चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शनिवारी प्रारंभ
वृक्षदिंडीत मोठा प्रतिसाद; नागरिकांनी केला वृक्षसंवर्धनाचा निर्धार
             अमरावती, दि. 30 :  शासनाच्या 4 कोटी वृक्षलागवड अभियानाला उद्यापासून (दि. 1 जुलै) प्रारंभ होत असून, त्यानिमित्त आज वनविभागातर्फे शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला.   
जिल्हाधिकारी कार्यालयापासून या वृक्षदिंडीची सुरुवात झाली. प्रारंभी महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतरदापोरी येथील संत तुकडोजी महाराज भजन मंडळीच्या कार्यकर्त्यांनी गायिलेल्या भजनाच्या तालासुरावर दिंडी इर्विन चौकाकडे मार्गस्थ झाली.          
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचाही सहभाग
इर्विन चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील हेही दिंडीत सहभागी झाले. पालकमंत्र्यांनी दिंडी खांद्यावर घेत नागरिकांचा व प्रशासनाचा उत्साह वाढवला. ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’अशा घोषणा देत ही दिंडी पुढे रेल्वेस्थानक चौकात आली. त्यानंतर आणखी नागरिक दिंडीत सहभागी होत वातावरण अधिक उल्हसित झाले.
 मोर्शी येथील विद्याधर कोरे यांनी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत चित्ररथावर आरुढ होऊन वृक्षप्रेमाचा संदेश दिला. वृक्षदिंडीत ज्ञानमाता विद्यालय, शिवाजी मराठा विद्यालय, आरडीआयके शाळा, मणिभाई गुजराती शाळा, शासकीय तंत्रनिकतेन आदी शाळांचे विद्यार्थी उत्साहात घोषणा देत वृक्षसंगोपनाचा संदेश देत होते. पुढे बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक असा दिंडीचा मार्ग होता. तिथून सगळे वृक्षप्रेमी बचतभवनाजवळ येऊन दिंडीचा समारोप झाला.  वनसंरक्षक हेमंतकुमार मीना,  उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम, वनसंरक्षक रवींद्र वानखडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पडगव्हाणकर, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक अमित कळसकर, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, प्रा. राजेश चिधडी आदी यावेळी उपस्थित होते.
00000 



















Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती