Friday, December 28, 2018

रस्ता सुरक्षिततेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक वाहतूक नियम मोडल्यास मोडल्यास परवाना निलंबनाची कारवाई - अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी




अमरावती, दि. 28 : वाहतूक नियमांचे पालन न करणा-या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश रस्ता सुरक्षा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार नियमभंग करणा-यांवर कारवाईचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आज येथे दिले.
            जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गीते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एम. एच. राठोड, बी. ए. खासबागे, डॉ. व्ही. व्ही. जाधव,  वाहतूक पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, सचिंद्र शिंदे, नंदिनी चानपूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एस. कपाटे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सिद्धभट्टी म्हणाले की, रस्ता सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने काटेकोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनात प्रवासी वाहतूक करणे, मद्यपान, अंमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे अशा नियमभंग करणा-यांविरुद्ध तीन महिने परवाना निलंबनाचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई व्हावी. चारचाकी वाहनधारकांकडून सीटबेल्टचा वापर व वेगमर्यादेचे पालन झाले पाहिजे. अपघातप्रवण स्थळांवर सुरक्षिततेसाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी तत्काळ अहवाल सादर करावेत.
परिवहन आयुक्तांच्या संदेशानुसार पोलीस विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभागातर्फे एक नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात यावा. कुठेही अपघात झाल्यास मदतीस धावून जाणा-या, तसेच अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात दाखल करणा-या नागरिकांबाबत गोपनीयता राखली जावी. त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. त्यांच्याबाबत न्यायालयाने नेमून दिलेल्या नियमावलीचा अवलंब व्हावा. त्या नियमावलीचे फलक पोलीस ठाणे व रुग्णालयात लावावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सेवेचा आढावा घेऊन रुग्णवाहिकांचा माहितीकोष तयार करावा. 108 व 1033 रुग्णवाहिकांबाबत माहिती सर्वदूर पोहोचावी. आकाशवाणीवरील जिल्हा माहिती कार्यालय पुरस्कृत संवादपर्व कार्यक्रमातून, तसेच विविध माध्यमांतून रस्ता सुरक्षेबाबत  जनजागृती करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.  

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...