सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी -ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे




* जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद
अमरावती, दि. 27 : राज्याने दोन हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्‍प उभारण्‍यासाठी प्रत्येक गावाने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्‍याच्या पातळीवर थेट सरपंचांशी संवाद साधून सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सौर वाहिनीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ज्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्या प्रमाणात हस्तांतरीत करण्यात याव्यात. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करणे शक्य होईल. तसेच गावातील प्रकल्प असलेल्या पाणी पुरवठा, सार्वजनिक दिवाबत्तीसाठीही अत्यल्प किंवा मोफत वीज देता येऊ शकेल.
एका ग्रामपंचायतीमध्ये किमान दोन मेगावॅटचा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरपंचांची कार्यशाळा, बैठक घेऊन त्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांना जागा उपलब्ध करून दिल्यास गावाच्या सार्वजनिक सोयींनाही सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होणार असल्याचे सांगितल्यास त्यांचा यामध्ये सहभाग वाढण्यास मदत होईल. जागा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करण्‍याच्या सुचना श्री. बावनकुळे यांनी दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यात 146 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरीत जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात 46 एकर जागा दिलेली असून जागा उपलब्ध होण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न करण्यात येतील. तसेच गावामध्ये जागा शोधण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती