नियोजन समितीच्या बैठकीत 2019-20 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांना समान निधीचे वाटप - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील



          अमरावती, दि. 30 : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी सन २०१९-२०  या वर्षासाठीच्या प्रारूप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा व जिल्हा परिषदेच्या सर्व क्षेत्रांत निधीचे समान वाटप व्हावे, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.
           जिल्हा नियोजन समितीतर्फे २०१९-२० च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यासाठी बैठक पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार सर्वश्री वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रमेश बुंदेले, श्रीमती यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, आदिवासी प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह नियोजन समितीचे विविध सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.
           सभेच्या प्रारंभी दिवंगत माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर आणि संजय बंड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी व्हीव्हीपॅट यंत्रणेविषयी माहिती दिली. त्याविषयीची चित्रफीत दाखविल्यानंतर समितीच्या सदस्यांनी व्हीव्हीपॅट मशीनवर चाचणी मतदान करून प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.      
          सभेत दि. 12 जानेवारी 2018 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने मांडलेल्या आराखड्यानुसार, सर्वसाधारण योजनेत २१२ कोटी 86 लाख रुपये, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 98 कोटी 92 लाख, तर आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रासाठी 149 कोटी 46 लाख रुपये निधीच्या वार्षिक आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यांतर्गत रस्ते व जिल्हा जोडरस्त्यांच्या नियोजित कामांनाही मान्यता देण्यात आली.
जिल्ह्यात सर्व क्षेत्रांत निधीचे समान वाटपाच्या दृष्टीतून योग्य नियोजन करण्यात आले आहे. कुठलेही क्षेत्र वंचित राहू नये, या भूमिकेतून हा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला, असे श्री. पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.   
विविध विभागांच्या अनेकविध विकासकामांचा समावेश प्रस्तावित आराखड्यात करण्यात आला आहे. सन २०१८-१९ मधील वार्षिक योजनेत आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावाही घेण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी स्वागत केले. जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती