ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा दोन महिन्यात आठ हजार शिधापत्रिकांचे वाटप - जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे


अमरावती, दि. 2 -जिल्ह्यातील शिधापत्रिका वाटपाचे काम गतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सेतुमार्फत ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गत दोन महिन्यात आठ हजारहून अधिक शिधापत्रिकांचे वाटप झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी आज येथे दिली.
            जिल्ह्यातील ग्राहकहिताच्या दृष्टीने राबवावयाच्या उपायांबाबत सविस्तर चर्चा आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य डॉ. अजय गाडे, पंकज मेश्राम, रा. ज. वावरे, अनिल माधोगढिया, मनोहर बारसे, मंगेश मनोहरे, रंजनाताई मामर्डे, अशोककुमार राठी, राजू बसवनाथे, छाया दंडाळे, एस. एम. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, सहायक जि. पुरवठा अधिकारी समाधान सोळंके, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, महावितरणचे उप कार्य अभियंता सुनील नाईक, सहायक गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, करवसुली अधिकारी विजय गावंडे, पोलीस निरीक्षक आर. एस. टाले, पालिकेच्या पशुवैद्यक विभागाचे गुणसागर गवई, वैधमापन विभागाचे ध. कृ. राठोड आदी उपस्थित होते.  
शिधापत्रिका वाटप प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने  सेतु केंद्रात येणा-या अर्जांचा ऑनलाईन डेटा निर्माण होणार असून, त्यामुळे शिधापत्रिकांचे अचूक तपशील मिळायला मदत होणार आहे. वरूड, दर्यापूर तालुक्यात त्याचे कामही सुरू झाले आहे. अर्ज ऑनलाईन तपासताना त्रुटी आढळल्यास तत्काळ अर्ज सेतुकडे परत जाईल व सेतूकडून अर्जदारास कळवून पूर्तता केली जाईल. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, असे श्री. सोळंके यांनी यावेळी सांगितले.
            पुरवठा विभागाने केरोसिन वाटप थांबवल्याने गरीब नागरिकांना अडचणी येऊ शकतात, असे श्रीमती मामर्डे यांनी सांगितले. त्याबाबत श्री. टाकसाळे म्हणाले की, उज्ज्वला योजनेसह पं. दीनदयाळ उपाध्याय योजनेत मेळघाटसह सर्व जिल्ह्यात गॅस वाटपाचे अभियान राबविण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून केरोसिन वाटप यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. गॅसवाटप योजनेत  केशरी पत्रिकाधारकासह सर्वांनाच लाभ मिळतो. कमी किमतीचे छोटे गॅस सिलेंडरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
                           रिक्षांची तपासणी होणे आवश्यक
तथापि, रिक्षाचालकांकडून इंधनात भेसळ होते किंवा कसे, हे तपासणे आवश्यक असल्याची भूमिका सदस्यांनी मांडली. श्री. मेश्राम म्हणाले की, शहरात सकाळी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर होतो. रिक्षाचालकांकडून इंधनात भेसळ होत असल्यास प्रदुषण वाढते. या प्रदुषणाचा बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रिक्षातील इंधनात भेसळ होते का, हे वाहतूक पोलीस व आरटीओ यांनी तपासावे. प्रदुषण नियंत्रण कार्यक्रमाबाबत जनजागृतीची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
                        मोकाट जनावरांबाबत कारवाई होणे आवश्यक
शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. याबाबत तक्रारी करूनही महापालिकेकडून उत्तर मिळत नाही, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.  फ्रेजरपुरा येथील स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्याचा त्रास नागरिकांना होतो. कंपोस्ट डेपोचे निकष काय आहेत, हे तपासले पाहिजे. त्याशिवाय, महापालिकेकडून वेळेत माहिती मिळावी, अशीही मागणी सदस्यांनी केली. ग्राहक पंचायतीच्या कार्यालयालगत कचरा टाकला जातो. त्याबाबत तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याची नाराजीही सदस्यांनी व्यक्त केली.
                                  महिला प्रसाधनगृहांबाबत माहिती द्यावी
शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. याबाबत पालिकेकडून काय कार्यवाही झाली, अशी विचारणा श्री. मेश्राम यांनी केली. त्यावर अशी 28 प्रसाधनगृहे प्रस्तावित असून, 10 पूर्ण झाली आहेत, अशी माहिती आरोग्याधिका-यांनी दिली. या ठिकाणांची माहिती सादर करण्याचे निर्देश सदस्यांनी दिले.
                                    नायलॉन मांजावर निर्बंध
पुढील महिन्यातील मकरसंक्रांत व पतंगोत्सव लक्षात घेता पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर निर्बंध आहे. त्यामुळे जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे श्री. मेश्राम यांनी सांगितले.  जिल्ह्यात गतकाळात घडलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेचा तपास करून संशयितांना अटक केल्याबद्दल सायबर पोलीसांचे अभिनंदन समितीच्या सदस्यांनी केले.
                                    फूटपाथवर राहणा-यांसाठी शेल्टर
रस्त्याच्या कडेला झोपणारे, फुटपाथवर राहणा-या नागरिकांच्या निवा-यासाठी बडनेरा रेल्वेस्थानकावर शेल्टर सुरू आहे. कुणाच्याही निदर्शनास अशा व्यक्ती आल्यास त्यांना शेल्टरबाबत माहिती द्यावी. या निवारा केंद्रामार्फत संबंधित नागरिकाच्या पुनर्वसनासाठी मदत केली जाते, असे आवाहन श्री. बसवनाथे यांनी बैठकीत केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती