शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
कुशल मनुष्यबळासाठी कौशल्याधारित शिक्षणावर भर
- शिक्षणमंत्री विनोद तावडे
विद्यार्थ्यांना त्यांची आवड लक्षात घेऊन त्या विषयात पारंगत केल्यास ते अधिक परिणामकारपणे व प्रभावीपणे काम करतील. हे लक्षात घेऊन कौशल्याधारित शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार सुनील देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर मिलींद चिमोटे, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्यासह प्राध्यापकगण व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, राज्यात ‘थ्री इडियटस्’मधल्या घोकंपट्टीवाल्या चतुरलिंगमऐवजी ‘रँचो’ निर्माण झाले पाहिजेत. विद्यार्थ्याला कौशल्य प्राप्त असेल तर रोजगार निश्चित मिळतो. हे लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, संगीत, कला, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात रुची असलेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रात प्रगती करता यावी असा उपयुक्त कौशल्याधारित अभ्यासक्रम रचना करण्यात आली आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचूक यासारख्या मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. विविध प्रकारचे 605 अभ्यासक्रमांच्या रचनेतून विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय खुले केले. त्याशिवाय, ओपन एसएससी बोर्डाची निर्मिती करण्यात येईल.
शालेय अभ्यासक्रमात पाचवी व आठवीला परीक्षा घेतली जाईल, तसेच प्राध्यापक भरतीही होणार असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या परिसरातील विद्यार्थ्यांना सवलती लागू करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी सुरु आहे. जिथे अद्यापही अंमलबजावणी झाली नाही, तिथे तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना श्री. तावडे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात श्री. तावडे यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात त्यांनी स्टेजवरून खाली उतरून विद्यार्थ्यांत मिसळून श्री. तावडे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपला कल जाणून त्यानुसार कौशल्ये प्राप्त करा. तसे शिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी श्री. तावडे यांच्यासह सेल्फीही घेतली.
वादविवाद स्पर्धेत मार्गदर्शन
या कार्यक्रमानंतर शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात स्व.मानिकराव धवळे स्मृती वादविवाद स्पर्धेलाही श्री. तावडे यांनी भेट दिली. चांगला वक्ता घडण्यासाठी चांगले वाचन व सामाजिक प्रश्नांचे भान असले पाहिजे. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी खेळाडू गौरव चांदणे व तेजस्विनी दहिकर यांचा गौरव करण्यात आला.



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती