Thursday, March 12, 2026

DIO NEWS AMRAVATI 12 -03-2026





जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

अमरावती, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधीक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

00000 


अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;

१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती,दि.१२ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे अमरावती येथे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील १०० विद्यार्थ्यांसाठी नवीन मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. या वसतिगृहासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी अंदाजे ९२०० चौरस फूट बांधकाम असलेली इमारत भाड्याने हवी असून, इच्छुक इमारत मालकांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.

अमरावती शहरातील स्थानिक इच्छुक इमारत मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज ‘सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती’ या कार्यालयात सादर करावयाचे आहेत. या कार्यालयाचा ईमेल आयडी adobbwoamravati@gmail.com हा आहे.

बातमी प्रसिद्ध झाल्यापासून पुढील १५ दिवसांपर्यंत कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील. अर्जाचा नमुना आणि इतर सर्व अटी व शर्तींची सविस्तर माहिती वरील कार्यालयात उपलब्ध आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी हक्काचे निवासस्थान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने ही प्रक्रिया गतिमान केली आहे.

0000


खेळाडूंसाठी 'क्रीडा ई-प्रमाण' प्रणाली कार्यान्वित;

आता घरबसल्या मिळणार प्रमाणपत्र

अमरावती,दि.१२ (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळवून देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित या प्रणालीमुळे आता खेळाडूंना त्यांचे आरक्षण प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करता येणार असून, यामुळे बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकारांना पूर्णपणे आळा बसेल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

ही नवीन प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. यामध्ये खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि ती मूळ डेटाशी जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड असेल, ज्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा पोलीस भरती यांसारखे नियुक्ती प्राधिकारी प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील. विशेष म्हणजे, आगामी सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या 'क्रीडा ई-प्रमाणपत्रा'ची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्र पडताळणी केली आहे, त्यांनाही आता नवीन प्रणालीद्वारे हे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://sports.maharashtra.gov.in/) भेट देऊन 'Our Services' मधील '५% Reservation' या टॅबमध्ये नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधार-संलग्न मोबाईल क्रमांक, वैध ई-मेल आयडी, आधार कार्ड आणि क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्य प्रमाणपत्र (PDF स्वरूपात) आवश्यक आहे. ज्या खेळाडूंची माहिती किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील, त्यांनी support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी. सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) आणि कुराश (२०१७-१८ व २०२४-२५) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून इतर खेळांचे अभिलेख अपलोड करण्याची प्रक्रिया  सुरू आहे, असेही क्रीडा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

*****


'स्वाधार'च्या प्रलंबित अर्जांसाठी विशेष मोहीम;

त्रुटी दूर करण्यासाठी १६ मार्चपासून कार्यशाळेचे आयोजन

अमरावती,दि. १२ (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन १६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत दुपारी ३ ते ५ या वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,अमरावती येथे करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज केवळ तांत्रिक त्रुटींमुळे किंवा कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी अमरावती समाज कल्याण विभागातर्फे याकार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या अर्जांचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना शैक्षणिक भत्ता मिळण्यास मदत होणार आहे.

शहरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते, मात्र शासकीय वसतिगृहांची प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांचा निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च सुसह्य व्हावा यासाठी शासन 'स्वाधार' योजनेअंतर्गत थेट बँक खात्यात रक्कम जमा करते. मात्र, ऑनलाइन अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला, आधार लिंकिंग किंवा बँक खात्याच्या माहितीमध्ये झालेल्या चुकांमुळे अनेक अर्ज 'Sent Back' (परत) केले जातात. विद्यार्थ्यांची अडचण ओळखून समाज कल्याण विभागाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या अर्जांमधील त्रुटी जागेवरच तपासून त्या कशा दूर कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव रखडले आहेत, त्यांनी आपले मूळ कागदपत्रे, ऑनलाइन अर्जाची प्रत आणि लॉगिन आयडीसह या कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.

0000


आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे अतिजोखमीच्या मातेचे वाचले प्राण; अचलपूरच्या मडकी येथील आरोग्य चमूची कामगिरी

अमरावती , दि. १२ ( जिमाका) :  कर्तव्यदक्षता आणि वेळेवर घेतलेला अचूक निर्णयामुळे अचलपूर तालुक्यातील मडकी येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या चमूने केलेल्या अथक परिश्रमामुळे एका अतिजोखमीच्या मातेचे आणि तिच्या नवजात बालकाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. 'मिशन २८०' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या गृहभेटी दरम्यान गरोदर मातेच्या आरोग्याचा धोका लक्षात आल्याने ही तत्परता दाखवण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

मडकी येथील रहिवासी मीनाक्षी अमोल धांडे या गरोदर मातेच्या घरी आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका भेटीसाठी गेल्या असता, मातेच्या पायावर सूज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला कुटुंबाने माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र आरोग्य सेविकांनी तत्परतेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची सूचना दिली. डॉ. नीता निगोळे, डॉ. प्रशांत ढोके आणि प्रविणा धाकडे यांनी मातेची तपासणी केली असता, त्यांचा रक्तदाब अत्यंत धोकादायक पातळीवर असल्याचे आढळले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य पथकाने कुटुंबाचे सविस्तर समुपदेशन केले आणि गरोदरपणात रक्तदाब वाढल्याने उद्भवणाऱ्या जीवघेण्या धोक्यांची जाणीव करून दिली.

 यावेळी मातेला तातडीने अचलपूर आणि त्यानंतर अमरावती येथील डफरिन रुग्णालयात हलविण्यात आले. डफरिन रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाल्याने मातेने एका गोंडस कन्येला सुखरूप जन्म दिला. सध्या माता आणि बाळ दोन्ही सुरक्षित असून, जिल्हा प्रशासनाच्या 'सुरक्षित मातृत्व अभियाना'चे हे यश मानले जात आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12 -03-2026

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन अमरावती, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. ...