Monday, December 17, 2018

पालकमंत्र्यांकडून टंचाईग्रस्त गावांतील परिस्थितीचा आढावा टंचाई निवारणाची कामे प्रभावीपणे राबवा -- पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील






अमरावती, दि. 17 :  टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीपुरवठ्यासह शासनाने जाहीर केलेल्या योजना-सवलतींची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. मी स्वत: या गावांची पाहणी करणार आहे. नागरिकांकडून एकही तक्रार येता कामा नये. या कामात हयगय झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांतील स्थिती व पाणी नियोजन या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी यावेळी तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, नागरिकांकडून टंचाईबाबत निवेदने येत आहेत. तथापि, काही ठिकाणी विहिर अधिग्रहणाची पुरेसी कार्यवाही झालेली दिसत नाही. गटविकास अधिका-यांनी ग्रामसेवकांची बैठक घ्यावी व स्वत:ही  तालुक्यातील गावांना भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी करावी, तेथील गावक-यांशी संवाद साधावा व या गावांत अपेक्षित कामांना गती द्यावी. मी स्वत: गावांना भेटी देणार आहे. या कामांत काहीही हयगय केल्यास जबाबदार अधिकारी- कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल.
  पाणीपुरवठ्याच्या अंमलबजावणीत दिरंगाई होता कामा नये. सत्तर गाव पाणीपुरवठा योजनेलाही गती देणे आवश्यक आहे. टंचाईची स्थिती पाहता शॉर्ट टेंडर नोटीस काढून तत्काळ ही कामे मार्गी लावावीत. बॅकवॉटर क्षेत्रात चारा लागवडीस प्रोत्साहन देणारी योजना शासनाने लागू केली आहे. त्यानुसार शेतक-यांना प्रोत्साहन द्यावे.  जिल्ह्यात आजमितीला 1 लाख 51 हजारांहून अधिक शेतक-यांना सुमारे 846 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. त्रुटी असलेल्या अर्जांबाबत एकत्रित माहिती द्यावी, असेही ते म्हणाले.  
एस. टी. महामंडळातर्फे टंचाईग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य बस पासची सवलत देण्यात आली आहे. त्याचाही आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. टंचाईग्रस्त गावांत रोजगार हमी योजनेची कामे प्रभावीपणे राबवा. जॉबकार्डच्या नोंदणी करुन घ्या. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा, असेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात टंचाई निवारण, पाणीपुरवठ्याच्या 1939 योजनांचे नियोजन आहे. गतवर्षीच्या अधिग्रहित विहीरींची देयके अदा करण्यात आली किंवा कसे, याची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...