Wednesday, December 11, 2019

विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्देश




अमरावती, दि. 11 – जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे सर्वेक्षणात सुधारणेसह प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, पेयजल योजना आदी विविध योजनांची प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. त्यानुसार विहित वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश आज विविध आमदारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले.  
            विधीमंडळ अधिवेशनात होणा-या जिल्हा बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली. आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, सुलभाताई खोडके, रवी राणा, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी संजय पवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टी परिस्थितीच्या प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात सुधारणा व्हाव्यात. अवकाळी, अवेळी व सतत पावसाने जिल्ह्यात सर्वदूर नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणताही भाग वंचित राहता कामा नये, असे निर्देश श्री. भुयार यांनी दिले.  कृषी अधिका-यांनी तालुका क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश श्री. राणा यांनी दिले.  अमरावती जिल्ह्यात पुनर्वसनाची कोणती कामे शिल्लक आहेत, त्याची बैठक घेऊन आढावा घ्यावा, तसेच ती पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याची माहिती सादर करावी, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. 
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेत यंदाचे 24 हजार 581 घरांचे उद्दिष्ट असून, अद्याप 797 घरे पूर्ण आहेत. उद्दिष्ट पाहता ही कामे मिशनमोडवर पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 2012 च्या सर्वेक्षणानुसार 840 गावे हगणदारीमुक्त झाली, तथापि, यातून सुटलेले पाडे, वाड्यावस्‌त्या यांच्यासाठी यंदा अभियानात 30 हजार 960 उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 18 कोटी 63 लाख निधीची आवश्यकता असून, त्याची मागणी करण्यात आली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
70 गावे पाणीपुरवठा योजनेत बांधकाम, पंपदुरुस्ती आदींसाठी 5.43 कोटी निधी मंजूर आहे. 22 गावांनी ठराव दिले आहेत. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्व विभागांनी समन्वय ठेवून हे काम पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. पोलीस गृहनिर्माण योजनेत नांदगावपेठ वसाहतीचाही समावेश व्हावा, अशीही सूचना त्यांनी केली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत 532 गावे समाविष्ट असून, 285 गावात ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापण्यात आल्या आहेत. योजनेत पंप, पाईप, बीजोत्पादन, पशुधन आदी विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेत 3 कोटी 14 लाख निधी वितरीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही वेळेत करण्याचे निर्देश श्रीमती खोडके यांनी दिले.
रब्बीतील हरभरा या महत्वाच्या पिकाच्या उत्पादनवाढीसाठी  ब्रॉड बेस फ्लोर ही पद्धती रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. पारंपरिक पेरणीऐवजी दोन ओळींत काही अंतर राखून पेरणी केल्याने मशागत करणे सुलभ होऊन उत्पादनात वाढ होते. हरभरा पेरणीपूर्वी बुरशीनाशकात टाकून पाण्यात भिजवला व नंतर पेरणी केली की उगवण लवकर होते व कीड लागत नाही, अशी माहिती कृषी अधिका-यांनी दिली. याबाबत यशस्वी प्रयोगांची माहिती नागरिकांसमोर आणण्याचे निर्देश श्री. अडसड यांनी दिले. मेळघाटातील करंजखेड- हतनूर- रायपूर व इतर दोन रस्ते कोअर क्षेत्रातील असल्याने सेंट्रल एमपॉवरमेंट कमिटीची परवानगी लागते. ही परवानगी अद्याप प्राप्त नाही.  आदिवासी क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने ही कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री. पटेल यांनी दिले.
शेंडगाव या संत गाडगेबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १८ कोटी रूपये निधी मंजूर आहे. त्यापैकी ३ कोटी ७३ लक्ष अनुदान प्राप्त आहे. ही कामे तातडीने सुरू करावीत, असे निर्देश श्री. वानखडे यांनी दिले.
जलसंपदा विभागाकडून ४२ लघुप्रकल्पांचे काम सुरू असून, यंदा २३६ दलघमी पाणीसाठ्याचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत अद्यापपर्यंत पुरेशी कामे झाली नाहीत. या कामांना वेग द्यावा. आचारसंहिता व पावसाळ्यामुळे प्रलंबित जिल्हा मार्गांची कामे पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पवार यांनी दिले. महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर, खांब उभारणी आदी कामे वेळेत व्हावीत. भारनियमनाची वेळाही नागरिकांसाठी अनुकुल असाव्यात. त्यादृष्टीने वेळेत आवश्यक बदलांसाठी पाठपुराव्याचे निर्देश देण्यात आले.
उपवनसंरक्षक शिवा बाला, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुलकर्णी, माया वानखडे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
                                    000 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...