चिखलदऱ्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करू
                                                    - प्रविण पोटे
·        चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन
          अमरावती, दि 25 (जिमाका) : निसर्गाचं वरदान लाभलेले, विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचीत असलेले चिखलदरा, पर्यटनाच्या बाबतीत  मात्र माघारले आहे. या थंड हवेच्या ठिकाणाची देशभर उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी चिखलदरा पर्यटन महोत्सवा सोबतच येथे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देऊ अशी हमी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिली.
          चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज चिखलदरा येथे खासदार आनंदराव अडसूळ यांचे हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.पोटे बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रभुदास भिलावेकर, डॉ.अनिल बोंडे, रमेश बुंदिले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, धारणी उपविभागीय अधिकारी शण्‍मुखराजन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत सवाई, नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल कर्डीले उपस्थित होते. 
         चिखलदरा पर्यटन महोत्सव पुन्हा सुरु करण्याची प्रेरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. मेळघाट मधील व्याघ्र प्रकल्पातील 15 गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. चिखलदरा शहराची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी 432 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना राज्य शासनाने मंजूर केली आहे. 132 कोटी रुपये खर्च करून सबस्टेशन सुरु केल्यामुळे आतापर्यंत अंधारात जीवन जगणाऱ्या मेळघाटमधील 120 गावांना वीज पुरवठा सुरू झाला आहे. मेळघाटमध्ये उत्तम रस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 5 हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चिखलदरा पर्यटन स्थळ म्हणून देशभर नावारूपास येईल यात शंका नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
          चिखालदऱ्यामध्ये रस्ते, पाणी, वीज आणि राहण्याची उत्तम व्यवस्था निर्माण झाली तर पर्यटकांची संख्या वाढून येथील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाने योग्य काम करणे आवश्यक असल्याचे मत खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले. येथे उत्पादित होणाऱ्या मध, स्ट्रॉबेरी, बांबूच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
          येथे लावलेल्या विविध विभागाच्या तसेच महिला बचत गटाच्या स्टॉलचे फित कापून मान्यवरांनी उद्घाटन केले. चिखलदरा पर्यटन वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते पार पडले. तसेच मुख्याधिकारी राहुल कर्डीले आणि  सूर्यकांत पिदूरकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
          या कार्यक्रमाचे संचालन गजानन देशमुख यांनी केले तर आभार राहूल कर्डीले यांनी मानले. यावेळी नगरसेवक, चिखलदरा पर्यटन महोत्सव समितीचे सदस्य, अधिकारी, आदिवासी बांधव उपस्थित होते.
00000

सावळे/झिमटे/खंडारकर/दि.25-02-2017/18-34 वाजता



















Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती