ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांसाठी जनजागृती प्रशिक्षण व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांद्वारे पारदर्शी प्रक्रियेची खातरजमा -विभागीय आयुक्त पीयुष सिंह










 -मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिकाला सुरवात
जिल्हा प्रशासनाची विशेष मोहीम

अमरावती, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे विशेष मोहिम हाती घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती
 करण्यात येत आहे.  मोहिमेदरम्यान नागरिकांनी सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज तळवेल येथे केले.
           श्री. सिंह यांच्या उपस्थितीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन प्रात्यक्षिक आज चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह तळवेलचे अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
           प्रारंभी व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात येऊन त्यानंतर नागरिकांकडून मतदान करण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिकात ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच मत मिळाल्याची खातरजमा नागरिकांना करता आली. तरुण, ज्येष्ठ मतदारांसह महिला मतदारांनी या प्रात्यक्षिकात सहभागी होऊन व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या विश्वासार्हतेचा पडताळा घेतला व समाधान व्यक्त केले.
ज्या नागरिकांचे मतदान यादीत नाव नाही किंवा नुकतेच ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली, त्यांनी तत्काळ मतदान यादीत नाव नोंदविण्याचे आवाहनही यावेळी श्री. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. देशमुख म्हणाले की, जनतेच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून व्हीव्हीपॅट यंत्रणेची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे. सर्व शंकांचे निरसन प्रात्यक्षिकातून होऊ शकेल, इतकी ही सुस्पष्ट व पारदर्शी प्रक्रिया आहे. नागरिकांनी त्यात सहभागी होऊन निवडणुकीच्या पवित्र व राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.
मतदान ते मतमोजणी ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते, याचा पडताळा या प्रात्यक्षिकातून घेता येणार आहे. पोल सुरू झाल्याची व बंद झाल्याच्या वेळांची नोंदही यंत्रणेत असल्याने ही प्रक्रिया अत्यंत अचूक व पारदर्शी आहे.  जिल्ह्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  
जिल्ह्यात 3295 व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली असून, त्याची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण केली आहे.  जनजागृती मोहिमेत पथकातील कर्मचारी फिरत्या वाहनाव्दारे प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रचार व प्रसार आणि मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान (Mockpoll) होत आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.  
  उपविभागीय अधिकारी श्री. राठोड यांनी यावेळी बॅलेट युनिटमधील मतदान व व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्ठ्यांद्वारे येणारे मतदान तंतोतंत असल्याचे सर्व नागरिकांसमोर मोजून दाखविले. मतदाराने केलेले मतदान हे त्याच उमेदवाराला व त्याच चिन्हाला दिले जात
असल्याबाबत मतदाराचे पूर्ण समाधान प्रात्यक्षिकाद्वारे करून दिले गेले.  
मतदाराला दिसते आपल्या मतदानाची नोंद
 व्हीव्हीपॅट हे एक प्रिंटर असून मतदाराने आपल्या मताची नोंद त्याद्वारे सुस्पष्ट दिसणार आहे. ईव्हीएमवर मत नोंदविल्यानंतर त्याची प्रतिमा व्हीव्हीपॅटद्वारे सात सेकंद मतदाराला बघता येणार आहे.  या प्रात्यक्षिकाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या जनजागृती मोहिमेबाबत विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आणि ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती