकतात. इच्छुक संस्थांनी आपला परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 17 ऑक्टोबर, 2025 पूर्वी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे .

अर्जदार संस्था भागीदारी फर्म, एलएलपी, खाजगी,पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा सोसायटी, पब्लिक ट्रस्ट कायद्यानुसार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच, मागील चारपैकी (2020-21 ते 2023-24) कोणत्याही दोन वर्षांत संस्थेची सरासरी वार्षिक उलाढाल प्रति ठिकाण 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असावी. तसेच, अर्जदार कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेद्वारे काळ्या यादीत (Blacklisted) नसावा. संस्थांच्या निवडीचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत. अधिक माहिती किंवा अडचणीसाठी कार्यालयाच्या (0721-2566066) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवकांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे. अर्जदार हा ट्रेनर पार्टनर म्हणून स्कील इंडिया डिजिटल पोर्टल पर सूचीबद्ध झालेला असावा.

            अर्जदाराने अल्पकालीन प्रशिक्षण मध्ये किमान 300 उमेदवारांना प्रशिक्षित केलेले असावे. अर्जदाराने उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार दिलेला असावा. सर्व माहिती तसेच आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास संपर्क साधावा. अर्जदारास कौशल्यासाठी कोणताही पुरस्कार मिळाला असेल तर प्राधान्य देण्यात येईल.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...