जिल्हाधिकारीपदी ओमप्रकाश देशमुख रूजू
                 टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणार
-         जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख

अमरावती, दि. 1 :  यंदाचे कमी पर्जन्यमान व पेयजल, सिंचन. चारा उपलब्धता आदी  स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी आज अमरावती येथे रूजू झाल्यावर सांगितले.
          जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार श्री. देशमुख यांनी प्र. जिल्हाधिकारी अजय लहाने यांच्याकडून स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध अधिका-यांनी श्री. देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
          जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी अधिका-यांशी चर्चा करून जिल्ह्यातील विविध बाबींची स्थिती जाणून घेतली. ते म्हणाले की, यंदा पर्जन्यमान कमी असल्याने टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या भरीव अंमलबजावणीबरोबरच चारा उपलब्धतेसाठी वैरण विकास कार्यक्रमासारख्या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला नेमून दिलेल्या जबाबदा-या व उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यावर भर द्यावा. प्राप्त निधी मुदतीत खर्च व्हावा. 
चिखलदरा येथील गटविकास अधिकारी तथा परिविक्षाधीन आयएएस अधिकारी श्रीमती मिताली सेठी यांच्याकडून त्यांनी चिखलदरा व मेळघाटातील स्थितीबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासह मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी काटेकोर कार्यक्रम, रोजगारनिर्मिती, वीजपुरवठा, संपर्कयंत्रणा आदींसाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
विविध पदांवर कार्य
श्री. देशमुख हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील जवळे-कडलग येथील आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम. एस्सी. (कृषी) ही पदवी प्राप्त केल्यानंतर ते 1987 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक व श्रीरामपूर येथे प्रांताधिकारी, नाशिक येथे निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, नाशिक येथे महसूल उपायुक्त, बुलडाणा व धुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.  त्यांना उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून 2007 मध्ये पुरस्कार प्राप्त आहे.
 अमरावतीला रूजू होण्यापूर्वी श्री. देशमुख यापूर्वी ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, मध्यप्रदेश निवडणुकीची जबाबदारी असल्याने पदभार घेण्यास नियुक्तीनंतर काही काळ गेला. अमरावती या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. मूळ खात्यात परत आल्याने स्वगृही परतल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
          प्र. अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, राम लठाड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. टाकसाळे, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव अनिल भटकर, नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, श्री. माळवे, स्वीय सहायक चंदू धकिते, आशिष नागरे, महेश दुबे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचा-यांनी जिल्हाधिका-यांचे स्वागत केले. 
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती