Monday, June 26, 2017

 उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती राज्यात अव्वल ठरेल
- पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

पालकमंत्र्यांकडून विकास कामांची पाहणी
   अमरावती दि.26: जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्या अद्ययावत सुविधा असलेल्या प्रशस्त इमारती शहरात आकारास आल्या आहेत. शहरातील उड्डाण पूल, रस्ते आदी विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. या उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती शहर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.    
शहरात उभारण्यात आलेल्या जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आदी इमारती, राजापेठ उड्डाण पूल, बेलोरा विमानतळ आदी विविध विकास कामे व प्रकल्पांची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा व भविष्यातील विकासाच्या शक्यता पडताळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन या कामांची पाहणी केली आहे. या पाहणीत सर्वांच्या संकल्पना जाणून घेतल्या व शक्य तिथे विकास कामांत त्यांचा समावेशही केला जाईल.  राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या ज्या विभागांच्या नव्याने इमारती उभारल्या जात आहेत,  त्या विभागांच्या अधिका-यांच्या संकल्पना जाणून घेऊन इमारतींना आकार देण्यात येत आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
  विमानतळावरील एअर स्ट्रीपची लांबी 1800 मीटरहून 2200 मीटर पर्यंत वाढविल्यास मोठी विमानेही उतरू शकतील. त्यामुळे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. पोटे- पाटील यांनी यावेळी सांगितले. ही मागणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे खासदार श्री. अडसूळ म्हणाले. विमानतळाच्या कुंपण भिंतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ते काम सुरु होणार आहे.


महापालिकेसाठी नवीन इमारत
यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. ही जागा तपोवन परिसरात महामार्गालगत असून लवकरच हे काम मार्गी लावण्यात येईल. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.
जिल्हा क्रीडा संकुल
 जिल्हा क्रीडा संकुलासाठी प्रस्तावित 7 एकर जागेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. या ठिकाणी आर्चरी रेंज, बॅडमिंटन, ज्युडो हॉल, तरणतलाव आदी  सुविधा उभारण्यात येणार आहेत.  या जागेची तत्काळ मोजणी करून घ्यावी व कामाला गती द्यावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
                             वडाळी गार्डन तलावाचे सौंदर्यीकरण
वडाळी गार्डन येथील तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. तलावाची स्वच्छता करुन त्या भोवती चांगल्या दर्जाचे कुंपण उभारावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
त्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत, प्रादेशिक न्यास सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भेट देऊन या तिन्ही इमारतींच्या प्रत्येक कक्षाची पाहणी केली. चित्रा चौक ते मालवीय पुल, राजापेठ उड्डाणपूल येथील कामांची पाहणी करुन या कामांना तत्काळ गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  या प्रकल्पांमुळे नागरी सुविधांत भर पडून विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                                                              00000








No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...