सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांनी केले श्रमदान

       
दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील



 अमरावती, दि. 19  : पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी वरुड तालुक्यातील अमडापूर व मुसळखेडा या गावांमध्ये श्रमदानासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला पत्रकार बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी स्वत: पालकमंत्री व अनेक पत्रकार बांधवांनी श्रमदान करुन गावक-यांचा उत्साह वाढवला.  
 दुष्काळावर मात करण्यासाठी पानी फाऊंडेशन व शासनाच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी विविध गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. पालकमंत्री श्री. पोटे- पाटील हे पत्रकार बांधवांसह सकाळीच मुसळखेडा येथे दाखल झाले. आमदार अनिल बोंडे, अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह त्रिदीप वानखडे, विजय ओडे, संजय शेंडे, शशांक चवरे, राजेश सोनोने, संजय बनारसे, सुरेंद्र चापोरकर, प्रशांत कांबळे, अमोल खोडे, अंकुश गुडदे, मीनाक्षी कोल्हे, प्रवीण मनोहर, शशांक नागरे, स्वराज्य माहुरे, मनीष तसरे, अक्षय नागापुरे यांच्यासह अनेक वृत्तपत्र छायाचित्रकार व कॅमेरामन यांनी या कार्यात सहभाग घेतला.
पालकमंत्री व अमरावती येथून दाखल झालेले माध्यम प्रतिनिधी  स्वत: श्रमदानात सहभागी झाल्याने ग्रामस्थांमध्येही उत्साह संचारला. तलाव क्षेत्रातील माती भरावावर टाकण्यासाठी पालकमंत्र्यांसह पत्रकार व अधिका-यांची साखळी तयार करण्यात आली. ‘जल नही तो कल नही’, ‘कावळा करतो काव काव, एक तरी झाड लाव’ अशा घोषणा देत उन्हाची पर्वा न करता सर्वांनी समरसून श्रमदान केले.
मुसळखेडा येथील अनघड दगडी बांधांच्या कामातही दगड वाहून नेण्यासाठी साखळी करुन श्रमदान करण्यात आले. अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे सर्व सदस्य, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण व खनिकर्म विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गावकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक या कामात सहभागी झाले होते. 




दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील


स्पर्धेत कुणातरी एकालाच क्रमांक मिळणार असतो. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेचा हेतू हा केवळ स्पर्धा  एवढाच नसून, दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट असल्याचे मत पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.  
ते म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना आहे. दुष्काळमुक्तीसाठीच्या या योजनेचा लोकसहभाग हाच आधार राहिला आहे. श्रमदानातून होणा-या कामांमागे लोकभावनेची ताकद असते. त्यामुळे ती यशस्वी होतात. हेच लक्षात घेऊन ही पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात व राज्यातही मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत. त्यामुळे इतर राज्यांनीही महाराष्ट्राचा आदर्श घेऊन अशा योजना अमलात आणल्या आहेत.
                  
योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांचे योगदान
जलयुक्त शिवार योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे सांगून श्री. पोटे- पाटील म्हणाले की, आजही पत्रकार बांधवांनी स्वत: श्रमदानात सहभागी होऊन विधायक कार्याला प्रेरणा दिली आहे. श्रमदानात सहभागी सर्व पत्रकारांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

पालकमंत्र्यांकडून एक लाख रुपयांची मदत
यावेळी अमडापूर येथील जलयुक्त शिवार कामांसाठी पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या कामांत यापुढे कुठलीही अडचण आल्यास शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वरुड तालुक्यातील भूजलपातळीतील घट चिंताजनक होऊन त्याचा डार्कझोनमध्ये समावेश झाला. ही स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तालुक्याची या योजनेसाठी निवड केली, असे सांगून श्री. बोंडे म्हणाले की, आता वरुड तालुका नाला खोलीकरणाच्या कामांत राज्यात आघाडीवर असून, या कामांमुळे भूजलपातळीत सुधारणा होईल. अमडापूर येथील सरपंच सारिका सोनारे, पानी फाऊंडेशनचे अतुल काळे, उज्ज्वल कराळे, गोवर्धन दापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
00000









Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती