केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अमरावती जिल्ह्याचा गौरव








रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या निर्मितीवर भर  
मनरेगांतर्गत रोजगारनिर्मितीची दखल
अमरावती, दि. 26 :  रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवून अचूक नियोजन व अंमलबजावणीमुळे गत वर्षात मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता आदी मुलभूत सुविधांची शेकडो कामे पूर्ण झाली. जिल्ह्याच्या या योगदानाची दखल घेऊन केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.    
दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानातील उमेद अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत(मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने, तर अमरावती जिल्ह्याला मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
            नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शैलेश नवाल, धारणी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड आणि जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  माया वानखडे यांनी स्वीकारला. मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्ह्यात मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
            जिल्ह्यात स्थलांतर रोखणे व मुलभूत सुविधांची उभारणी डोळ्यासमोर ठेवून 2018-19 या वर्षात जिल्ह्यात 78.81 लक्ष मनुष्यदिन रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रत्यक्षात हे प्रमाण 84.84 लक्ष रोजगारनिर्मितीपर्यंत पोहोचून उद्दिष्टाच्या 108 टक्के पूर्ण झाले. 25 हजार 950 कुटुंबांना 100 दिवस रोजगार मिळाला.
            मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुके मध्यप्रदेश सीमेलगत असून, दरवर्षी दिवाळीनंतर स्थलांतराचे प्रमाण मोठे असते. या परिसरात कुपोषणाची समस्येचे निर्मूलन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. तथापि, स्थलांतरामुळे तेथील नागरिक व बालके पोषण आहार योजनांचा सलग लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे स्थलांतर रोखण्यासाठी मेळघाटावर अधिक फोकस ठेवण्यात आला. मेळघाटात उद्दिष्टाच्या 111. 92 टक्के रोजगारनिर्मिती झाली. मेळघाटात 41 हजार 174 , तर जिल्ह्यात 1 लाख 46 हजार 326 जॉबकार्ड वाटण्यात आले. या वर्षात स्वच्छतागृह निर्मितीसह ग्रामीण स्वच्छता उपक्रमात 721, दुष्काळ निवारणाची 1 हजार 12 व आवास योजनेत 1855 कामे पूर्ण झाली.
            कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत समन्वयक माया वानखडे म्हणाल्या की, ही कामे पूर्ण करताना वेळेत वेतनवितरण करण्यासह कंत्राटी तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळाची सांगड घालण्याचे आव्हान होते. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षणातून सक्षम करण्यात आले. अंमलबजावणीच्या कामांत वैविध्य राखले. तांत्रिक सक्षमता निर्माण करून वेतन मिळण्यातला विलंब दूर केला. इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंटचा वापर केला गेला. आवश्यक संपर्कासाठी कुशल मनुष्यबळाधारे माहिती- शिक्षण-संवादाचे सूत्र वापरले. अधिका-यांनी आवश्यक तिथे वेळोवेळी फिल्ड व्हिजीट केल्या.  रोजगाराचे वेतनही गतीने वेळेत वितरीत करण्यात आले. प्रत्येक कामाच्या नोंदी घेऊन संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. रोजगारदिन कार्यक्रमात नरेगा कार्ड, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदींचे वितरण, आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले. योजनेतील कामांची तज्ज्ञांकडून वेळोवेळी गुणवत्ता तपासण्यात आली. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण केले गेले. या सर्वांचा एकसंध परिमाण होऊन उद्दिष्टाहून अधिक रोजगार निर्मिती साध्य झाली.
            रोजगारनिर्मितीतून मुलभूत सुविधांचे निर्माण झाले. जलसंधारणाची अनेक कामे झाली. विहिरी व विविध जलस्त्रोत, भूजलाची पातळी वाढून पेयजलाची उपलब्धता वाढली. वृक्षारोपण, रेशीम उद्योग अशी अनेक कामे झाली. कु-हा गावात फळझाडे लावण्याचे प्रयोग ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवून देणारा ठरला.   
पुरस्काराचे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे. जिल्हाधिकारी श्री. नवाल, तत्कालीन मु. का. अधिकारी श्रीमती खत्री, श्रीमती वानखडे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी वर्गाचे  अभिनंदन होत आहे.
                                    00   

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती