Sunday, January 27, 2019

जिल्हा कृषी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

          नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करावे
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

-  हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत प्रारंभ
- प्रयोगशील शेतक-यांचा गौरव
- महोत्सवात मिळणार प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण
- नानाविध फळे, फुले व पीकांचे प्रदर्शन
- कृषी महाविद्यालयाकडून किचन गार्डनची प्रतिकृती सादर
- अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचे अनेक कक्ष

अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात शेतीविकासाची मोठी शक्यता लक्षात घेऊन शासनाकडून अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी यंत्रणा व विविध घटकांनी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.

कृषी विभागातर्फे अमरावती जिल्हा कृषी महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात व हजारो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत प्रारंभ आज येथील सायन्सकोर मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपसंचालक अनिल खर्चान, जिल्हा कृषीविकास अधिकारी कुर्बान तडवी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा समितीचे जयंत आमले, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

                   पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, शासनाकडून जलयुक्त शिवार योजना, शेततळे, धडक सिंचन विहिरी, कृषीपंप वितरण आदी योजनांतून सिंचनक्षमता व कृषी उत्पादकतेत भर पडली आहे. त्याला गती देण्यासाठी शेतकरी बांधवांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर, प्रयोग व पूरक व्यवसायाकडे वळविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने महोत्सवात पीक व्यवस्थापन, मार्केटिंग, बियाणे निर्मिती, पूरक उद्योग याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, प्रयोगशील शेतक-यांचा गौरव व प्रेरणादायी अनुभवकथन आदींचा समावेश केला आहे. त्याचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना निश्चितच लाभ होईल.
          ते  पुढे म्हणाले की, निरनिराळ्या पदव्या मिळवलेले ग्रामीण तरूण नोकरी न करता प्रायोगिक शेतीकडे वळत आहेत, हे निश्चित आश्वासक आहे. शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी त्यांनी शेतीसोबत रेशीम उत्पादन, मधमाशीपालन, बांबूलागवड, बांध वृक्षलागवड असे विविध पूरक व्यवसाय केले पाहिजेत.  सकारात्मक दृष्टीने नव्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. त्यातून निश्चित यश मिळते. रेशीम उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळविणा-या श्री. खडसे या शेतकरी बांधवाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी सहाय्य करू, असेही ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले की, शेतीत उत्पादनवाढीसह विपणन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.  महोत्सवातही त्याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा.  श्री. नागरे, श्री. नळकांडे  यांनीही मनोगत  व्यक्त केले.
                                       विविध कक्षांना भेटी
                   महोत्सवातील विविध कक्षांना भेटी देऊन तेथील अधिका-यांकडून माहिती जाणून घेतली व महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.                                                         प्रयोगशील शेतक-यांचा सन्मान
मेळघाटातील डोंगराळ भागात यशस्वी शेती करणारे भुलोरीचे दादू जामुनकर, शेततळ्यात यशस्वी मत्स्यपालन करणारे टिटंबा (ता. धारणी) येथील रामगोपाल मावस्कर यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतक-यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रयोगशील शेतक-यांशी संवाद साधून त्यांनी माहिती जाणून घेतली व त्यांचे कौतुक केले.
                                     
महोत्सवात विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्यमहोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी 200 कक्षांचा समावेश आहे. शासकीय विभागांबरोबरच कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व विविध कंपन्या यांचे कक्ष असून, प्रात्यक्षिकातून माहिती दिली जात आहे.  ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दि. 31 जानेवारीपर्यंत दररोज मिळणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने लक्षात घेऊन संत्रा पीकाविषयी रोग व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन याबाबत स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले आहे. कापूस पीकाविषयी नफ्याची शेती, कृषी क्षेत्रात निर्यातीच्या संधी, कुक्कुटपालन, शेळीपालन, औषधी वनस्पती, मत्स्यपालन, पाणलोट व्यवस्थापन व रेशीम उद्योग आदी विविध विषयांवर अनेक मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय शेतक-यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणा-या यशोगाथांचे सादरीकरण व अनुभवकथन हा महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे, असे श्री. इंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्री. खर्चान यांनी आभार मानले.






No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...