वनविभागातर्फे जिल्ह्यात लावणार साडेआठ लाख झाडे
             वृक्षारोपण अभियान सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद   
             
           अमरावती दि.28:  ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी आज वृक्षारोपणाचा संदेश दिला. निमित्त होते वृक्षलागवड अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे आयोजिलेल्या सायकल फेरीचे!
वन विभागातर्फे दि. 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्षलागवड होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात आली. त्यात विविध क्षेत्रातील नागरिकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.  
          विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते.
मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयापासून मोठ्या उत्साहात सायकल रॅलीची सुरुवात झाली. रोपटी व फुलांनी सुशोभित चित्ररथ व त्यापाठोपाठ सायकलस्वार अधिकारी- कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी असे या रॅलीचे स्वरुप होते. पोलीस आयुक्त शहर कार्यालय – मालटेकडी- बसस्थानक- रेल्वेस्थानक- राजकमल चौक- जयस्तंभ चौक- इर्विन चौक- गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गे रॅली बचतभवनात येऊन तिचा समारोप झाला. 
अनेक शाळा, महाविद्यालये, अशासकीय व सामाजिक संघटनांच्या एकत्रित सहभागातून वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ही मोहिम यशस्वी करण्यात येईल, असे श्री. मीना यांनी यावेळी सांगितले.वनसंरक्षक रवींद्र वानखडे, श्री. कळसकर, सहायक वनसंरक्षक श्री. कविटकर, श्री. पडगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
                                       शुक्रवारी वृक्षदिंडी व वृक्षपूजन
       अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे शुक्रवार, दि. 30 जूनला सकाळी नऊला वृक्ष दिंडी व वृक्ष पूजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.  वृक्षदिंडीची जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होऊन ती इर्विन चौक- रेल्वेस्थानक चौक बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जाऊन बचतभवनात समारोप होणार आहे. 
                                     000000









Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती