Friday, December 21, 2018

रेल्वेच्या 52 कोटींच्या कामाचे भूमिपूजन प्रभावी संपर्कयंत्रणेची निर्मिती - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील




      अमरावती, दि. 21 : प्रभावी संपर्कयंत्रणा, सुलभ व सुरक्षित दळणवळणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील विविध रेल्वेस्थानकांत अनेक  सुविधांची निर्मिती होत असून, या सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.    
        रेल्वेच्या अमरावती, नया अमरावती, बडनेरा, चांदूर बाजार आदी स्थानकांचे पादचारी पूल, बडनेरा रेल्वेस्थानकावरील स्वचलित शिडी या 52 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, महापालिकेचे शिवसेना गटनेते प्रशांत वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.
        पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, खासदार श्री. अडसूळ यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन जिल्ह्यात नव्या रेल्वेमार्गांसह अनेक सुविधांना चालना दिली आहे.  रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीसुद्धा श्री. अडसूळ यांच्याकडून होत असलेल्या पाठपुराव्याचा विशेष उल्लेख एका भेटीप्रसंगी केला होता. जिल्ह्यात रेल्वेमार्ग व स्थानक विकासामुळे विकासाला अधिक चालना मिळेल.
        खासदार श्री. अडसूळ म्हणाले की, रेल्वे हे सुरक्षित, जलद व इतर साधनांच्या तुलनेत स्वस्त असे प्रवासाचे साधन आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात रेल्वेविकासाचा प्रयत्न होत आहे. नरखेड रेल्वेमार्ग, शकुंतला रेल्वे मार्गविकास याबाबत पाठपुरावा केल्यानंतर केंद्राकडून कार्यवाही सुरु झाली आहे. लवकरच ही कामे मार्गी लागतील. अमरावतीसह वर्धा, अकोला या जिल्ह्यांनाही रेल्वेविकासाचा लाभ होणार आहे.
        श्री. देशमुख म्हणाले की, खासदार श्री. अडसूळ यांनी अभ्यासूपणे प्रश्नांची मांडणी करून केंद्राकडे सतत पाठपुरावा केल्याने जिल्ह्यात रेल्वेविकासाची अनेक कामे पूर्ण झाली. अनेक कामे होत आहेत. श्री. वानखडे यांनी सूत्रसंचालन केले.     

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...